ब्रेकिंग न्यूज़

गोमंतकीय चित्रपटांसाठी इफ्फीत विशेष विभाग

>> ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती

यंदाचे वर्ष इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने यंदा इफ्फीत गोमंतकीय चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी एक विशेष विभाग स्थापन करण्याचे ठरले असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे (ईएसजी) उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्याने तशी मागणी केल्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इफ्फीत गोमंतकीय चित्रपटांसाठीचा विभाग स्थापन करण्याची सूचना चित्रपट महोत्सव संचालनालयाला केल्याचे फळदेसाई म्हणाले.
इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागात एकाही गोमंतकीय चित्रपटाची निवड झाली नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर जी टीका केली जात आहे त्याबद्दल बोलताना फळदेसाई म्हणाले, की इफ्फीसाठीच्या विविध विभागांसाठी चित्रपटांची निवड करण्याची जबाबदारी ही ज्युरी मंडळावर असते. चित्रपटांचा दर्जा बघून ज्युरी मंडळ ही निवड करीत असते. त्यात गोवा मनोरंजन सोसायटी, चित्रपट महोत्सव संचालनालय किंवा सरकार हस्तक्षेप करू शकत नाही.

गोव्याची मागणी मान्य
मात्र, हे इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आम्ही यंदाच्या इफ्फीत गोमंतकीय चित्रपटांसाठीचा एक विशेष विभाग स्थापन करण्यात यावा अशी मागणी केलेली असून ती मान्य झाली असल्याचे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले. या विभागातून गोमंतकीयांनी तयार केलेल्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

सरकार ५० कोटी रु.
खर्च करत नाही
दरवर्षी इफ्फीसाठी गोवा सरकार ४०-५० कोटी रु. खर्च करीत असल्याचा विरोधकांनी केलेला आरोप हा खोटा असल्याचा खुलासाही यावेळी फळदेसाई यांनी केला. इफ्फीसाठी विविध वर्षी केलेल्या खर्चाची माहिती देताना ते म्हणाले, की २०१६ साली गोवा सरकारने इफ्फीवर २२.६२ कोटी रु. खर्च केले. २०१७ साली १७.०८ कोटी तर २०१८ साली १२.९४ कोटी रु. खर्च केले. यंदाचे वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने यंदा सुमारे १८ कोटी रु. एवढा खर्च अपेक्षित असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.
इफ्फीसाठी दरवर्षी सरकारला प्रायोजक मिळत असून त्याद्वारे काही कोटी रु. उभे केले जातात. यंदा प्रायोजकांकडून किमान ५ कोटी रु. मिळणार असल्याचे ते म्हणाले.

पणजीत खुल्या ठिकाणी
लोकांना चित्रपट दाखविणार
यंदा इफ्फीच्या दरम्यान गोव्यातील लोकांसाठी खुल्या ठिकाणी चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. आल्तिनो येथील ‘जॉगर्स पार्क’ व मिरामार समुद्रकिनार्‍यावर चित्रपट दाखवण्याचे ठरले आहे. शिवाय मागणी असल्यास व आम्हाला शक्य झाल्यास आणखीही काही ठिकाणी अशा प्रकारे चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.