‘गाऊट’ : एक वातप्रकार

‘गाऊट’ : एक वातप्रकार

डॉ. संध्या कदम, होमिओपॅथी तज्ज्ञ
गाऊट हा एक वाताचा प्रकार असून तो सांध्यांमध्ये युरीक ऍसिडचे स्फटिकासारखे कण जमा झाल्यामुळे होतो. या विकारात चयापचयाच्या क्रियेत बिघाड झाल्यामुळे सांध्यांच्या भोवताल आणि मध्ये युरीक ऍसिड साचल्यामुळे तीव्र वेदना, सूज असते आणि संबंधित सांध्याची हालचाल कमी होते. गाऊट होण्याचे खरे कारण हे प्युरीनच्या मेटॅबोलिझममध्ये बिघाड होणे हे आहे. प्युरीन हा घटक बर्‍याच प्रमाणात जिवंत पेशींमध्ये तसेच बर्‍याच अन्नपदार्थांमध्ये सापडतो. युरीक ऍसिड हे शरीरातून बाहेर टाकल्या जाणार्‍या टाकाऊ पदार्थांपैकी एक आहे, जे प्युरीनवर प्रक्रिया झाल्यानंतर शरीरात तयार होते. हे युरीक ऍसिड मूत्रपिंडातून किंवा मोठ्या आतड्यांतून पूर्णपणे बाहेर टाकले न गेल्यामुळे किंवा काही गोष्टींच्या प्रभावामुळे (जसे दारू, व्यायामाचा अभाव, वजन कमी करण्यासाठी संतुलित आहारावर असणे, मांसाहार, इत्यादी) जास्त प्रमाणात शरीरात युरीक ऍसिड तयार झाल्यामुळे त्याचे गाऊटमध्ये रूपांतर होते. बर्‍याच केसेसमध्ये युरीक ऍसिड शरीराबाहेर कमी प्रमाणात का टाकले जाते याची कारणे माहीत नाहीत आणि बहुधा ती जीन्सवर अवलंबून असतात.गाऊट ही अवस्था अतिशय वेदनादायक असून ती एका वेळेला फक्त एकाच सांध्यावर प्रभाव टाकते (मोनोआर्थ्रायटीस), जास्त प्रमाणात पायाचा अंगठा! तरीसुद्धा गाऊटमध्ये कोपराचे सांधे, ढोपरं, पायाचे घोटे, मनगटं किंवा तळहाताचे किंवा पावलाचे लहान लहान सांधे यांवरही प्रभाव असू शकतो. गाऊट झालेल्या रुग्णाची लक्षणे एकदम तीव्र स्वरूपाची असतात आणि ती म्हणजे अचानक वेदना जाणवणे, सूज, लालसरपणा, उष्णता आणि सांधे अखडणे ही आहेत. बारीक तापसुद्धा असू शकतो. सांध्यावरील त्वचा सुजलेली, संवेदनशील आणि दुखरी किंवा नाजूक होते. ज्या रुग्णांमध्ये बर्‍याच दिवसांपासून रक्तातील युरीक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असते, त्यांच्या शरीरातील इतर भागातही युरीक ऍसिडचे कण साचतात ज्याला टॉफी असे म्हणतात. उदा. कानाची पाळी. या टॉफी सांध्याच्या भोवतालच्या त्वचेवर गाठीसारख्या दिसतात.
युरीक ऍसिड वाढणे हा काही रोग नाही आणि धोकादायकही नाही. पण जास्त प्रमाणात युरीक ऍसिड शरीरात राहिल्यामुळे त्याचे क्रिस्टल्स बनतात व ते सांध्याच्या मध्ये राहून गाऊट निर्माण करतात. हे कृपा करून लक्षात ठेवा की ज्यांच्या रक्तात युरीक ऍसिडचे प्रमाण जास्त असते त्या सगळ्यांना गाऊट होत नाही. एक साधी रक्त तपासणी (सिरम युरीक ऍसिड) सुद्धा निदान करण्यास सहाय्यभूत ठरते.
गाऊटच्या चार निरनिराळ्या पायर्‍या ः
* काहीही लक्षणे नसलेला – रक्तामध्ये युरीक ऍसिडची पातळी जास्त असते पण सांध्यांमध्ये कोणतीही लक्षणे नसतात.
* सुरुवातीची तीव्र अवस्था – थोड्या काळासाठी वर सांगितलेली लक्षणे दिसतात.
* गंभीर स्थितीच्या पहिलेची अवस्था – यात सांध्यांमध्ये वेदना किंवा सूज काहीच नसते. रुग्ण हा तक्रारमुक्त असतो.
* जुनाट – गाऊटचे झटके वारंवार येतात आणि या स्थितीत अनेक सांधे एकाच वेळी संक्रमित होऊ शकतात. सांध्यांभोवती टॉफीसुद्धा तयार झालेल्या दिसतात.
