गडचिरोलीचे शहीद

कालच्या महाराष्ट्र दिनी त्या राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सोळा जवान शहीद झाले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगढच्या दांतेवाडात भाजपचे आमदार भीमा मंडावी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला चढवून नक्षलवाद्यांनी त्यांचा बळी घेतला होता. वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवादी अशा प्रकारे अधूनमधून डोके वर काढून आपले अस्तित्व दाखवून देत असतात. देशाच्या बर्‍याच भागांतून नक्षल्यांचे उच्चाटन जरी झालेले असले, तरी अजूनही ही कीड संपलेली नाही हेच अशा घटनांतून दिसत आहे. वास्तविक, गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांचा प्रभाव अलीकडे कमी कमी होत चालला आहे. नागरिक नक्षलवादी चळवळीला विरोध करण्यासाठी धैर्याने पुढे येत आहेत. कित्येक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे. पोलिसांच्या ‘नवजीवन’ योजनेमुळे नागरिक आणि पोलीस यांच्यात संवाद निर्माण होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांत नक्षलग्रस्त भागांत विकासाची कामे हाती घेतली गेली आहेत. जागृत झालेला आदिवासी आपल्या मुलांना शिक्षणासाठी परगावी पाठवून त्यांना शिक्षित करू पाहतो आहे. त्यामुळे नक्षल्यांना नवी भरती करणे कठीण होऊ लागले आहे. अनेक गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे. त्यांनी लावलेले बॅनर काढून जाळले जात आहेत. जवळजवळ सहाशे नक्षल्यांनी आजवर आत्मसमर्पण केले आहे. या सार्‍या बदलांमुळे नक्षलवादी चळवळीचा कणाच मोडण्याची वेळ आलेली असल्याने बिथरलेले हे सैतान अशा घातपाती कारवायांमागे लागले आहेत. गेल्या काही वर्षांत अशा स्फोटांसाठी काश्मिरी दहशतवाद्यांप्रमाणे आयईडीचा वापर केला जाताना दिसतो आहे. त्या तंत्राद्वारे घडवलेल्या भीषण स्फोटात वाहनांचे तुकडे तुकडे होतात. काल हल्ला झालेल्या वाहनाची गत पाहिली तरी शहीद पोलीस कमांडो कशा भीषण प्रकारे मृत्यूला सामोरे गेले याची कल्पना येते आणि थरकाप उडतो. खरे तर गेल्या सात – आठ वर्षांत नक्षलवाद्यांविरुद्ध केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे यांनी संयुक्तपणे चालवलेल्या मोहिमांचा परिणाम नक्षलग्रस्त भागांत दिसू लागला आहे. गडचिरोलीमध्ये देखील अलीकडच्या काळात स्थानिक बँक खात्यांत नक्षलवाद्यांसाठी कोेट्यवधींचा भरणा करणार्‍यांना अटक झालेली आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध सातत्याने मोहिमा राबवल्या जात आहेत. नक्षल्यांविरुद्ध एकीकडे मैदानी कारवाई सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या शहरी पाठीराख्यांनाही धडा शिकवला गेला. मध्यंतरी ठिकठिकाणी छाप्यांत ही बुद्धिवादी मंडळी पकडली गेल्यावर त्या कारवाईविरुद्ध काहींनी केवढा गहजब केला, परंतु असे भीषण हल्ले होतात तेव्हा हीच मंडळी करकोच्यासारखी जमिनीत मान खुपसून गप्प बसते. नक्षलवादी कारवायांसाठी, स्फोटकांसाठी, शस्त्रास्त्रांसाठी येणारा पैसा येतो कुठून आणि कसा? रानावनांत हल्ले चढवणार्‍या या नक्षली नेत्यांपर्यंत हा पैसा पुरवते कोण? केवळ खंडणीखोरीतून ही शस्त्रास्त्रे, स्फोटके मिळणे शक्य नाही. म्हणजेच हे एक सुनियोजित आंतरराष्ट्रीय जाळे असते आणि शहरी नक्षली हा त्यातील महत्त्वाचा दुवा असतो. सरकारने त्याच दुव्यावर प्रहार केला. त्यामुळे बिथरलेल्या नक्षल्यांनी निर्दयी हल्ले चढवायला सुरूवात केलेली आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोलीत ऐंशीच्या दशकापासून नक्षलवादी चळवळ घुसली. तेंदुपत्ता मजुरीवर रोजीरोटी असणार्‍या आदिवासींना त्यांचे शोषण होत असल्याचे सांगत त्यांची सहानुभूती मिळवत त्यांना सशस्त्र क्रांतीचे वेडे स्वप्न दाखवून या नक्षल्यांनी नादी लावले. त्यांची ससेहोलपट केली. विकासवाटा त्यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. काल देखील पोलिसांवर हल्ला चढवण्यापूर्वी या नक्षल्यांनी तेथील रस्त्याचे बांधकाम करणार्‍या कंत्राटदाराची तीस वाहने जाळून टाकली होती. त्याचीच पाहणी करण्यासाठी हे पोलीस कमांडो चालले असताना त्यांचा बळी घेतला गेला. आपल्यासमोर वाढून ठेवलेल्या मृत्यूच्या ताटाची चाहुल या जवानांना लागली नाही. याला कोणी गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणेल, परंतु दुर्गम, आदिवासी भागामध्ये गुप्तपणे मोठ्या संख्येने एकत्र येणे आणि हल्ले चढवून पसार होणे हे नक्षल्यांचे तंत्र पाहता अशी पूर्वसूचना मिळणे कठीण असते. कालच्या हल्ल्यात देखील दोनशेच्या आसपास नक्षलवादी सामील झालेले होते. वेगवेगळ्या राज्यांतून अशा मोहिमांसाठी लाल कॉरिडॉरमधून ही मंडळी एकत्र जमते आणि हल्ले चढवते. हा काही स्थानिक आदिवासींचा उठाव नव्हे. हा सरळसरळ या देशामध्ये अराजक पसरवण्याच्या साठच्या दशकापासून चाललेल्या आधी मार्क्सवादी – लेनीनवादी आणि आता माओवाद्यांनी चालवलेल्या सुनियोजित कटकारस्थानाचाच नवा अध्याय आहे. नक्षलवाद्यांची चहुबाजूंनी कोंडी होत असल्याने आता ते अधिक हिंसक होतील असा कयास माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी व्यक्त केला होता. गेल्या काही दिवसांत ते दिसू लागले आहे. अन्य दहशतवादी संघटनांपेक्षा नक्षल्यांचे जाळे अधिक प्रभावी असल्याने आणि त्यांना दुर्गम जंगलांचा आसरा असल्याने ही विषवल्ली निपटून काढणे कठीण असले तरी अत्यावश्यक आहे.