गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीवरून महाभारत

गुजरातमधून राज्यसभेवर जाण्यासाठी झालेल्या निवडणुकीने काल सायंकाळी नाट्यमय वळण घेतल्याने रात्री उशीरापर्यंत निवडणुकीची मतमोजणी सुरूच होऊ शकली नाही. कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी मतपत्रिका भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दाखविल्याचा आरोप करून कॉंग्रेसने ती मते बाद करण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.
कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांची तीन शिष्टमंडळांनी मुख्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन भूमिका मांडली. मात्र, रात्री उशिरापर्यंत आयोगाने निकाल दिला नव्हता. अहमदाबाद येथे मतमोजणी सुरू होण्यापूर्वी कॉंग्रेसच्या वतीने क्रॉसव्होटिंग करणार्‍या दोन कॉंग्रेस आमदारांची मते रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वाघेला यांच्या गोटात सामील झालेले भोलाभाई गोहिल व राघवजीभाई पटेल या कॉंग्रेस आमदारांनी आपली मते कॉंग्रेसच्या अधिकृत प्रतिनिधीला दाखविल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही दाखविले. त्यांच्या या कृतीचे व्हिडिओचित्रण झाले आहे. यात निवडणूक संचलन नियमावली, १९६१ मधील नियम ३९चे उल्लंघन झाल्याचा कॉंग्रेसचा दावा आहे.