ब्रेकिंग न्यूज़

गोवर व कांजिण्या

  • वैदू भरत म. नाईक

म्हटले तर गोवर-कांजिण्या हे क्षुद्र विकार, साथीचे व हवेतील आकस्मिक फेरबदलामुळे होणारे विकार आहेत. पण ज्यांना हे विकार होतात ती मुले अजाण, लहान असतात. त्यामुळे त्यांचे आईवडील मुलाच्या काळजीने घाबरून गेलेले असतात. त्यामुळे या विकारास निष्कारण महत्त्व देवून हा विकार लांबविला जातो. योग्य व वेळेवर केलेले लहानसे उपचार हा विकार पुनःपुनः उद्भवू देत नाही.
एक काळ देवी हा भीषण विकार देशभर सर्वांनाच हैराण करत असे. त्यावेळेस देवी, गोवर, कांजिण्या या विकाराकरिता अंधश्रद्धेमुळे खडोपाडी नाना दैवी उपचार करीत असत. आजही गोवर, कांजिण्यासाठी खेडगावात व काही अंशी शहरात दैवी उपाय चालू असतात. लहान मुलांच्या कल्याणाकरिता आयुर्वेदाच्या शास्त्रीय उपचारांची कास धरणे एवढे या विकारात पुरेसे आहे.
कारणे –
– साथ असणे.
– लहान मुलांचा एकत्र संपर्कात राहणे, एकमेकांचे कपडे वापरणे.
– ताप असताना सौम्य स्वरुपाकरिता चुकीची व तीव्र औषधे दिल्याने गोवर-कांजिण्याची लक्षण वाढणे.
– खूपच कडक उन्हात कफ व पित्त वाढविण्याची शारीरिक कारणे घडतात.
लक्षणे –
– तीव्र, सौम्य, ताप.
– केसाच्या छिद्राइतका बारीक पुरळ अंगावर व डोक्यात उठतो.
– खोकला, चैन न पडणे.
– पुरळ उठण्यापूर्वी मसुराच्या डाळीएवढे डाग टाळूवर, गालावर, ओठाच्या आतील बाजूस येणे.
– ताप येणे, थांबणे व परत येणे.

(ब) कांजिण्या
प्रथम पुरळ व नंतर ताप या क्रमाने सुरुवात होते. या पुटकुळ्या प्रथम छातीवर व बाकी अंगावर येतात. कांजिण्या मोठ्या संख्येने येतात. फोड फार खोल नसतो. पाणी भरल्यासारखे फोड येतात. याला दुखणे किंवा खुपणे नसते. खपलीचे ठिकाणी खाज येते, त्यामुळे पुन्हा फोड येतात. त्यामुळे त्याचे डाग राहतात. त्यामुळे पुन्हा ताप येऊ शकतो व क्वचित त्वचेतून रक्तस्राव होतो. कांजिण्या एकदम येतात व एकदम जातात.
शरीर परीक्षण –
– टाळू, घसा, जीभ, डोळे, ओठ यांचे परीक्षण लाली कितपत वाढली आहे याकरिता करावे.
– त्वचेवर उठलेले फोड किंवा लाल ठिपके, त्या फोडातून पू किंवा लस आहे का याचे परीक्षण करावे.
– ताप दिवसातून ३/४ वेळा मोजावा.

अनुभविक उपचार –
– कालदुधा, प्रवाळ याच्या प्रत्येकी २-२ गोळ्या दुधाबरोबर दोन वेळा घ्याव्यात.
– गुलाब द्राक्षासव ३/४ चमचे समभाग पाण्याबरोबर २/३ वेळा घ्यावे.
– शौचास साफ नसेल तर त्रिफळा चूर्ण १/३ व १ चमचा तूप असे रात्रौ घेणे.
– फोडाना लावण्यासाठी शतधौतधृत वापरावे.
– दाह होत असल्यास चंदन उगाळून लावावे.
– गोवरामध्ये तीव्र ताप कशानेही कमी होत नसल्यास चंद्रकला व लसुण शेखर प्रत्येकी अर्धी गोळी याप्रमाणे अर्ध्या तासाने लागोपाठ पाच-सात वेळा घ्यावी
– कांजिण्या व गोवर यामध्ये शरीराचा दाह होत असल्यास चंदन गंध व परिपाठ वाळून लेप लावावा.
– कांजण्याचे फोड खूप झाले असल्यास ते फोड गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने शेकून साफ करावे व वर संत्र-चिर्‍याची फूड टाकावी म्हणजे लस पसरत नाही.
पथ्यापथ्य –
– गाईचे दुधावर शक्यतो रहावे.
– सालीच्या लाह्यांचा आहार किंवा त्याचे उकळून पाणी प्यावे.
– भरपूर काळ्या मनुका खाव्यात.
– चंदन उगाळून त्याचे गंध पोटात घ्यावे.
– तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण पदार्थ घेऊ नयेत.
– धन्याचे पाणी किंवा पुड घ्यावी.
– ओकारी असल्यास बर्फ घालून दूध घ्यावे.
– ताप अंग पुसून काढावे.

