गोळा उठणे

– वैदू भरत नाईक

गोळा आतड्यात कोठे आहे याची निश्‍चिती करावी. आमाशय, पच्चमानाशय, पक्वाशय यांची तपासणी रिकाम्या पोटी करावी. गोळा स्पर्श केल्यावर हलतो का? उष्ण स्पर्श आहे का? दडस व न हलणारा आहे का? याच्या स्थानावरून व इतर लक्षणांवरून वात, पित्त, कफ यांचा संबंध ठरवता येतो.

‘पोटात गोळा उठणे’ हा वाक्‌प्रचार नेहमी ऐकू येतो. गडबडा लोळणे, पोट धरून बसणे, रोग्याची आरडाओरड, जवळपासच्या माणसांची धावपळ, अनेक औषधांचे प्रयोग आणि एखादा वायू मोकळा झाला की एकदम पोटदुखी थांबणे… असे चित्र डोळ्यासमोर आणा म्हणजे रोग्याचे स्वरूप चटकन् लक्षात येईल.
वायू हा अनाकलनीय आहे. त्याची कोणी खात्री देऊ शकत नाही. तो का? कसा? केव्हा? कुठे? ठोकेल, त्रास देईल हे सांगणे कोणालाच शक्य नाही.
कारणे ः
१) सामान्य कारणे ः * ज्वर, वांती, अतिसार इत्यादी रोगांनी कृश झाला असता, वमनादी कर्मांनी दुर्बल झाला असताना वातुळ पदार्थ खाणे.
* भूक लागली असता थंड पाणी पिऊन भूक घालविणे.
* जेवणानंतर व्यायाम, पोहणे, देहाचा क्षोभ होईल असे वागणे.
* उलटीचा वेग नसतानाही उलट्या काढणे, मलमूत्र प्रवृत्तीस अडविणे.
* वमनादि कर्म केल्यावर लगेच जड अन्न खाणे.
२) वायुगोळा ः * खूप थंड, पचावयास जड, स्निग्ध, गोड, तुरट, तिखट, कडू रसाच्या आहाराचे सेवन.
* अकाली भूक नसताना जेवणावर जेवण, पहिले जेवण पचले नसताना जेवणे, रात्री-अपरात्री जेवणे.
* बैठे काम, व्यायामाचा अभाव, उशिरा झोप, चिंता, अति बोलणे, वेडीवाकडी आसने करणे, अवघड बसणे.
* शीतपेये, आईसक्रीम, थंड पाणी, शेव, भजी, चिवडा, काकडी, मेवामिठाई, मांसाहार, बटाटा, डालड्याचे पदार्थ खाणे.
* तहान नसताना खूप पाणी पिणे.
३) पित्तप्रधान गोळा ः * पित्त वाढेल अशी तीक्ष्ण, उष्ण, आंबट, खारट, तिखट, मिरची मसाला, लोणचे, अंडी, मांसाहार, दारू, तंबाखू, सिगारेट या पदार्थांचा वापर करणे.
* वारंवार जागरण, उशिरा जेवणे, उपवास, चिंता, उन्हात काम, चहाचा अतिरेक, आंबलेले शिळे पदार्थ खाणे.
४) कफप्रधान गोळा ः * थंड, जड, फार गोड, आंबट पदार्थ खाणे.
* कफ वाढेल असे दही, केळे, टोमॅटो, डालडा किंवा इतर पदार्थ खाणे
* तिखट, तुरट, कडू चवीच्या पदार्थांचा जेवणात अभाव
* जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे
* भूक नसताना जेवणे, उशिरा जेवणे, खराब पाणी पिणे, कृमीची खोड असणे.
५) रक्तज गोळा ः * पाळीचे वेळेस, बाळंतपणात किंवा योनीरोग झाला असताना सारखे वातुळ पदार्थ खाणे,
* रक्त व पित्त बिघडवणारा आहार घेणे.
लक्षणे ः
१. वायुगोळा ः सायकलच्या ट्यूबला फूग येते तसा आतड्यात फुगवटा येतो. मोठ्या आतड्याच्या आडव्या भागात वायूगोळा, ढेकर, पोटदुखी, उचकी, मानदुखी, डोकेदुखी, गुरगुर, दम, अंग लाल होणे, मुंग्या येणे, उष्ण स्पर्श, गोळा वरच्या भागात असणे, स्पर्शाने सरकणे.
