गिरीश अंकल, मी आणि चेलुवी

  • सोनाली कुलकर्णी

‘चेलुवी’ हा माझा पहिला चित्रपट. गिरीश कर्नाडांसारख्या दिग्गज कलाकाराबरोबर तो करण्याचा योग नशिबी आला, हे माझं सुभाग्य मानते, कारण या पहिल्याच चित्रपटाने माझ्या कारकीर्दीतल्या पंखांमध्ये भरारी भरली. चित्रीकरणादरम्यान गिरीश अंकलनी मला खूप संाभाळून घेतलं. अभिनयाबाबत खुप काही शिकवलं. माझ्याकडे आजही गिरिश अंकलची खूप पत्रं आहेत. त्या सर्व आठवणींचा बंद कप्पा त्यांच्या जाण्यानं उघडला…

मी दहावीत असताना सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेत भाग घेतला होता. सत्यदेव दुबे हे नाट्यक्षेत्रात अतिशय नावाजलेले आणि आदराने घेतले जाणारे नाव. पण तेव्हाही अभिनय क्षेत्रात करिअर करायचे की नाही याविषयी मी काही ठरवले नव्हते. त्यावेळी मी नाटकांत बरीच लहान- मोठी पडद्यामागची कामे करत असे. याच दरम्यान ज्येष्ठ अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड एक नवीन चित्रपट करणार आहेत असे समजले. त्यासाठी ते संपूर्ण भारतात वेगवेगळ्या शहरांमधून कलाकारांची चाचणी घेत होते. दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई अशा वेगवेगळ्या शहरांचा त्यामध्ये समावेश होता. ह्या चित्रपटाचे नाव होते, ‘चेलुवी’.

नावावरून हा कानडी चित्रपट असावा असे वाटते, मात्र हा हिंदी चित्रपट होता. आमच्या मैत्रिणीबरोबर मीही ऍाडिशन दिली. त्यानंतर एक दिवस अचानक आमच्या काकूंकडे ङ्गोन आला. त्यावेळी आमच्याकडे ङ्गोन नव्हता. ङ्गोन गिरीश कर्नाड यांचाच होता. त्यांनी ‘तुझी चेलुवीच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी निवड झाली आहे’ असे सांगितले. या सर्वच गोष्टी खूपच अनपेक्षित होत्या. ‘माझी अकरावीची परीक्षा आहे. मी कशी शुटिंगला येऊ शकणार?’ असे मी त्यांना म्हणाले. त्यावेळी एवढ्या मोठ्या माणसाशी मी असे बोलले याचे आता आश्‍चर्यही वाटते, कारण त्यावेळी माझे वय अवघ्या सोळा वर्षांचे होते.

आता जर एखाद्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या दिग्गजाचा ङ्गोन आला, तर ती व्यक्ती परीक्षा बुडवायला पटकन तयार होईल. एवढी मोठी संधी कोणी हातातून जाऊ देणार नाही. पण गिरीश कर्नाड हे अतिशय मोठ्या मनाचे होते. माझी प्रतिक्रिया ऐकून ते शांतपणे म्हणाले, ‘असा प्रॉब्लेम आहे का? मग आपण काय करायचं? मी तुझ्या प्राचार्यांना पत्र लिहितो. तूही त्यांना पत्र लिहून, बुडालेला अभ्यास भरून काढेन असा विश्‍वास दे. म्हणजे अडचण येणार नाही.’ आणि त्यांनी खरोखरच सरांना त्याप्रमाणे पत्रही लिहिले.!
माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी हे सर्व अनपेक्षितच होते, पण गिरीश कर्नाड यांच्या नावाला एक वजन होते, आदर होता आणि आजही आहे. ‘चेलुवी’च्या निमित्ताने लाभलेल्या त्यांच्या सहवासातून त्यांच्या व्यक्त्तिमत्वाचे विविध पैलू मला जाणवले. त्यांची बुद्धिमत्ता खूपच वरच्या पातळीवरची होती. माणूस म्हणून ते खूप मोठे होते. मी त्यांना तेव्हापासून गिरीश अंकल म्हणायचेे. ‘चेलुवी’च्या चित्रीकरणाच्या सुरुवातीपासूनच गिरीश अंकलचे मला सहकार्य लाभत गेले.

पहिल्या शॅाटच्यावेळी मला कॅमेरा कोठे आहे? अँगल कोणता आहे? हे काहीच माहीत नव्हते. गिरीश अंकल मला भूमिका समजावून सांगत होते आणि त्याप्रमाणे मी करत होते. त्यावेळी माझ्या बरोबर नचिकेत, जयु पटवर्धन हे देखील होते. ते दोघे पुण्यातीलच होते. त्यामुळे मला त्यांचा खूप आधार वाटत होता. सुरुवातीचे दोन दिवस माझे आई – वडील सोबत होते. मला सिनेमाच्या चित्रीकरणाचा काहीच अंदाज नव्हता. मला पहिला शॉट करण्यापूर्वी गिरिश अंकलना नमस्कार करायचा होता, पण तो कसा करायचा हेही समजत नव्हते. शेवटी मी आई-बाबा आणि गिरिश अंकलना हिंमत करुन नमस्कार केला आणि चित्रीकरण सुरू झाले.

चित्रपटात माझे नाव चेलुवी होते. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर तो चित्रपट प्रथम आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. नंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. नंतर हा चित्रपट दूरदर्शनवरही दाखवला गेला. त्यावेळी आजच्यासारखी वाहिन्यांची गर्दी नव्हती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सोबत कोणी मैत्रीण नव्हती की आई-बाबा नव्हते. पण माझे नशिब इतके चांगले होते की, मला वेळोवेळी खूप चांगली माणसे मिळाली. त्यावेळी मी गिरीश अंकल यांच्याकडे सिनेमाचे शिबिरच केले असे आपण म्हणू शकतो. मला खूप काही शिकायला मिळाले. त्यावेळी माझी सहकारी बी जयश्री ही होती. ती कानडी अभिनेत्री होती. तसेच प्रशांत नाग होता. तो शंकर नाग यांचा पुतण्या आहे. गितांजली किर्लोस्कर होत्या. त्या आघाडीच्या रिपोर्टर आहेत. स्वतः गिरीशजी होते. आम्ही तीन- चार जण नवे होतो. अनुनभवी होतो, पण नंतर आम्ही खूप चांगले मित्र झालो. आमची एक टीमच तयार झाली होती, असे म्हणायला हरकत नाही. आम्ही सारेच लहान होतो. चित्रीकरणाच्या दरम्यान घरच्यांना पत्र टाकायचो, एस. टी. डी. बुथपाशी ङ्गोन करण्यासाठी रांगा लावायचो. या सर्वच आठवणी मनाच्या कुपीत अगदी साठवलेल्याच आहे. चित्रपट पूर्ण झाल्यानंतरही आम्ही एकमेकांना खूप पत्रे टाकायचो. माझ्याकडे आजही गिरीश अंकलची खूप पत्रे आहेत. त्यांचे सार्‍यांशीच खूप जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले होते. आम्ही चित्रपटा दरम्यान वेगवेगळे सेलिब्रेशन केले. ख्रिसमस साजरा केला, नव्या वर्षाचे स्वागत केले. एका कुटुंबाप्रमाणे आम्ही राहिलो. गिरिश अंकलनी मला खूप संाभाळून घेतले. अभिनयाबाबत खूप काही शिकवले. ‘चेलुवी’ या माझ्या कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या आठवणी आज गिरीश अंकलच्या जाण्यामुळे जाग्या झाल्या आहेत…!