गणेश चतुर्थीपूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविणार

गणेश चतुर्थीपूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविणार

राज्यातील बारा तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजविण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल विधानसभेत दिली.

आमदारांनी राज्यातील विविध भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील खड्‌ड्याबाबत चिंता व्यक्त केली होती. रस्त्यावरील खड्‌ड्यांमुळे दुचाकी वाहन चालकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्‌ड्यांमुळे नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. तसेच अनेक नागरिक अपघातात गंभीर जखमी होत आहेत, असे आमदारांनी निदर्शनास आणून दिले.

यावर्षी मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आलेली नाहीत. रस्त्याच्या बाजूच्या गटारातील गाळ उपसण्यात आलेला नाही. रस्त्याच्या बाजूला झाडे झुडपे वाढलेली आहेत, असे आन्तोनियो ङ्गर्नांडिस यांनी सांगितले. रस्त्यावरील खड्डे वाहन चालकांसाठी धोकादायक बनले आहेत असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले.

बांधकाम खात्याच्या संबंधित अधिकार्‍यांना रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला गती देण्याची सूचना केली आहे. येत्या गणेश चतुर्थीपूर्वी खड्‌ड्याची दुरुस्ती करून वाहन चालकांना दिलासा देण्यात येणार आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडेझुडपे तोडण्यात येणार आहेत. तसेच गटारातील गाळ उपसण्यात येणार आहे, असे मंत्री पाऊसकर यांनी सांगितले. डांबराच्या अभावामुळे रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाची ३० टक्के कामे अडकून पडल्याने रस्त्यावरील खड्‌ड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते. त्याठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले नाही.
रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम देण्यात येणार्‍या कंत्राटदारांना रस्त्याची देखभाल तीन वर्षे करण्याची सक्ती केली जाणार आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यास त्या खड्‌ड्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराला करावी लागणार आहे.