ब्रेकिंग न्यूज़

गोवाभरात उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन

>> ‘हृदयासाठी योग’ आशयावर आयोजन : खासगी संस्थांनाही आयोजनासाठी सहकार्य

गोवाभरात उद्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी काल दिली. योग दिनाचा प्रमुख कार्यक्रम ताळगाव येथील कम्युनिटी सेंटरमध्ये होणार असून त्यात ३५० जण सहभागी होणार असल्याची माहितीही नाईक यांनी दिली. त्याशिवाय सर्व सरकारी खात्यांतर्फेही योग दिन साजरा केला जाणार असून आरोग्य खाते आघाडीवर असेल. राज्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात योग दिनानिमित्त योगाचे वर्ग भरवण्यात येणार असून प्रशिक्षित योग शिक्षक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. ‘हृदयासाठी योग’ हा यावर्षीच्या योगदिनाचा विषय आहे.

याशिवाय राज्यातील खासगी संस्थांना योग वर्ग भरवण्यासाठी सहकार्य हवे असल्यास ते देण्याचीही सरकारची तयारी असल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
आरोग्य खात्याबरोबरच अन्न आणि औषध प्रशासन, वन खाते, कला आणि संस्कृती खाते आदी खात्यांनी योग दिनासाठी विशेष रस दाखवला आहे, असे नाईक यांनी नमूद केले.

योगाचे महत्त्व संपूर्ण
जगाला कळून चुकले
योगाला अनन्यसाधारण महत्त्व असून ते आता संपूर्ण जगाला कळून चुकले आहे. आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी योगसारखा दुसरा व्यायाम प्रकार नसून लहान मुलापासून वयोवृद्ध माणुसही योग करू शकतो हे योगाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य असल्याचे नाईक म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय योग दिन सत्यात उतरला असल्याचेही नाईक यावेळी म्हणाले. केंद्रीय आयुष मंत्रालय, भारतीय पर्यटन, गोवा पर्यटन, सांख्यिकी आणि नियोजन तसेच सर्व केंद्रीय खात्यांचे कर्मचारी तसेच गोवा कला आणि संस्कृती खाते त्यांचे कर्मचारी पाटो येथील संस्कृती भवनमध्ये योग कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. ८ ते ९ दरम्यान हा कार्यक्रम होईल.

अभ्यासक्रमात योग सक्तीविषयी
सांगू शकत नाही : मिलिंद
‘योग’चा अभ्यासक्रमात सक्तीचा विषय म्हणून समावेश करायला हवा, असे आपले वैयक्तिक मत आहे. पण ते होईल की नाही हे आपण सांगू शकत नसल्याचे मिलिंद नाईक यांनी सांगितले.
‘योग’वर कुठल्याही एका धर्माची मक्तेदारी नसून तो सर्वांसाठी आहे. योग शरीर आणि मन यांच्यात संतुलन घडवून आणून माणसाचे आरोग्य सुधारण्याच्याबाबतीत महत्त्वाचे कार्य करीत असतो. त्यामुळे कुणीही जर योगला विरोध करीत असतील तर अज्ञानातूनच असे म्हणावे लागेल, असे नाईक यांनी सांगितले.
काही लोकांकडून ‘योग’चा अभ्यासक्रमात समावेश करण्यास विरोध होत आहे. याची आपणाला जाणीव आहे असे सांगून आता विदेशातीलही लोक योग करू लागले असून देशवासियांनी योगला विरोध करणे बंद करावे, असे नाईक म्हणाले.

योग दिनानिमित्त सरकारी
कर्मचार्‍यांना खास सूट
योग कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्याने राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना २१ रोजी सकाळी तासभराने उशीरा कार्यालयात येण्यास परवानगी असेल. मात्र, योग कार्यक्रमात सहभागी होणार्‍यांसाठीच ही सूट असेल, असे नाईक यांनी स्पष्ट केले. सर्व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात योग वर्ग सकाळी सुरू होणार आहेत. काही ठिकाणी ७ वा. तर काही ठिकाणी ८ वा. पासून वर्ग सुरू होतील.