ख्यातनाम संशोधक डॉ. पांडुरंंग सखाराम पिसुर्लेकर-शेणवी

  • श्री. अनिकेत अंकुश यादव

ज्या व्यक्तीने देशाचा इतिहास पुढे यावा म्हणून आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांची साधी माहिती आपल्याला नसावी यापेक्षा दुर्दैव ते कोणते. संशोधक व अभ्यासक यांना आपल्या समाजात फारसे सन्मानाचे स्थान नाही हे एक कटू सत्य आहे. पोर्तुगीज मराठा संबंधावर नव्याने प्रकाश टाकणारे डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर हे ख्यातनाम इतिहास संशोधक. दि. ३० मे रोजी त्यांची १२५ वी जयंती झाली. त्यानिमित्ताने या हाडाच्या संशोधकाची थोडक्यात ओळख करून घेऊ.

‘स्वतंत्र स्वकीय आरमाराची उभारणी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात केलेले सर्वांत क्रांतिकारी कार्य होते. आणि या आरमाराचा अभ्यास करताना आपल्याला पदोपदी गोव्याचे ख्यातनाम संशोधक डॉ. पांडुरंंग सखाराम पिसुर्लेकर-शेणवी यांनी केलेले संशोधन कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण वाटते. इतर अभ्यासकांप्रमाणे डॉ. पिसुर्लेकर मात्र आज काही अंशी उपेक्षित आहेत, हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
दि. ३० मे रोजी त्यांची १२५ वी जयंती झाली. त्यानिमित्ताने या हाडाच्या संशोधकाची थोडक्यात ओळख करून घेऊ.

दि. ३० मे १८९४ रोजी गोव्यातील ‘पिसुर्ले’ गावात डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा जन्म झाला. सुरुवातीला शिक्षकी व नंतर वकिली व्यवसाय केल्यानंतर मुळात संशोधनाचा पिंड असल्याने त्यांनी गोवा पुरातत्त्व खात्यात १९२४ सालापासून काम करण्यास सुरुवात केली. ‘कोणताही पगार मिळणार नाही’ या बोलीवर त्यांना ही नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी नाजूकच होती. मात्र आवडीच्या विषयात काम करायला मिळाले म्हणून पिसुर्लेकर जाम खूष होते. पुढे त्यांना मासिक २९ रु. पगार देण्यात आला. त्यांच्या कामाची चिकाटी पाहून पोर्तुगीज सरकारने १९३० साली त्यांना गोवा दफ्तरखान्याचे प्रमुख केले. पोर्तुगीज भारतात आले तेव्हापासूनचे म्हणजे इ.स. १४९८ पासूनचे महत्त्वपूर्ण कागद येथे होते. १९३० ते १९६१ अशी ३१ वर्षे पिसुर्लेकरांनी येथे अविरत अखंडपणे काम केले. पिसुर्लेकरांच्या जवळजवळ ३ तपांच्या प्रदीर्घ काळात ही नोकरी सोडावी असे चुकूनही कधी पिसुर्लेकरांना वाटले नाही की पिसुर्लेकरांच्या जागी दुसरा माणूस नेमावा असे पोर्तुगीज सरकारला देखील वाटले नाही. या काळात येथील अस्ताव्यस्त व अत्यंत घाण असलेले दप्तर त्यांनी व्यवस्थित केले. सर्व कागदपत्रांची विषय व भाषा-निहाय पद्धतशीरपणे सूची केली. बरीचशी महत्त्वाची कागदपत्रे अत्यंत दयनीय अवस्थेत होती. पुरेशी काळजी न घेतल्याने बरीच कागदपत्रे किड्यांनी खाल्लेली होती. हा सर्व ठेवा वाचविण्याचे अमोलिक काम डॉ. पिसुर्लेकर यांनी केले. यावर आधारित जवळपास १२५ ग्रंथ व लेख असे प्रचंड लिखाण त्यांनी केले. या सर्व कामाचे श्रेय पोर्तुगीज सरकारने पिसुर्लेकरांना दिले. त्यांचा अर्धपुतळा करून घेतला. त्यांना अर्ध्या तोळ्याची अंगठी भेट म्हणून देण्यात आली. पोर्तुगाल येथील लिस्बन विद्यापीठाने त्यांना ‘डि.लिट.’ ही सन्माननीय पदवी दिली. इतरही अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आले.
पोर्तुगीज सरकारने त्यांना अधिक संशोधनासाठी पोर्तुगालची राजधानी लिस्बन व फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पाठविले. लिस्बनमधील ग्रंथालयात त्यांना अनेक दुर्मीळ साधने मिळाली. १७७६ मध्ये ‘अनंत कामत वाघ’ यांनी ‘हिंदुधर्मावर पोर्तुगीज भाषेत लिहिलेले पहिले पुस्तक’ पहायला मिळाले. आद्य गोमंतकीय मराठी कवी कृष्णदास श्यामा यांनी लिहिलेले ‘श्रीकृष्ण चरित्र’ येथे पाहिले. अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ, नकाशे, हस्तलिखिते त्यांनी येथे पाहिली. यातील महत्त्वाची साधने त्यांनी बरोबर आणली. ‘शिवाजीची धूर्तता, शौर्य, चपळाई व शहाणपणा पाहता त्याची सीझरशी व अलेक्झांडरशी तुलना करता येईल’ असा गोव्याचा व्हाईसरॉय कोंदि-द-सां-विसेंत याने शिवाजी महाराजांचा केलेला गौरव पिसुर्लेकरांनी वाचला, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘कॉस्मो-द-गार्दा’ याने पोर्तुगीज भाषेत लिहिलेले व लिस्बनमध्ये प्रसिद्ध झालेले पहिले शिवचरित्र त्यांनी येथे पाहिले. तेव्हाच्या ३५० रुपयांना त्यांनी ते विकत घेतले.