होमिओपॅथीचे उपचार ः
गाऊट होण्याची कारणे ही प्राकृतिक असल्यामुळे त्यावरील उपचारांची पद्धतही तशीच ठेवावी लागते. प्रथम त्या व्यक्तीचा वैयक्ति क आणि कौटुंबिक इतिहास जाणून घेणे ज्यामुळे जेनेटिक प्रवृत्ती असल्याचे निष्पन्न होते. होमिओपॅथी तीव्र गाऊटच्या झटक्यामुळे होणार्‍या वेदना कमी करण्यास मदत करते तसेच असे झटके पुन्हा येण्याचे टाळते. सांध्यांचे आखडणे कमी करून हालचाल वाढवते. ही औषधे युरीक ऍसिडची जास्त होत असलेली निर्मिती कमी करतात आणि शरीरातील जास्तीचे युरीक ऍसिड बाहेर टाकण्यास मदत करतात.
होमिओपॅथिक औषधे बेन्झोइक ऍसिड, पल्सेटिला, लायकोपोडियम आणि अर्टिका युरेन्स ही सर्वोत्तम औषधे आहेत जी युरीक ऍसिडची वाढलेली पातळी कमी करतात. आणखी एक उत्तम औषध ज्याचा उल्लेख करावाच लागेल ते म्हणजे बेरबेरीस व्हल्गॅरीस आहे. हे औषध तेव्हा वापरले जाते जेव्हा युरीक ऍसिडची पातळी जास्त असल्यामुळे किडनी स्टोन तयार होतात. गाऊट हे होमिओपॅथीने परिणामकारकरीत्या बरे होते. लेडम पाल, कोल्चिकम, बेन्झोइक ऍसिड, ब्रायोनिया आणि फॉर्मिका रुफा ही खूप परिणामकारक औषधे आहेत. जास्त युरीक ऍसिडच्या रुग्णांना होमिओपॅथीचे उपचार देण्याचा एक मोठा फायदा असतो की एकदा बरे झाल्यानंतर पुन्हा होण्याची शक्यता नसतेच!!
… जीवनशैली ः
गाऊटच्या रुग्णांमध्ये आहाराचे पथ्य पाळताना शरीरातील युरीक ऍसिडची पातळी कमी करणे, या रुग्णांमध्ये वारंवार आढळणारे आजार जसे मधुमेह, स्थूलता, उच्चरक्तदाब आणि रक्तवाहिन्या जाड होणे (ऍथरोस्न्लेरोसीस) या आजारांचे व्यवस्थापन करणे यावरच लक्ष केंद्रित करावे लागते. सर्वप्रथम डॉक्टर्स ऍनिमल प्रोटीन्स आणि प्युरीन जास्त असलेल्या पदार्थांचे आहारातील सेवन कमी करण्यास सांगतात- यामध्ये खेकडे, किडनी, लिव्हर, मांसाहारी ग्रेव्हीज आणि मटनाचा रस्सा (ब्रॉथ), अळंबी (मशरूम्स), कालवे, मटार, श्रावणघेवडा आणि सार्दिन्स या सगळ्यांमध्ये युरीक ऍसिड जास्त प्रमाणात असते. ऍसिडिटी कमी करण्यासाठी कच्ची फळे व भाज्या जास्त प्रमाणात खा!
अल्कोहोल पिण्यामुळे युरीक ऍसिड बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते. स्थूलपणा असला तरीही युरीक ऍसिडची पातळी वाढण्याची शक्यता जास्त असते.
यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंड (किडनी) निरोगी असणे गाऊटच्या उपचारासाठी महत्त्वाचे असते. हे अवयव रक्तातील युरीक ऍसिड बाहेर टाकण्यास जबाबदार असतात. डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाणी कमी होणे यामुळे मूत्रपिंडाचे कार्य बिघडते, ज्यामुळे युरीक ऍसिड जास्त साचून राहण्यास मदत करते. जास्त प्रमाणात द्रव पदार्थ, विशेषतः पाणी पिण्यामुळे आपले अवयव पाणीयुक्त राहतील व ते शरीरातील युरीक ऍसिडचे प्रमाण कमी करतील.
तरीसुद्धा शरीरही युरीक ऍसिडची निर्मिती करीत असल्यामुळे गाऊटच्या उपचारामध्ये फक्त आहारातील बदलही पुरेसे नसतात. नियमित व्यायाम आणि आरामाकरता वेळ काढणे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. अभ्यासांती असे कळते की गाऊटचा धोका वाढत्या वजनामुळे जास्त वाढतो. स्थूल व्यक्तींमध्ये गाऊटचा धोका साडेचार पटीने जास्त असतो. संशोधकांनी असाही निष्कर्ष काढला आहे की उच्चरक्तदाबाच्या रुग्णांमध्येही गाऊट होण्याचा धोका जास्त असतो. प्रदाह (इन्फ्लेमेशन)मुळे होणार्‍या वेदना, पाण्यातील ऍरोबिक्स आणि योगा हे गाऊटच्या रुग्णांकरिता सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहेत.
माशांचे तेल आणि इतर पदार्थ ज्यामध्ये ओमेगा-३ असते (आक्रोड, सोया उत्पादने) हे वेदना आणि सूज कमी करण्यास साहाय्यभूत ठरतात.