गरजेनुसार मर्यादित भाग निर्बंधित ः मुख्यमंत्री

राज्यातील ज्या ज्या भागात कोरोनो पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढते त्या भागात गरजेनुसार लहान – लहान भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येणार्‍या भागातील नागरिकांच्या स्वॅब चाचण्या केल्या जात आहेत. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढणार्‍या भागात लहान लहान प्रतिबंधित क्षेत्र घोषित केली जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात मांगूर हिल, घोडेमळ सत्तरी येथील भागात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. आता, सडा वास्को येथील काही भागात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. चिंबल, बायणा, कुडतरी या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत.

तोवर सरकारी कर्मचार्‍याने
कामावर येऊ नये
राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील कुणालाही कोरोना विषाणूची बाधा झालेली असल्यास त्या कर्मचार्‍याने कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत कार्यालयात येऊ नये, असा आदेश सर्वसाधारण प्रशासनाने काल जारी केला आहे. अशा कर्मचार्‍याने आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती द्यावी. त्या कर्मचार्‍याला घरातून काम करण्याची मोकळीक मिळू शकते. तो कर्मचारी दूरध्वनी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपलब्ध असला पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे.
वास्को भागात काम करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. या पार्श्‍वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला असून सरकारची विविध खाती, महामंडळे, स्वायत्त संस्था व इतर सरकारी खात्यांना हा आदेश लागू होत आहे.

वास्कोतील काही भाग प्रतिबंधित
मुरगाव सडा येथील प्रभाग ४ तर वास्को येथील प्रभाग ९ मधील काही भाग मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. याठिकाणी पोलिंसातर्फे नाकाबंदी करण्यात आली आहे. सडा येथे कोरोना संक्रमितांची संख्या १३ वर झाली असून बायणामध्ये ९ कोरोना संक्रमित आढळले आहेत.

वास्को मांगूर हिलनंतर कोरोना विषाणूची लागण सध्या मुरगाव बायणात पोहोचली आहे. मुरगाव पालिकेच्या सडा प्रभाग ४ मध्ये राज्य आरोग्य विभागाने या भागातील साईबाबा मंदिर, सरकारी शाळा, श्री ब्राह्मणेश्वर मंदिर, मशीद, पोस्ट कर्मचार्‍यांची वसाहत सध्या मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तर पालिकेच्या प्रभाग ९ मधील काटे बायणा भागातील काही भाग निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.

सडा प्रभाग ४ मधील नागरिकांचे शुक्रवारी ५६ जणांचे नमुने घेण्यात आले होते. तर आजपासून बायणा व सडा स्वॅब चाचणी करण्यात येईल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.