ब्रेकिंग न्यूज़

गर्भाशय मुख कर्करोग भाग – ३

– डॉ. स्वाती अणवेकर
ज्या रुग्णांमध्ये कर्करोगाचा प्रसार हा गर्भाशयमुख व कटी भागातील पेशींपर्यंत झाला असेल तेव्हा यात फक्त शस्त्रक्रिया करून थांबणे पुरेसे नसते. तर अशा रुग्णांना फक्त रेडिओथेरपी अथवा शस्त्रक्रिया व रेडिओथेरपीचा वापर करावा लागतो. हल्लीच्या काळात रेडिओथेरपीसोबत किमोथेरपीदेखील दिली जाते
गर्भाशय मुख कर्करोग निदान
या कर्करोगाचे निदान करण्यासाठी सर्वप्रथम पॅप स्मिअर टेस्ट करून गर्भाशयमुख पेशींमध्ये काही अनावश्यक बदल आहेत की नाही ते तपासून पहावे लागते. जर का असे बदल या टेस्टमध्ये आढळून आले तर मग पुढे त्या भागाची बायॉप्सी करून पाहिली जाते. यात डॉक्टर गर्भाशय मुखावरील त्वचेचा एक छोटासा भाग काढतात व तो पॅथॉलॉजिस्टकडे तपासणीसाठी पाठवला जातो. तिथे त्या भागात कर्करोगाची पूर्वावस्था आहे का की कर्करोगाच्या पेशी वाढलेल्या आहेत याची सखोल तपासणी केली जाते.
दुसरी एक टेस्ट असते ज्याला शिलर (डलहळश्रश्रशी) टेस्ट असे म्हणतात. यात डॉक्टर रुग्णाच्या गर्भाशय मुखाला आयोडिन द्रवाचा लेप लावतात. आयोडिन लावल्यावर त्या भागातील प्राकृत पेशी या ब्राऊन रंगाच्या होतात तर ज्या पेशी विकृत असतात त्या पिवळ्या दिसू लागतात.
यातील अजून एक प्रकार आहे ‘कोन बायॉप्सी’. जर वरील टेस्ट करून डॉक्टरांना निदान समजत नसेल तर मग ते गर्भाशय मुखाचा थोडा जास्त मोठा कोनाच्या आकाराचा तुकडा काढतात. अशा प्रकारची बायॉप्सी ही उपचार स्वरूपदेखील केली जाते- ज्याचा उपयोग कर्करोगाची पूर्वावस्था अथवा कर्करोगाची अगदी प्राथमिक अवस्था यात होतो. या प्रकारच्या बायॉप्सीने ९०%पेक्षा जास्त कर्करोग पुढील कोणतेही उपचार न करता आटोक्यात राहू शकतात.
सिस्टोस्कोपी व इतर चाचण्या –
जर डॉक्टरांना अशी शंका असेल की हा कर्करोग गर्भाशयमुखापेक्षा अधिक पसरला आहे तर अशा वेळी रुग्णाला सिस्टोस्कोपी, प्रोक्टोस्कोपी, छातीचा एक्स-रे, अन्य चाचण्या जसे सीटीस्कॅन, कंबरेचा एम्‌आर्‌आय् या तपासण्या केल्या जातात.
गर्भाशय मुख कर्करोगाच्या अवस्था –
……………………………………………………..
कर्करोगाची अवस्था कर्करोगाचा प्रसार
………………………………………………..
अवस्था १ गर्भाशय मुखापर्यंत
अवस्था २ योनीचा वरचा भाग व आजुबाजूच्या पेशी
अवस्था ३ योनीचा खालचा भाग व कटीमधील भिंती
अवस्था ४ मूत्राशय, गुद व अन्य भागात.
………………………………………………………..
गर्भाशयमुख कर्करोगावरील उपचार ः-
या कर्करोगावर उपचार करताना रोगाची अवस्था जाणून घेणे महत्त्वाचे असते. कर्करोगाचा आकार, तो किती खोलवर पसरला आहे, त्याचा प्रसार शरीराच्या अन्य भागात झाला आहे का यावर उपचारांची दिशा ठरते. प्राथमिक उपचारांमध्ये शस्त्रक्रिया व रेडिओथेरपी व किमोथेरपी यांचा समावेश असतो.
कर्करोगाच्या पूर्वावस्थेतील उपचार ः-
यात रोग हा गर्भाशयमुखाच्या एका छोट्याशा भागापर्यंतच सिमित असतो. यात लेसर शस्त्रक्रिया, कोन बायॉप्सी असे उपचार केले जातात. जर ही कर्करोगाची पूर्वावस्था असेल तर या उपचारांनी त्याचे रुपांतर कर्करोगात होत नाही.
कर्करोगाची प्राथमिक अवस्था ः
यात रोगाचा प्रसार फक्त गर्भाशयमुखापर्यंतच असतो. यात एक तर शस्त्रक्रिया करून पूर्ण गर्भाशयच काढलं जातं. कधी कधी कटी भागातील लसिका ग्रंथी काढून त्यांचीदेखील तपासणी केली जाते. जर कर्करोगाचा प्रसार कटी भागातील लसिका ग्रंथी तसेच लसिका वाहन करणार्‍या नलिका व गर्भाशयातील रक्तवाहिन्या व गर्भाशयातील पेशींपर्यंत झाला असल्यास शस्त्रक्रियेसोबत रेडिओथेरपी व किमोथेरपी हे उपचारदेखील घ्यावे लागतात.
प्रसार पावलेला कर्करोग ः-
ज्या रुग्णांमध्ये कर्करोगाचा प्रसार हा गर्भाशयमुख व कटी भागातील पेशींपर्यंत झाला असेल तेव्हा यात फक्त शस्त्रक्रिया करून थांबणे पुरेसे नसते. तर अशा रुग्णांना फक्त रेडिओथेरपी अथवा शस्त्रक्रिया व रेडिओथेरपीचा वापर करावा लागतो. हल्लीच्या काळात रेडिओथेरपीसोबत किमोथेरपीदेखील दिली जाते.
पुनरुद्भव झालेल्या गर्भाशयमुख कर्करोगातील उपचार ः-
ज्या स्त्रियांमध्ये रोगाचा प्रसार हा कटीपेक्षा पुढे गेला असेल, हा रोगाचा पुनरुद्भव असेल तर अशा स्त्रियांमध्ये कर्करोगाचा त्रास देणारी लक्षणे कमी करून रुग्णाचे जीवन सुसह्य बनविण्यास किमोथेरपीचा वापर केला जातो. ज्या स्त्रियांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव कटीमध्ये झाला असेल त्यांच्यावर उपचार करताना शस्त्रक्रिया करावी लागते.
आपण या कर्करोगापासून स्वतःचा बचाव कसा करावा हे पूर्वीच्या लेखांमध्ये पाहिलेले आहे.