गुन्हेगारीचा कणा मोडा

ताळगाव आणि रायबंदरमध्ये दोन टोळ्यांमध्ये तलवारींनिशी झडलेले टोळीयुद्ध ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्यात संघटित गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याची ही निशाणी आहे आणि सरकारने वेळीच या गुंडांचा बंदोबस्त केला नाही, तर परिस्थिती चिघळण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर किंवा रवी नाईक आदींनी आपापल्या कार्यकाळामध्ये ज्या खमकेपणाने अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारीला वेसण घातली होती, तशी कठोर कारवाई विद्यमान मुख्यमंत्री व गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून आज गोवा अपेक्षितो आहे. ‘अशा प्रकारची गुंडगिरी ही गोव्यासाठी लांच्छनास्पद असून त्यासंबंधी कडक कारवाई करण्यात येईल’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेच, त्याला अनुसरून या गुंडपुंडांना वेळीच जरब बसवणारी पोलिसी कारवाई या घडीस आवश्यक आहे. अशी कारवाई व्हायला हवी की पुन्हा डोके वर काढण्याची कोणाची हिंमत होऊ नये. दिवसाढवळ्या लोखंडी सळ्या, तलवारी, हॉकी स्टीक घेऊन गोव्याच्या रस्त्यांवर एकमेकांवर प्राणघातक हल्ले चढवले जाणार असतील तर आम जनता भयभीत होणे स्वाभाविक आहे. तलवारीने एखाद्याचा हात छाटण्यापर्यंत या गुंडांची मजल गेलेली आहे. गोव्यासारख्या शांत, सुसंस्कृत, शांतिप्रिय प्रदेशामध्ये हे जे काही नवे वारे आलेले आहे, त्याला वेळीच पायबंद घालण्याची आवश्यकता आहे. एखाद्या भागात जेव्हा गुंडगिरी डोके वर काढते, तेव्हा तेथील पोलीस यंत्रणा पेंगते आहे आणि तिचा धाक राहिलेला नाही याचीच ती साक्ष देत असते. कालच्या घटना तर खुद्द राजधानी आणि आसपासच्या परिसरात घडलेल्या आहेत, त्यामुळे या घटनांचे गांभीर्य अधिक वाढते. राजधानीचा परिसरच सुरक्षित नसेल तर इतर प्रदेशाचे काय? गोव्याचे एकूण सामाजिक जीवन वेगाने पालटत चाललेले आहे. वेगवेगळ्या राज्यांतून वेगवेगळ्या पार्श्वभूमीची मंडळी येथे लोटत राहिली आहेत. त्यांच्या बकाल वस्त्या तयार होत आहेत. त्यातूनच गुन्हेगारीही वाढते आहे. अशा प्रकारचे तलवार हल्ले वा टोळीयुद्धेही गोव्याला नवीन नाहीत. पणजी, मडगावसारख्या शहरांच्या परिसरातच गुन्हेगारी टोळ्या निर्माण होणे, त्यांच्यात आपसात टोळीयुद्धे झडणे हे प्रकार सतत घडत आलेले आहेत. पण अशा कुख्यात गुंडपुंडांची यादी बनवून त्यांना तडीपार करण्यात पोलिसांकडून कसूर होणार असेल तर आम जनतेच्या जिवाला त्यापासून धोका पोहोचू शकतो. गोव्यातील गुन्हेगारीचा विषय जेव्हा येतो, तेव्हा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध खमकेपणाने केलेल्या कारवाईचे स्मरण होतेच होते. राजकारण्यांच्या पंखांखालील गुन्हेगारांना देखील तेव्हा त्यांनी सोडलेले नव्हते. गोव्याच्या तथाकथित खंडणीखोर ‘प्रोटेक्टर्स’चा त्यांनी तेव्हा कणाच मोडून टाकला होता. गुन्हेगारीवर अंकुश ठेवायचा तर पोलीस यंत्रणेचा धाक त्यांच्यावर कायम राहणे गरजेचे असते. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील साटेलोटेही अनेकदा उजेडात आले. आज कारागृहेही सुरक्षित नाहीत असे राज्यातील चित्र आहे. सडाच्या तुरुंगात टोळीयुद्धे झडायची. आता कोलवाळच्या नव्या कारागृहामध्ये तर त्यापुढचे प्रकार घडत असल्याचे सातत्याने कानी येत आहे. खून पाडण्यापर्यंत मजल गेलेली आहे. गृह खात्याने संघटित गुन्हेगारीच्या या विषयाची अत्यंत गांभीर्याने दखल घेणे आणि अधिक कठोरपणे पावले टाकणे आवश्यक आहे. महानगरी मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड तयार झाले, त्याची सुरुवात अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांची आपसातील टोळीयुद्धे यांच्यातूनच झाली होती. पुढे तिने अक्राळविक्राळ रूप धारण केले आणि मुंबईच्या मुळावरच ती गुन्हेगारी येण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा कुठे तेथील सरकार व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि एन्काउंटरांची मालिका करून त्यांनी त्या टोळधाडीचा खात्मा करून टाकला. आजची मुंबई पूर्वीच्या तुलनेने बरीच शांत व सुरक्षित आहे. मात्र, मुंबईतून तडीपार केले गेेलेले गुंड गोव्यासह अन्य भागांत स्थिरावलेले आहेत. तेथून त्यांचे काळे धंदे सुरू असतात. गोव्यात तर सरकारच कॅसिनोंसारख्या गैरप्रवृत्तीला अभय देत असल्याने अशा व्यवसायांच्या आडून गुन्हेगारीने पाय रोवले तर नवल ते काय? गुन्हेगारी, खंडणीखोरी, अपहरणे, खून, बलात्कार यांचे काळे पर्व जर गोव्यामध्ये सुरू करायचे नसेल तर राज्यातील कुख्यात गुंडांच्या आणि समाजकंटकांच्या याद्या बनवून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीस यंत्रणेने त्वरित हाती घ्यावी आणि कोणतीही दयामाया न दाखवता या गुंडगिरीचा बीमोड करावा. गोव्यातील काही गावे गुन्हेगारीमुळे पूर्वीपासून कुख्यात आहेत. मूठभर गावगुंडांमुळे गाव बदनाम होत असते. त्यामुळे अशा अपप्रवृत्तीचा नायनाट झाला पाहिजे. परवाच्या घटनेशी संबंधितांच्या मुसक्या आवळल्या गेल्याच आहेत. पूर्ववैमनस्यातून आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झडणार्‍या या टोळीयुद्धांची पुनरावृत्ती होणार नाही हे पोलिसांनी पाहावे. पुन्हा गोव्याच्या रस्त्यांवर तलवारीचा खणखणाट ऐकू येता कामा नये!