ब्रेकिंग न्यूज़

गरज सन्मानाची

गेल्या वर्षी हॉलिवूडमध्ये खळबळ माजवणार्‍या ‘मी टू’ चळवळीने आता भारतातील माध्यम आणि मनोरंजन उद्योगामधील बड्या बड्या प्रस्थांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याने सध्या देश हादरला आहे. अनेकांच्या पायांखालची वाळू या चळवळीमुळे सरकली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेला आरोप, विनता नंदांनी अभिनेते आलोकनाथ यांच्यावर केलेला आरोप, आणि किमान सहा महिला पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार एम. जे. अकबर यांच्यावर केलेले आरोप आणि अशाच स्वरूपाच्या अन्य सगळ्या प्रकरणांमधून एकच गोष्ट सूचित होते ती म्हणजे महिलांकडे पाहण्याची पुरुषी मानसिकता. ह्या तक्रारी अनेक वर्षांपूर्वीच्या घटनांना पुढे करून करण्यात आल्या आहेत, त्यामुळे त्यांची सत्यासत्यता पुराव्यांनिशी सिद्ध करणे तसे कठीण आहे, परंतु त्यातून जे विदारक सामाजिक सत्य समोर येते आहे, ते मुळीच दुर्लक्षिता येणारे नाही. आज कोणतेही क्षेत्र नसेल ज्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार घडत नसतील. शिक्षणसंस्थांपासून न्यायसंस्थेपर्यंत आणि माध्यम क्षेत्रापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत हे आरोप झालेले आहेत हे लक्षात घ्यायला हवे. या क्षेत्रांमध्ये असलेली स्पर्धा, राजकारण, असूया, त्यातून निर्माण होणारे हेवेदावे वगैरे भाग जरी अशा प्रकारच्या तक्रारींमागे असू शकत असला तरी तो काही अशा आरोपांचा बचाव होऊ शकत नाही. त्यासाठी आरोप झालेल्या सर्वांनी आपले निरपराधित्व सिद्ध करणे आवश्यक आहे. या सार्‍या शारीरिक लगटीच्या ज्या काही कहाण्या आज पुढे आलेल्या आहेत, त्यामध्ये केवळ लैंगिक छळणुकीचा उद्देश होता की दोन व्यक्तींमधील आकर्षणाचा आणि त्यातून उमलणार्‍या नात्याचा भाग होता हाही प्रश्न अर्थातच महत्त्वाचा ठरेल, कारण पुढे बिनसलेल्या नात्यांतून निर्माण झालेल्या कटुतेमधूनही असे हेत्वारोप एखाद्यावर होऊ शकतात, परंतु जेव्हा एकापेक्षा अनेक व्यक्तींकडून अशा प्रकारचे आरोप होतात आणि सारा घटनाक्रम सांगितला जातो, तेव्हा ते केवळ तक्रार अनेक वर्षांनंतर आली आहे म्हणून निकाली काढता येणार नाहीत. एम. जे. अकबर यांचेच जर उदाहरण घेतले तर त्यांच्यावरचा आरोप हा खरे तर पत्रकार प्रिया रामाणी यांनी गेल्या वर्षी ‘वोग’ नियतकालिकातील आपल्या लेखातून केला होता. फक्त त्यांनी तेव्हा त्यांचे नाव उघड केलेले नव्हते. आपल्याला अकबर यांनी दक्षिण मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये मुलाखतीसाठी बोलावले आणि ही मुलाखत कमी आणि ‘डेट’ जास्त होती असे त्यांनी लिहिले होते. आता त्यांनी अकबर यांचे नाव उघड केले आणि त्यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. पत्रकारितेच्या नोकरीसाठीची मुलाखत अशी एकट्याने आणि हॉटेलच्या खोलीत का व्हायची याचे उत्तर आता अकबर यांनी नक्कीच दिले पाहिजे. खरे तर आज नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या अकबर यांनी या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देणेच योग्य ठरेल. ते तसे करणार नसतील तर महिला सन्मानाची बात करणार्‍या मोदींनी त्यांना डच्चू देणे आवश्यक आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरुद्ध केलेली तक्रारही आठ वर्षांपूर्वीच्या एका घटनेसंदर्भात आहे. नानांनी नृत्य शिकवण्याच्या बहाण्याने सेटवर आपल्याशी अनुचित व्यवहार केला असे तिचे म्हणणे आहे. आता सेटवरच्या एवढ्या लोकांसमोर नाना पाटेकर तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करीत होते असे म्हणणे तसे किमान मराठी जनांच्या पचनी पडणारे नाही, त्यामुळे ‘मी टू’ चळवळीला समर्थन देत असतानाच त्या तक्रारींची सत्यासत्यता तपासणेही तितकेच आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. सवंग प्रसिद्धीसाठी मान्यवर व्यक्तीवर भलतेसलते आरोप करण्याचे प्रकारही अधूनमधून घडत असतात. त्याची लागण ह्या ‘मी टू’ चळवळीलाही लागू नये. त्यामुळे ‘मी टू’ चळवळीची धार कमी होऊ द्यायची नसेल तर त्यासंदर्भातील गांभीर्य कायम राहिले पाहिजे. नाही तर या मोहिमेचा उलटा परिणाम म्हणून महिला कर्मचार्‍यांना नोकरीवरच न घेण्याचे प्रकारही यापुढे होऊ लागतील. या सार्‍या गदारोळाचे सार एकच आहे ते स्त्रियांना समाजात सन्मानाने वागवले जाईल असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. आज स्त्रिया सर्व प्रकारची नोकरी करतात. तेथे त्यांच्यासाठी मोकळे आणि पारदर्शक वातावरण तयार करणे ही संस्था प्रमुखांची जबाबदारी ठरते. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात विशाखा मार्गदर्शक तत्त्वे १९९७ साली जारी केलेली होती. त्यानुसार महिलांना लैंगिक छळणुकीची तक्रार करण्यासाठी प्रत्येक आस्थापनामध्ये एक समिती असणे आवश्यक आहे. आजही अनेक संस्थांमध्ये अशी व्यवस्था नाही. महिलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात मनाई, प्रतिबंध आणि निराकरण अशी त्रिस्तरीय व्यवस्था करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे. दुर्दैवाने अशा तक्रारी आल्या तरी त्यांची तड लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. ती कशी लागेल आणि आपली कार्यसंस्कृती महिलावर्गासाठी अधिक पूरक आणि प्रेरक कशी ठरेल यावर लक्ष देणे हाच या गदारोळातून घेता येण्यासारखा धडा आहे.