गावोगावी कोरोना

सरकारच्या कोरोनासंदर्भातील नव्या रणनीतीमुळे जे घडण्याची भीती आम्ही व्यक्त केली होती, तेच आता घडू लागलेले दिसते आहे. कोरोना आता दर दिवसागणिक गोव्याच्या गावोगावी, खेडोपाडी जाऊन पोहोचू लागला आहे. मुरगावातील मांगूर हिलपासून थेट पेडण्यातील पालये, सत्तरीतील, गुळेली, शिरोली, मोर्ले, मलपण, धारबांदोड्यातील उसगाव, तिसवाडीतील चिंबल, ताळगाव, काणकोणमधील सावंतवाडा, सांग्यातील मुगोळी आणि फणसामळ असे सर्वदूर कोरोनाबाधित सापडू लागले आहेत. यापैकी बहुतेक जण हे बाह्य लक्षणविरहित असल्याने सरकार काही त्यांना आता आपल्या नव्या व्याख्येनुसार कोरोनाचे ‘रुग्ण’ मानायला तयार नाही. फार तर त्यांची रवानगी शिरोड्याच्या कोविड केअर सेंटरमध्ये केली जाईल. कोरोनाबाधितांची संख्या तीनशेपार गेली असली तरी आता सरकारच्या मते राज्यात सध्या फक्त २१ कोरोना ‘रुग्ण’ आहेत. परंतु सरकार काहीही म्हणो, राज्यात कोरोनाच्या सामाजिक संक्रमणाची भीती आता कमालीची वाढली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती प्रांजळपणे मान्य केली गेली पाहिजे.
गोव्याच्या वेगवेगळ्या भागांत आढळलेले कोरोनाबाधित हे मांगूरहिलच्या संक्रमणाशीच संबंधित असल्याचे सरकार अद्यापही सांगते आहे व त्या बाधितांची गणतीही अजून मांगूरहिलच्या आकड्यांतच केली जाते आहे. तालुक्या-तालुक्यांमधून नवनवे कोरोनाबाधित आढळून आल्याच्या ज्या बातम्या येत आहेत, त्यांचा तपशील सरकारने अजूनही आपल्या दैनंदिन प्रसिद्धी पत्रकामधून दिलेला नाही. आतापर्यंत ते सर्व आकडे मांगूरहिलच्याच आकड्यांत मिसळून दाखवले गेले. खरोखरच हे जे कोरोनाबाधित राज्याच्या वेगवेगळ्या भागांत सापडत आहेत, ते सगळे केवळ मांगूरहिलच्या संक्रमणाशीच संबंधित आहेत काय? मांगूरला सेवा बजावलेल्या आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांमुळेच कोरोना तालुक्या – तालुक्यांत पसरला असे जर सरकारचे म्हणणे असेल, तर आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांकडून खबरदारी घेण्यात त्रुटी राहिली का, त्यांचे पीपीई कीट सदोष होते का, नेमके काय झाले याचे उत्तरही अर्थातच जनतेला मिळाले पाहिजे. खरे तर या संक्रमणास कारण ठरलेल्यांमध्ये केवळ आरोग्य खात्याचेच कर्मचारी आहेत असे नाही. काही कदंबचे चालक आहेत, काही वीज खात्याचे कर्मचारी आहेत, काही टपाल खात्याचे कर्मचारी आहेत. म्हणजेच ज्यांचा जनतेशी नित्य संपर्क येतो अशा व्यक्तींना कोरोनाची बाधा झालेली आहे आणि हे संक्रमणाच्या शक्यतेचा विचार करता चिंताजनक आहे. विविध तालुक्यांत सध्या दर दिवसागणिक सापडणार्‍या कोरोनाबाधितांच्या संक्रमणाचा स्त्रोत ज्ञात असेल तर तो सरकारने त्वरित जाहीर करावा. जेव्हा हा स्त्रोत ज्ञात नसतो तेव्हा त्याला स्थानिक नव्हे, तर सामाजिक संक्रमण म्हणायचे असते हेही विसरले जाऊ नये. सरकारने हा तपशीलदेखील नियमितरीत्या व सविस्तरपणे दिला पाहिजे, कारण जेव्हा अशा घटनांसंबंधीची संपूर्ण माहिती अधिकृतरीत्या समोर येत नाही, तेव्हा समाजमाध्यमांवर नाना अफवांना ऊत येतो आणि त्यातून कोविडविरुद्धच्या लढ्याची हानीच होण्याची शक्यता असते. जनतेला विश्वासात घ्याल, तर ती सर्वतोपरी सहकार्य देईल, कोरोनाविरुद्धचा लढा जनता, सरकार आणि प्रसारमाध्यमे या सर्वांनी मिळूनच लढावा लागेल हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत. ज्या गावांमध्ये कोरोनाबाधित सापडले, तेथील जनता जागरूकपणे स्वतःहून लॉकडाऊनसारखी पावले उचलून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करते आहे ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. या गावकर्‍यांच्या मनातील संशयाचे निराकरण व्हावे यासाठी त्या प्रत्येक ठिकाणी आरोग्य खात्याने व्यापक कोविड चाचण्या करण्याची गरज आहे.
