गँगवॉरमध्ये पंजा छाटलेल्या जखमीचा गोमेकॉत मृत्यू

>> संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद

रायबंदर येथे रविवार ७ जुलैला रात्री झालेल्या दोन गटातील गँगवॉरमध्ये धारदार शस्त्राच्या साहाय्याने उजव्या हाताचा पंजा शरीरापासून विभक्त करण्यात आलेल्या कृष्णा कुर्टीकर (ताळगाव) याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना काल निधन झाले. दरम्यान, या गँगवॉर प्रकरणामध्ये पणजी पोलिसांनी आणखीन एका संशयिताला काल अटक केली आहे. दिपेश गावस (नागाळी, ताळगाव) असे संशयिताचे नाव आहे.

मयत कृष्णा कुर्टीकर आपल्या भावावरील हल्ल्याचा जाब विचारण्यासाठी हल्लेखोरांचा पाठलाग करीत होता. त्यावेळी रायबंदर येथे हल्लेखोरांनी धारदार शस्त्र आणि दगडाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात कृष्णा याच्या उजव्या हाताचा पंजा शरीरापासून वेगळा झाला होता. गंभीर जखमी कृष्णा याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू होते. ओल्ड गोवा पोलिसांनी रायबंदर येथील प्राणघातक हल्ला प्रकरणी चार संशयितांविरोधात आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी तिघांना अटक केली. तर, पणजी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संशयितांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

गुंडांवर रासुकाखाली
कारवाईचा विचार सुरू
तिसवाडी तालुक्यात मागील महिनाभरात गुंडांच्या टोळक्याने डोके वर काढले आहे. गेल्या महिन्याभरात ५ जीवघेण्या हल्ल्यांची नोंद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केलेली आहे. रायबंदर गँगवॉर प्रकरणी जॅक डायगो ओलिवेरा (३०, ताळगाव), कमलेश चंद्रकांत कुंडईकर (२६, ताळगाव), मनीष राजू हडफडकर (२२, चोडण) या तिघांना ओल्ड गोवा पोलिसांनी अटक केली आहे. गौरीश बांदोडकर (२८, नागाळी) याला पणजी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस प्रशासन राजधानीच्या आसपासच्या भागातील वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी विविध पर्यायावर विचार करीत आहे. या परिसरातील गुंडांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) कारवाई करण्यावर विचार सुरू आहे.