गरिबांच्या मोफत अन्न योजनेत नोव्हेंबरपर्यंत वाढ ः पंतप्रधान

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. पुढील ५ महिन्यांसाठी ८० कोटींहून अधिक गरीब नागरिकांना ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणे दिले जाणार आहेत. काल मंगळवारी देशवासीयांना व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी वरील घोषणा केली.

यावेळी पंतप्रधानांनी, केंद्र सरकार आता संपूर्ण देशात एक रेशनकार्ड योजना लागू करणार असल्याचे सांगितले. या पुढे कोणीही कोठूनही आपले रेशन प्राप्त करू शकतो. गरीब, गरजवंतांना जर सरकार मोफत धान्य देत असेल तर त्याचे श्रेय देशातील शेतकरी आणि प्रामाणिक करदात्यांना जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

नियमांचे पालन करा
देशात आपण वेळेत लॉकडाऊन सुरू केल्यामुळे आमची स्थिती जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी नियमांचे पालन केलेच पाहिजे. जे लोक नियमांचे पालन करत नाहीत त्यांना समज द्यावी लागेल. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याबाबत स्थानिक प्रशासनाने सतर्कता दाखवावी असे पंतप्रधान म्हणाले.

भारतात संरपंच असो की देशाचा पंतप्रधान असो, कोणीही नियमांच्या वर नाही, असे सांगून देशातील १३० कोटी जनतेला एकत्र येऊन काम केले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले तरच आपण स्वावलंबी भारत बनवू शकू.

अनलॉक १ सुरू झाल्यापासून देशात जरा बेजबाबदारपणा वाढला असल्याचे सांगून त्यावर पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली व प्रतिबंधित क्षेत्रावर विशेष लक्ष द्यावेच लागेल असे सांगितले. अनलॉक १ मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना पाहण्यास मिळाला. हे योग्य नाही असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अत्यंत गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले. आता पुन्हा एकदा राज्य सरकार, नागरिक आणि संस्थांनी तशी सतर्कता बाळगावी. खास करुन कंटेटमेन्ट झोनची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आता अनलॉक २ सुरू करताना आपल्याला अधिक काळजी घ्यायची आहे. निष्काळजीपणा करू नका असेही त्यांनी सांगितले. दुसर्‍या अनलॉकमध्ये जाताना लोकांमध्ये बेजाबदारपणा वाढल्याचे दिसत असल्याचेही यावेळी पंतप्रधानांनी नमूद केले.