गगनभरारी

भारताची अंतरिक्ष विज्ञानाची पंढरी असलेल्या ‘इस्रो’ ने चंद्रयान – २ च्या अपयशाच्या राखेतून उठत ‘चंद्रयान -३’ आणि ‘गगनयान’ मोहिमांची घोषणा करीत नववर्षातील नवसंकल्पांची ललकार दिली आहे. आपले चंद्रयान २ चंद्रापर्यंत अगती नियोजनबरहुकूम पोहोचले, परंतु त्याच्या पृष्ठभागावर उतरताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि शेवटचे काही सेकंद असताना ते चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने आदळले आणि निकामी ठरले. त्या अपयशापासून धडा घेऊन आणि त्यानुसार काही धोरणात्मक बदल करून इस्त्रोने चंद्रयान ३ ची घोषणा केली आहे. मागील वेळेस झालेल्या चुका सुधारून चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचे आपले स्वप्न साकारण्याचा निर्धार ‘इस्रो’ने केला आहे आणि भारतासाठी हे अभिमानास्पद आहे. चंद्रयान २ मोहीम जरी अपयशी ठरली तरी संपूर्ण भारत एकदिलाने ‘इस्रो’ आणि त्याच्या वैज्ञानिकांच्या पाठीशी उभा होता, कारण त्यांच्या क्षमतांवर देशाला पूर्ण विश्वास आहे. हा विश्वास ‘इस्रो’नेच आजवरच्या प्रदीर्घ कार्यातून देशाला मिळवून दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय नेतृत्वाने देखील चांद्रयान २ च्या अपयशानंतर अत्यंत भावस्पर्शी देहबोलीतून ‘इस्रो’च्या प्रमुखांचे सांत्वन करून त्यांच्या आणि सहकार्‍यांप्रतीचा विश्वासच व्यक्त केला होता. या विश्वास आणि पाठबळामुळेच चंद्रयान ३ ची मुहूर्तमेढ अल्पावधीत रोवली गेली आहे आणि भारत त्यामध्ये निश्‍चित यशस्वी होईल असा दृढ विश्वासही देशभरात व्यक्त होताना दिसून येतो आहे. ‘इस्रो’ची दुसरी घोषणा तर अत्यंत महत्त्वाची आहे. ‘गगनयान’ म्हणजे मानवयुक्त अवकाशयान अंतराळात पाठविण्याचा जो संकल्प ‘इस्रो’ने यापूर्वी सोडलेला आहे, तो सिद्धीस जाणे आता दृष्टिपथात असून भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची त्यासाठी प्रत्यक्षात निवड करण्यात आल्याचे ‘इस्रो‘च्या प्रमुखांनी नुकतेच जाहीर केले आहे. अंतराळात जाण्यासाठी, वास्तव्य करण्यासाठी शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमता अधिक महत्त्वाची असते. या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमधून भारतीय हवाई दलातील हे चार जॉंबाज वैमानिक अंतराळयात्री होण्यासाठी निवडण्यात आलेले आहेत. एवढा मोठा धोका पत्करणार्‍या या चौघांचे मनोबल किती मोठे असेल त्याची कल्पना आपण करू शकतो. परंतु धोका पत्करल्याशिवाय, जोखीम स्वीकारल्याशिवाय काही नवे पदरात पडत नसतेच. त्यामुळे या संभाव्य अंतराळवीरांना रशियातील मॉस्कोमधील युरी गागारीन अंतराळ केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. ‘गगनयान’ ची संकल्पित तारीख २०२२ ची आहे आणि त्यासाठी तब्बल दहा हजार कोटी खर्च येणार आहे. खर्चाच्या या आकडेवारीवरूनच ही मोहीम ‘इस्रो’च्या दृष्टीने किती महत्त्वाची असेल त्याची कल्पना येते. यशाचे धनी सारेच असतात, परंतु अपयशाचा वाली कोणी नसतो म्हणतात, परंतु इस्रोच्या चंद्रयान २ सारख्या मोहिमा असफल ठरल्या तरी त्या अपयशाबाबत अकांडतांडव झाले नाही. समंजसपणाने देशाने ते अपयश स्वीकारले म्हणूनच ‘इस्रो’ ला गगनयानसारखी महत्त्वाकांक्षी योजना पुढे नेण्याचा हुरूप मिळाला आहे. अर्थात, जबाबदारीही तेवढीच मोठी आणि जिकिरीची आहे, कारण येथे माणसांचे प्राण गुंतलेले असतील. ‘गगनयान’ ची तयारी असताना इस्रोचे अन्य उपक्रमही अर्थात सुरू आहेत. आजवर ‘इस्रो’ आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोट्यातून उपग्रह प्रक्षेपक अवकाशात सोडत असे. आता तामीळनाडू सरकारने इस्रोचे दुसरे प्रक्षेपक केंद्र उभारण्यासाठी तेवीसशे एकर जागा संपादन केलेली आहे. पाचशे किलो पर्यंत वजनाचे उपग्रह अवकाशात सोडणार्‍या एसएसएलव्ही या छोटेखानी प्रक्षेपकांना तेथून अवकाशात सोडले जाणार आहे. हे सगळे घडत असले तरी खर्‍या अर्थाने भारताचे लक्ष राहणार आहे ते चंद्रयान ३ वर आणि त्यानंतर येणार्‍या गगनयान वर. ‘गगनयान’ हे कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न आहे. एकेकाळी आपला अंतराळवीर राकेश शर्मा इतरांच्या यानातून अंतराळात गेला तेव्हा इंदिरा गांधींनी त्याच्याशी थेट संवाद साधताना त्याला तिथून भारत कसा दिसतो असे विचारले होते, त्यावर ‘सारे जहॉंसे अच्छा, हिंदोस्तॉं हमारा’ असे काव्यमय परंतु अत्यंत समर्पक उत्तर देऊन त्याने तेव्हाच्या कृष्णधवल दूरदर्शनवर ते दृश्य पाहणार्‍या कोट्यवधी देशवासीयांची मने जिंकली होती. आपली कल्पना चावला ‘नासा’च्या अंतराळयानातून अंतराळ सफर करून परत येत असताना तिचे यान अत्यंत दुर्दैवीरीत्या दुर्घटनाग्रस्त झाले तेव्हा श्वास रोखून कोट्यवधी भारतीयांनी ते भीषण दृश्य पाहिले होते आणि तिच्यासाठी अश्रू ढाळले होते. अंतराळ हा मानवासाठी नेहमीच जिज्ञासेचा विषय राहिलेला आहे. धर्मापासून विज्ञानापर्यंत सर्वांनाच या ब्रह्मांडाचे गूढ उकलण्याचा ध्यास राहिला आहे. भारतीयांच्या याच जिज्ञासेमुळे अशा मोहिमांकडे जनमानस एकरूप होऊन डोळे लावून बसलेले असते. येणार्‍या मोहिमांकडेही अशाच कोट्यवधी नजरा लागलेल्या आहेत. या कोट्यवधी भारतीयांना आपल्या पुढील मोहिमांत ‘इस्रो’ निराश करणार नाही अशी आशा करूया.