सरकारच्या कालपासून लागू झालेल्या नव्या एस. ओ. पी. नुसार यापुढे गोव्याबाहेरून राज्यात प्रवेश करणार्‍यांमध्ये कोरोनाची बाह्य लक्षणे असतील किंवा त्यांची स्वतःची इच्छा असेल तरच त्यांची कोविड चाचणी केली जाणार असल्यामुळे चौदा दिवसांच्या तथाकथित होम क्वारंटाईनवर येणार्‍या पाहुण्यांपासून राज्याला मोठा धोका संभवतो याची जाणीव आम्ही आता आम जनतेला करून देऊ इच्छितो. पंच, सरपंच, पंचायत सचिव वगैरेंवर सरकारने त्यांच्या देखरेखीची जबाबदारी सोपवली आहे. ही व्यवस्था मुळीच विश्वासपात्र नाही. प्रत्येक गावचे लोकप्रतिनिधी एवढे सक्रिय असते तर अजून काय हवे होते? शिवाय व्यावहारिकदृष्ट्याही या लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे २४ तास देखरेख ठेवणे शक्य नाही. असे होम क्वारंटाईन हे केवळ बाहेरून येणार्‍या प्रवाशापुरते नसून त्याच्या घरातील सर्व व्यक्तींसाठी आहे असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, होम क्वारंटाईनचा शिक्का केवळ राज्याबाहेरून येणार्‍याच्याच हातावर असेल. त्या घरातील इतर व्यक्तींवर नाही. त्यामुळे त्या बाहेर भटकू लागल्या तर मोठ्या गावांत आणि शहरांत इतर लोकांना ते कळणे निव्वळ अशक्य आहे. घरात ती व्यक्ती तब्बल चौदा दिवस कडक विलगीकरणाखाली राहते आहे की नाही, घरातील इतरांच्या संपर्कात आली आहे की नाही, घरातील व्यक्ती चौदा दिवसांत कधी बाहेर पडलेली आहे का हे त्यांच्यावर देखरेखीची जबाबदारी असलेल्या पंच – सरपंचांना तरी कसे कळणार? अहोरात्र त्यांनी या होम क्वारंटाईनवाल्यांच्या घरासमोर ठाण मांडून बसायची अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात सारे काही रामभरोसे असेल असे दिसते आहे, याचे कारण या चौदा दिवसांच्या विलगीकरणाच्या काळात वा नंतरही यापैकी कोणाचीही कोविड चाचणीच होणार नाही. एखाद्यामध्ये कोरोनाची बाह्य लक्षणे आढळली तरच त्याची चाचणी होऊ शकेल, परंतु त्यामध्ये कोणी लक्षणविरहित कोरोना पॉझिटिव्ह जरी असला तरी ते त्यालाही कळणार नाही वा इतरांनाही. लक्षणविरहित व्यक्ती कोरोना पसरवत नाहीत हे सिद्ध झालेले नाही याची कबुली जागतिक आरोग्य संघटनेने दिलीच आहे. त्यामुळे या परिस्थितीत सामाजिक संक्रमण सरकार कसे रोखणार आहे हे मात्र सांगणे कठीण आहे.