खेळ समज आणि वास्तवाचा…

  • ल. त्र्यं. जोशी

महायुतीजवळ सर्व काही होते. राष्ट्रवादीजवळ पवारास्र होते. कॉंग्रेसजवळ काहीच नव्हते. त्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी स्वबळावर मिळविलेल्या जागा त्या पक्षाच्या अंगभूत शक्तीचे प्रतीक आहे असे म्हणावे लागेल.

आपल्या व्यक्तिगत आयुष्यात काय किंवा सामाजिक जीवनात काय, नेहमीच समज (परसेप्शन) आणि वास्तव यांचा खेळ सुरू असतो. मग महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याला अपवाद कशी असू शकेल? एकवीस तारखेला मतदानोत्तर पाहण्यांचे निकाल जाहीर झाल्यापासून तर चोवीस ऑक्टोबरला निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतही हाच खेळ सुरू होता. प्रत्यक्षात भाजपा-सेना महायुतीने एकत्रित निवडणूक लढविली आणि बहुमतही मिळविले. किती जागा जिंकल्या, किती गमावल्या, कोण जिंकले, कोण हरले हा भाग वेगळा. त्यालाही महत्व नाही असे नाही, पण सरकार बनविताना महत्व आहे फक्त आणि फक्त बहुमताचे आणि ते महायुतीने मिळविले म्हणजे त्यांचा विजय झाला. पण निवडणुकीपूर्वी महायुतीने आपल्याबद्दल एवढ्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आणि विरोधी पक्षाला एवढे नगण्य लेखले की, मिळालेल्या विजयाचा आणि विरोधकांचा त्या अर्थाने पराभव होऊनही महायुतीला त्याचा निर्भेळ आनंद घेता आलेला नाही.

विरोधी पक्षांबाबतही त्यापेक्षा वेगळे घडले नाही. वास्तविक कