ब्रेकिंग न्यूज़
गोवा डेअरीचे ८ संचालक अपात्र

गोवा डेअरीचे ८ संचालक अपात्र

>> सहकार निबंधकांचा निवाडा ः प्रशासक नियुक्त

>> नुकसानीच्या चौकशीसाठी अधिकारी नियुक्त करणार

सहकार निबंधकांनी कुर्टी फोंडा येथील गोवा दूध उत्पादक संघातील (गोवा डेअरी) कथित गैरव्यवहार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आठ संचालकांना अपात्र ठरविले असून गोवा डेअरीवर पशुसंवर्धन खात्याचे उपसंचालक डॉ. विलास नाईक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती काल केली आहे. गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहारामुळे झालेल्या नुकसानीची चौकशीसाठी खास अधिकार्‍याची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती सहकार निबंधक मिनिनो डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सहकार निबंधकांनी गोवा डेअरीतील गैरव्यवहार व गैरकारभाला जबाबदार धरून संचालक धनंजय देसाई, विठोबा देसाई, बाबूराव देसाई, नरेश मळीक, माधव सहकारी, गुरूदास परब, राजेंद्र सावळ, शिवानंद पेडणेकर (स्वीकृत) यांना अपात्र ठरविले आहे. आता, गोवा डेअरीचे संचालक राजेश फळदेसाई, ऍशल्मो फुर्तादो, अजय देसाई आणि बाबू कोमरपंत या चार जणांचे संचालकपद कायम ठेवण्यात आले आहे. तथापि, मंडळाचा कोरम पूर्ण होत नसल्याने प्रशासकाची नियुक्ती करावी लागत आहे, असे सहकार निबंधक डिसोझा यांनी सांगितले.

गोवा डेअरीतील गैरव्यवहार प्रकरणाची खास अधिकार्‍याची नियुक्ती करून चौकशी करण्यात आलेली आहे. फिल पॅक मशीन, आइस्क्रीम प्लॉन्ट मशीनरि, कर्मचारी भरती आणि पशुखाद्य कारखान्यासाठी कच्चा माल खरेदी आदी प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा डेअरीच्या नुकसानीची चौकशी खास अधिकार्‍यांकडून केली जाणार आहे. अपात्र संचालकाबरोबर निवृत्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत आणि इतर अधिकार्‍यांची चौकशी केली जाणार आहे, असेही डिसोझा यांनी सांगितले.

गतवर्षी २०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात तत्कालीन सहकार निबंधक संजीव ग़डकर यांनी एका आदेशान्वये गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी ७ संचालकांना अपात्र ठरवून गोवा डेअरीवर प्रशासकांची नियुक्ती केली होती. तसेच गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत यांना गैरव्यवहार आणि गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरून संचालक मंडळ किंवा प्रशासकांनी निलंबित करून या प्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, सहकार खात्याच्या फोंडा विभागाचे साहाय्यक निबंधकांची सक्षम अधिकार्‍यामार्फत चौकशी करण्याचा आदेश सहकार निबंधकांनी दिला होता. या आदेशाला संबंधितांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. सहकार निबंधकांनी संचालक व अधिकार्‍यांना बाजू मांडण्याची योग्य संधी दिली नाही, असा दावा याचिकादारांनी केला होता. त्यामुळे सरकारने नव्याने चौकशीची तयारी दर्शवून याचिका मागे घेण्यात येत आहे, अशी माहिती न्यायालयात दिली होती. न्यायालयाने सहकार निबंधकांना या प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. सहकार निबंधक डिसोझा यांनी गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी केलेल्या कारवाईबाबत माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली जाणार आहे. सरकारने गोवा डेअरीप्रकरणी नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी माहिती देऊन याचिका मागे घेतली होती.