नागीण
नागीण, विसर्प, धावरे या विविध नावाने हा रोग ओळखला जातो. त्यात पुन्हा त्याचे वातज, पित्तज, कफज व त्यांच्या एकमेकांशी संबंध असे प्रकार केले जातात. बहुधा दोनच प्रकार दिसतात. ९० टक्के पित्तप्राधान, १० टक्के कफ प्रधान नागीण विकार आढळतो. या विकाराने घाबरून न जाता शांतपणे पित्तप्रधान की कफप्रधान असा विचार केला तर बहुधा विकाराचे समाधान करता येते. चुकीची औषधे किंवा दुर्लक्ष केले तर हा विकार फार काळ रेंगाळतो. जेथे जखमा असतात तेथे काळे डाग तयार होतात.
कारण –
– पित्त वाढेल असे खाणे, पिणे, वागणे.
– दमा, खोकला, जुलाब, मुळव्याध, उदर प्रदर, ताप, उलटी.
– अजीर्ण होईल असे भोजन.
– तीक्ष्ण, उष्ण, आंबट, तिखट पदार्थांचा जेवणात अधिक वापर. उदा. लोणची, पापड, दही, मिरची, चहा, तंबाखू.
लक्षणे –
– अंगावर जानव्यासारखे गोलाकार अंतराअंतराने लाल, पिवळे, काळसर विविध वर्णाचे फोड येतात.
– त्या फोडांमुळे आग, खाज किंवा स्पर्श सहन न होणे, टोचणी असा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो.
– अंगावर कपड्यांचा स्पर्श सहन होत नाही.
– सर्व शरीराचा दाह होतो.
– ताप येणे
– पहिल्यांदा वर्तुळात फोड कमी असतात, नंतर ते वाढत जातात.
शरीर परीक्षण –
– फोड पित्तप्रधान आहेत का कफप्रधान आहेत त्यांचे नीट परीक्षण करावे.
– स्पर्श उष्ण आहे का? खाज आहे का? दाह आग आहे का? हे समजून घ्यावे.
– शौचास कसे होते याची चौकशी करावी.
– तहान, घाम येणे याचे प्रमाण पहावे.
अनुभविक उपचार –

पित्तप्रधान नागीण
– प्रवाळ कामदुधा, चंदनादि प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा रिकाम्या पोटी चावून खाव्यात.
– लघवी गरम होत असल्यास रसायन चुर्ण दुपारी एक चमचा गरम पाण्यासोबत घ्यावे.
– अंगावर फार दाह होत असल्यास मौक्तिक भस्तम ५० मिली ग्रॅम मधातून एकवेळ किंवा दोन वेळ घ्यावे.
– दशांग लेप गार पाण्यातून अंगाला पुनःपुनः लावावा किंवा चंदन गंधक पुनःपुनः लावावे.
– जखम भरून येण्यासाठी एलादि तेल किंवा शतशौतधृत लावावे.

कफप्रधान नागीण
– पू, खाज, ठणका अशी लक्षणे असल्यास फोडांना टाकणखार चारभाग अधिक एक भाग पाणी यांच्या सहाय्याने केलेल्या पोटीसाने शेकावे.
– त्यानंतर स्वच्छ फोडांवर एलादी तेल लावावे.
– आरोग्यवर्धिनी, त्रिफळा, कामदुधा प्रत्येकी तीन गोळ्या रिकाम्या पोटी बारीक करून घ्याव्यात.
– नागणीची मुरलेली उष्णता निघून जाण्यासाठी रसायनचुर्ण किंवा उसलसरीचे पूर्ण अर्धा ते एक चमचा पाण्यासोबत घ्यावे.
पथ्यापथ्य
– पित्तप्रधान नागीणीत तिखट, उष्ण, खारट, चहा, जागरण, उन्हात फिरणे, उशिरा जेवणे, तंबाखू, दारू हे सर्व वर्ज्य करावे. थंड पदार्थ खाणे, द्राक्ष, मोसंबी, ऊस, अंजीर, कोथंबीर, कोहळा, दुधीभोपळा, पडवळ, कार्ले, दोडके, नारळाचे पाणी, मुग याचा वापर करावा. गरम पाणी भरपूर प्यावे.
– कफप्रधान नागीणीत आंबट, खारट, खूप, गोड, जड, तेलकट, तुपकट पदार्थ वर्ज्य करावेत. दुपारी झोपू नये, जेवण हलके असावे. आले, जिरे, धने, शेवगा, शेंपू यांचा वापर करावा.