गरज सजगतेची

इस्रायली स्पायवेअर पेगाससने व्हॉटस्‌ऍप या लोकप्रिय ऍपमधील संदेशवहनावर हेरगिरी केल्याच्या प्रकरणामध्ये खरा दोषी कोण हे अद्याप देशासमोर आलेले नाही. व्हॉटस्‌ऍप वापरकर्त्यांच्या फोनमध्ये शिरकाव करून त्यावरून होणार्‍या संदेशांची सायबर टेहळणी होत असल्याचे जेव्हा सदर कंपनीच्या निदर्शनास आले, तेव्हा व्हॉटस्‌ऍपने वापरकर्त्यांना त्या धोक्याविषयी सूचित केले. आता ज्या इस्रायली सॉफ्टवेअरने ही हेरगिरी केली त्यावर त्यांनी खटला गुदरला आहे, त्यातून हे ऑनलाइन हेरगिरीचे प्रकरण उजेडात आले आहे. भारतातील ज्या व्हॉटस्‌ऍप वापरकर्त्यांचे फोन हॅक झाल्याचे आढळून आले आहे, ते बहुतेकजण सत्ताधारी सरकारच्या विरोधी विचारांचे असल्याने ही हेरगिरी नेमकी कोण करीत होते असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सरकारने जरी कितीही सारवासारव केली तरी त्यावरील संशयाची सुई दूर हटू शकलेली नाही. जगातील कोणत्याही सरकारला अशा प्रकारच्या हेरगिरीचा मोह होऊ शकतो. महाबलाढ्य अमेरिकेने त्यासाठी प्रिझम प्रोजेक्टसारखे प्रचंड खर्चिक प्रकल्प कसे निर्माण केले आणि एडवर्ड स्नोडेनसारख्या व्हिसलब्लोअरमुळे ते कसे जगापुढे उघडे पडले याविषयी आपण वाचलेच असेल. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव एखाद्या समाजघटकाप्रतीची माहिती गोळा केली जाते तेथवर ठीक, परंतु आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना, व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी म्हणून जेव्हा अशा साधनांचा दुरुपयोग होतो तेव्हा ती अतिशय गंभीर बाब असते आणि आपल्या मूलभूत वैयक्तिक अधिकारांवरील ते अतिक्रमण असते. ‘पेगासस’ आणि ‘व्हॉटस्‌ऍप’ वादामध्ये पेगाससच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे की आम्ही आमचे सॉफ्टवेअर केवळ सरकारी यंत्रणांनाच विकत असतो. आम्ही कोणत्याही पत्रकाराला किंवा सामाजिक कार्यकर्त्याला लक्ष्य केलेले नाही. त्यांचे हे म्हणणे पटण्याजोगे आहे, त्यामुळे ही हेरगिरी करणारी सरकारी यंत्रणा नेमकी कोणती होती, तिचे हेरगिरीमागचे उद्देश कोणते होते यासंबंधी साशंकता निर्माण झालेली आहे. ‘पेगासस’ हे इस्रायली सॉफ्टवेअर हेरगिरीचे एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर आहे, जे नुसत्या मिस् कॉलद्वारे देखील दुसर्‍याच्या फोनमध्ये शिरकाव करून त्याचा कॅमेरा आणि माइक यावर ताबा मिळवू शकते. व्हॉटस्‌ऍपने खटला गुदरला असल्याने त्याच्या संदेशवहनाच्या हेरगिरीचा विषय सध्या ऐरणवीर असला तरी प्रत्यक्षात हे सॉफ्टवेअर अन्य ऍप्सच्या माध्यमातूनही हेरगिरी करीत नसेल याची शाश्‍वती नाही. थेट वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्ये घुसण्यासाठी अन्य ऍप्सची मदतही पेगासस किंवा तशा प्रकारची इतर स्पायवेअर घेऊ शकतात. त्यामुळे मोबाईलविना पानही हलत नसलेल्या, परंतु सायबरसुरक्षेबाबत आणि स्वतःच्या प्रायव्हसीबाबत अडाणीच असलेल्या कोट्यवधी भारतीय फोनधारकांच्या खासगीपणाच्या सुरक्षिततेचा मोठा गंभीर प्रश्न आज उपस्थित झालेला आहे. कोणतेही ऍप डाऊनलोड होत असते, तेव्हा आपल्याला अनेक परवानग्या मागत असते. एसएमएस आणि कॉल लॉग वाचण्यापासून लोकेशनपर्यंत नाना प्रकारच्या परवानग्या कोणतेही ऍप डाऊनलोड होत असताना आपल्याजवळ मागते आणि आपण ऍप डाऊलनोड करण्याच्या नादात निःशंकपणे त्या देऊन टाकत असतो. त्यातून आपल्या मोबाईलची सूत्रे दूर कुठेतरी दडलेल्या त्या सॉफ्टवेअरच्या निर्मात्याकडे जाऊन पोहोचत असतात याचे भानही आपल्याला नसते. अनेकदा गरज नसताना सुद्धा काही ऍप्स नाही नाही त्या परवानग्या फोनधारकाकडे मागतात तेव्हा त्याच्याविषयी मोबाईलधारकाला संशय तरी यायला हवा. परंतु निव्वळ सायबर अडाणीपणामुळे या गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही. त्यातून आपल्या संबंधीची खडान्‌खडा माहिती आपण इतरांना नकळत देत असतो. नुसती गुगल ऍक्टिव्हिटी जरी तपासली तरी आपण दिवसभरात कुठे कुठे गेलो, काय केले, कोणाला भेटलो तो सारा तपशील त्यावरून कळू शकतो. परंतु याचे गांभीर्य लक्षात न आल्याने आपण गाफील राहतो आणि त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. फोनद्वारे आर्थिक फसवणूक होण्याच्या कित्येक घटना अलीकडच्या काळात घडलेल्या आहेत. केवळ फसवणुकीच्या दृष्टीनेच नव्हे, तर अनेक प्रकारे आपल्या वैयक्तिक डेटाचा दुरुपयोग होऊ शकतो आणि नित्य होतही असतो. डेटा सायन्स हा आजच्या युगाचा परवलीचा शब्द बनलेला आहे. प्रत्येक इंटरनेटधारकाच्या आवडीनिवडी, सवयी, त्याच्या उत्कंठेचे विषय या सगळ्या डेटाचे विश्लेषण करून त्याच्यासंबंधीचे परिपूर्ण आडाखे बनवून त्याचा व्यावसायिक दुरुपयोग करणारी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सयुक्त साधने विकसित झालेली आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये देखील व्यक्तिगत माहितीचे विश्लेषण करून त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून जनमत कसे कृत्रिमरीत्या बनवले वा बिघडवले जाते त्याची उदाहरणे यापूर्वी आपल्यासमोर आलेली आहेत. त्यामुळे या सगळ्याप्रती सजगता हाच आजच्या काळातील तरणोपाय आहे.