ब्रेकिंग न्यूज़

गोमेकॉच्या मोफत शववाहिका सेवेला खासगी चालकांचा विरोध

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मोफत शववाहिका सेवेला खासगी शववाहिका चालकांनी विरोध दर्शविला आहे. सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी खासगी शववाहिका चालकांना पाठिंबा दर्शविल्याने आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी नापसंती व्यक्त केली आहे. मोफत शववाहिका प्रकरणावरून आमदार सिल्वेरा यांनी जीएमसीचे डीन डॉ. बांदेकर यांना धमकी दिल्याचा आरोप आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल केला.

हॉस्पिटलने जीव्हीकेच्या साहाय्याने मोफत शववाहिका सेवा सुरू केली आहे. सोमवार ते शनिवार या दिवसात सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. रविवारी ही सेवा बंद ठेवली जाणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक जीएमसीचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी जारी केले आहे.

जीएमसीच्या मोफत शववाहिका सेवेमुळे खासगी शववाहिका चालकांमध्ये नाराजी पसरली आहे. खासगी शववाहिका चालकांकडून जास्त प्रमाणात शुल्क आकारले जात होते. मोफत शववाहिका सेवेमुळे खासगी शववाहिका चालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. जीएमसी प्रशासनाने खासगी शववाहिका चालकांना जीएमसीच्या आवाराबाहेर जाण्याची सूचना केली आहे.

आमदार सिल्वेरांचा खासगी चालकांना पाठिंबा
खासगी शववाहिका चालकांना पाठिंबा देण्यासाठी सांतआंद्रेचे आमदार सिल्वेरा पुढे आले असून त्यांनी जीएमसीचे डीन बांदेकर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे. आमदार सिल्वेरा यांनी या प्रकरणावरून जीएमसीच्या डीनना धमकी दिल्याचा आरोप आरोग्य मंत्री राणे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केला आहे.