गुडे-शिवोलीत लहान भावाचा भाऊ व भावजयीकडून खून

गुडे शिवोली येथील सर्वेश खडपकर (३०) या आपल्या लहान भावाचा रविवार दि. ७ रोजी दुपारी राहत्या घरात मोठ्या भाऊ संदेश खडपकर (३८) व त्याची पत्नी लतिका खडपकर यांनी खून केला. त्यानंतर सर्वेश याचा मृतदेह वारपे पेडणे येथे दरीत फेकून दिला होता. तो मृतदेह मंगळवार दि. ९ रोजी पोलिसांना सापडला व २४ तासांच्या आत खुनाला वाचा ङ्गुटली.

सर्वेश हा आपला थोरला बंधू संदेश याच्या घरात राहत होता. सर्वेश एका कॅसिनोमध्ये कामाला होता. सर्वेश याने आपल्या मित्रांकडून खूप पैसे घेतले होते. त्यामुळे देणेकरी घरी येत व सर्वेशची भावजय लतिका हिच्याकडे त्याविषयी विचारत. त्यामुळे लतिकाने त्यांना सर्वेशचा मोबाईल नंबर दिला. त्यामुळे रागाने सर्वेश याने लतिकाला शिव्या दिल्या. यामुळे लतिका व लतिकाचा नवरा संदेश यांनी सर्वेशला मारहाण केली व त्यातच त्याचा गळा आवळून खून केल्याचे शवचिकित्सा अहवाला स्पष्ट झाल्याची माहिती पेडणे पोलिसांनी दिली. मंगळवार दि. ९ रोजी पेडणे पोलिसांना पेडणे येथे एक मृतदेह सापडला होता. पंचनामा करून पोलीस याप्रकरणी तपास करत होते. त्यावेळी झायलो वाहनाने हा मृतदेह दरीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळावी व त्यावरून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यावर प्रकरण उघड झाले. या प्रकरणी संशयित दोघांनाही अटक केली असून तपास चालू आहे.