पिसुर्लेकरांचे संशोधन व इतिहास लेखन हिंदुस्थान व पोर्तुगाल संबंधावर असले तरी त्याचा मूळ गाभा पोर्तुगीज व मराठे यांचे संबंधावर आहे. लेखन करताना मात्र पिसुर्लेकरांनी कधीही जातिधर्माचा विचार केला नाही. केवळ राष्ट्रप्रेमाचा विचार करूनच त्यांनी आपले संशोधनकार्य केले. ‘मला ङ्गितुरांच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागला’ असे ते म्हणत. मात्र शिवाजी महाराजांवरील कागदपत्रांचा अभ्यास करताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून येई. त्यामुळे ते म्हणत, ‘शिवरायांना आणखी दहा वर्षांचे आयुष्य मिळाले असते तर गोवा सर्वप्रथम मुक्त झाला असता!’
भारताला जरी १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले असले. तरी गोवा राज्य १९६१ साली स्वतंत्र झाले. तोपर्यंत येथे पोर्तुगीज सरकारचेच राज्य होते. परकीय राज्यात काम करूनही पिसुर्लेकर मात्र अत्यंत देशप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर पिसुर्लेकरांचे अतिशय प्रेम होते. त्यांनी भारत सरकारकडे पुरविलेल्या पुराव्यांमुळे दादरा-नगर-हवेली हा प्रांत भारत सरकारकडे आला. गोवा प्रांत मराठी असल्याचे देखील अनेक पुरावे त्यांनी दिले. एवढेच नाही तर बेळगाव-कारवार हा प्रांत देखील मराठी असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. त्यांना पोर्तुगीज सरकारकडून मिळालेली अर्धा तोळ्याची अंगठी देखील त्यांनी गोवा मुक्ती संग्रामासाठी दान केली.
सन्मान, सत्कार व प्रसिद्धी हे अभ्यासकांचे तीन शत्रू आहेत, हे पिसुर्लेकर जाणून होते. त्यामुळेच पिसुर्लेकर यांपासून कायम दूर राहिले. अशा इतिहास अभ्यासकाला अखेरच्या दिवसात मात्र ‘कॅन्सर’ सारखा दुर्धर आजार जडला आणि अखेर दि. १० जुलै १९६९ रोजी डॉ. पांडुरंग पिसुर्लेकरांनी आपल्या राहत्या घरी शेवटचा श्‍वास घेतला. पिसुर्लेकरांनी अखेरपर्यंत आपले संशोधन कार्य व संशोधकांना मदत करण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले होते. त्यांच्याकडील सर्व दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते, नकाशे, मायक्रोफिल्मस् असे ४००० हून अधिक साहित्य त्यांनी आपल्या हयातीतच मुंबई विद्यापीठाच्या पणजी केंद्रास दिले. सध्या ते गोवा विद्यापीठात ठेवलेले आहे. ‘एकही कागदाचा कपटा मी घरी ठेवला नाही. जे साहित्य मी जमविले, त्याचा उपयोग नवीन पिढीने करावा’ असे त्यांचे अखेरचे म्हणणे होते.