२. पित्तप्रधान गोळा ः बेंबीपाशी व आसपास दडस, जळजळ, बारक्या आतड्यात पित्ताचा त्रास, आग पडणे, अन्न जाताना आग होणे, सहन न होणे, उलटी किंवा संडासावाटे पित्त किंवा रक्त पडणे, गोळ्याच्या जागी वेदना होणे, स्पर्श सहन न होणे.
३. कफप्रधान गोळा ः मंद वाढ होणे, उशीरा जाणीव, जडपणा, अपचन, अजीर्ण, मलावरोध, उलटी, भूक मंद, जंत, कृमी, पोट भरणे, वजन वाढणे, थंडी, ताप, पडसे, आळस, मळमळ, खोकला, पांढुरकी त्वचा, कठीण, जड, खोलवर वाटणारा कमी वेदनांचा गोळा असणे.
४. रक्तज गोळा ः पोट मोठे होणे, गर्भ असणारी लक्षणे वाटणे, वेदना एकाच जागी असणे, घट्टपणा, योनीचे जागी घाण वास.
शरीर परीक्षण ः
गोळा आतड्यात कोठे आहे याची निश्‍चिती करावी. आमाशय, पच्चमानाशय, पक्वाशय यांची तपासणी रिकाम्या पोटी करावी. गोळा स्पर्श केल्यावर हलतो का? उष्ण स्पर्श आहे का? दडस व न हलणारा आहे का? याच्या स्थानावरून व इतर लक्षणांवरून वात, पित्त, कफ यांचा संबंध ठरवता येतो.
अनुभविक औषधोपचार ः
१) वातज गोळा ः १. शंखवटी व प्रवाळ पंचामृत प्रत्येकी २-२ गोळ्या व पंचकोलासव काढा ४ चमचे समभाग पाण्याबरोबर जेवणानंतर घेणे.
२. वायुगोळ्याचे स्वरूप फार गंभीर असल्यास लवणभास्कर व हिंग्वाष्टक चूर्णजेवणाबरोबर कोमट पाण्यातून घेणे.
३. नेहमीच्या मलावरोध तक्रारीत रात्री गं. हरितकी चूर्ण १ चमचा गरम पाण्यासोबत घ्यावे.
२) पित्तज गोळा ः १. प्रवाळ पंचामृत व आम्लपित्तवटी दोन्ही जेवणांनंतर प्रत्येकी २-२ गोळ्या पाण्यासोबत घ्याव्या. रिकाम्या पोटी आरोग्यवर्धिनी सकाळी ८ वा. व सायं. ६ वा. घ्यावी.
२. मलावरोध हे लक्षण असल्यास सुरणसारक चूर्ण कोठा हलका किंवा जड असल्यास हिशोबात घ्यावे.
३) कफज गोळा ः १. कफाबरोबर पित्ताचा अनुबंध असल्यास जेवणानंतर प्रवाळ पंचामृत २ गोळ्या घ्याव्यात.
२. वज्रक्षार जेवणानंतर चिमूटभर मधाबरोबर चाटण करावे.
४) रक्तज गोळा ः १. प्रवाळ, कामदुधा व चंदनादि वटी प्रत्येकी २-२ गोळ्या सकाळी व सायंकाळी रिकाम्या पोटी दुधाबरोबर घ्याव्यात.
२. दूर्वा स्वच्छ धुवून त्यांचा रस चमचा-दोन चमचे सकाळी व सायंकाळी घ्यावा.
३. एक चमचा शतावरी चूर्ण चांगल्या तूपावर भाजून एक कप दूध व थोडे पाणी, साखर याबरोबर चांगले शिजवून उपाशीपोटी घ्यावे.
पथ्यापथ्य ः
१) वातज गोळा ः जड, खूप थंड, गोड असा आहार टाळावा. जेवण नियमित वेळेत घ्यावे. रात्री जेवण कमी असावे. जेवणात आले, लसूण, जिरे असी चटणी असावी. अधनमधून मध घेणे इष्ट होय.
२) पित्तज गोळा ः खूप तिखट, खारट किंवा आंबट तसेच उष्ण पदार्थ कटाक्षाने टाळावेत. दारू, सिगारेट सेवन करू नये. चहा शक्यतो टाळावा. दही, लोणचे, मिरची पावडर यांचे आहारातील प्रमाण अधिक असू नये.
३) कफज गोळा ः वजन वाढेल असा आहार नसावा. डालडा, थंड पदार्थ, साखर, मीठ यांचे आहारातील प्रमाण कमी असावे.
४) रक्तज गोळा ः पूर्ण विश्रांती घ्यावी. तिखट, आंबट, खारट, उष्ण आहार घेऊ नये. क्षोभ होईल असे पदार्थ टाळावेत.