‘गोवा एक्सप्रेस’ दिल्लीला रवाना

वास्को हजरत निजामुद्दीन (गोवा एक्सप्रेस) या वास्कोतून काल सोमवारी दुपारी ३ वा. निघालेल्या विशेष रेल्वेने २२५ प्रवासी रवाना झाले. अनलॉक-१च्या माध्यमातून भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या २०० विशेष गाड्यांपैकी वास्कोतून गोवा एक्सप्रेस दुपारी सोडण्यात आली.
लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी भारतीय रेल्वेतर्फे अनलॉक एकच्या दिशेने जाताना देशातील विविध मार्गांवर काल १ जूनपासून दोनशे विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काल वास्कोतून गोवा एक्सप्रेस मार्गस्थ झाली. यावेळी वास्को रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस होते.

या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तसेच इतर आरोग्य तपासणी केल्यानंतरच प्रवाशाला रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात आला. केवळ कन्फर्म, आर एसी तिकीट असलेल्या प्रवाशांना स्टेशनमध्ये येऊन ट्रेनमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. ट्रेनने जाण्यासाठी दुपारी १ वाजल्यापासूनच प्रवाशांनी येण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, शुक्रवार दि. ५ रोजी दिल्लीहून गोवा एक्सप्रेस सकाळी सात वाजता १५० प्रवाशांना घेऊन वास्को रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे.

राजधानीतून मडगावात ४२ प्रवासी
दरम्यान, काल दिल्लीहून थिरूअनंतपूरमला जाणार्‍या राजधानी एक्सप्रेसमधून ४२ प्रवासी मडगाव रेल्वेस्थानकावर उतरले. तर ४६ प्रवासी थिरूअनंतपूरमला जाण्यासाठी निघाले. शिवाय निजामुद्दीन-वास्को रेल्वे आज गोव्यात पोहोचली मात्र त्यातून किती प्रवासी गोव्यात उतरले याची माहिती प्राप्त झाली नाही.
काल राजधानीमधून उतरलेल्या प्रवाशांची जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांची तपासणी केली.

२८०० नागरिक रवाना
दरम्यान, काल संध्याकाळी दोन श्रमिक गाड्या मडगावातून उत्तर भारतात जाण्यासाठी सुमारे २८०० मजुरांना घेऊन सुटल्या. त्यातील एक उत्तर प्रदेशात तर दुसरी पश्‍चिम बंगालला रवाना झाली. कालपासून रेल्वे सुरू करण्यात आल्यामुळे रेल्वे तिकिटांच्या आरक्षाणासाठी स्थानकावर गर्दी दिसून येत होती.