ज्या व्यक्तीने देशाचा इतिहास पुढे यावा म्हणून आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांची साधी माहिती आपल्याला नसावी यापेक्षा दुर्दैव ते कोणते. संशोधक व अभ्यासक यांना आपल्या समाजात फारसे सन्मानाचे स्थान नाही हे एक कटू सत्य आहे. पोर्तुगीज मराठा संबंधावर नव्याने प्रकाश टाकणारे डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर हे तसे ख्यातनाम इतिहास संशोधक. मात्र त्यांची म्हणावी इतकी प्रसिद्धी होऊ शकली नाही. मात्र त्यांच्या संशोधन कार्यामुळे शिवचरित्रात व भारताच्या इतिहासात मोलाची भर पडली हे मात्र सर्वच इतिहास संशोधकांना कबूल करावे लागेल.
दि. ३० मे २०१९ रोजी डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांची १२५ वी जयंती आहे. तर दि. १० जुलै २०१९ रोजी ५० वी पुण्यतिथी आहे. म्हणजेच यावर्षी पिसुर्लेकरांची १२५ वी जयंती व ५० वी पुण्यतिथी आहे.

त्यानिमित्त पिसुर्लेकरांवरील चरित्रात्मक लेख व पिसुर्लेकरांच्या काही दुर्मीळ लेखांचा समावेश असलेला डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर स्मारक ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. या ग्रंथाचे तीन भाग असून पहिल्या भागात डॉ. पिसुर्लेकरांनी काय हालअपेष्टा सहन करून आपले संशोधनकार्य केले, याची माहिती व्हावी म्हणून त्यांच्यावरील काही चरित्रात्मक लेख आहेत. दुसर्‍या भागात डॉ. पिसुर्लेकर यांचे १२ दुर्मीळ लेख आहेत. तिसर्‍या भागात डॉ. पिसुर्लेकर यांच्या १२७ ग्रंथ व लेखांचा सारांश दिलेला आहे. याशिवाय डॉ. पिसुर्लेकर यांचे एक रंगीत चित्र, पोर्तुगीज सरकारने बनविलेल्या त्यांच्या पुतळ्याचा फोटो व त्यांची इतर ४ दुर्मीळ चित्रे देखील या ग्रंथात आहेत. या २५१ पृष्ठांच्या स्मारक ग्रंथाचे संपादन श्री. अनिकेत अंकुश यादव यांनी केलेले आहे.

डॉ. पिसुर्लेकर यांनी लिहिलेल्या ग्रंथांद्वारे पोर्तुगीज व मोगल, मराठा, आदिलशाही, निजामशाही, विजयनगर साम्राज्य, म्हैसूर राज्य व इतर छोटे-मोठे राजे-नायक-सरदार यांचेमधील तत्कालीन संबंधांवर प्रकाश पडतो. यांपैकी पोर्तुगीज-मराठा संबंधांवर तर अनेक माहिती नव्याने कळते. शहाजीराजांपासून ते पेशव्यांपर्यंत व इतर अनेक मराठा सरदार यांच्याबद्दलची अनेक अप्रकाशित माहिती पिसुर्लेकरांच्या ग्रंथांमधून बाहेर येऊ शकेल.
आपल्या देशाची उज्ज्वल ऐतिहासिक परंपरा पुढे यावी म्हणून डॉ. पिसुर्लेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, त्यांचे स्मरण करून आपण त्यांना आदरांजली वाहूयात……