गँगवॉर प्रकरणी ४ जणांना अटक

गँगवॉर प्रकरणी ४ जणांना अटक

ताळगाव आणि रायबंदर येथे रविवार ७ जुलैला रात्री झालेल्या दोन गटातील खुनी हल्ला प्रकरणी ४ जणांना काल अटक करण्यात आली आहे. ओल्ड गोवा पोलिसांनी तिघांना तर पणजी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
या हल्ल्यात चारजण जखमी झाले होते. त्यातील कृष्णा कुर्टीकर याच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आल्याने मनगटापासून वेगळा झाला होता. या प्रकरणी जॅक डायगो ओलिवेरा (३०, ताळगाव), कमलेश चंद्रकांत कुंडईकर (२६, ताळगाव), मनीष राजू हडफडकर (२२, चोडण) या तिघांना ओल्ड गोवा पोलिसांनी अटक केली आहे. गौरीश बांदोडकर (२८, नागाळी) याला पणजी पोलिसांनी अटक केली आहे.

जॅक आणि कमलेश हे दोघेही वाहनचालक म्हणून काम करीत आहेत. दोघांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. दोघांना यापूर्वी ओल्ड गोवा पोलिसांनी एका प्रकरणामध्ये अटक केली होती. या प्रकरणी खटला न्यायालयात सुरू आहे. तसेच, जॅक याला पणजी पोलीस स्टेशन हद्दीतील एका प्रकरणात अटक केली होती. कृष्णा कुर्टीकर याच्यावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला कोयता आणि तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. सदर हल्ला प्रकरण पूर्व वैमनस्यातून घडलेले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.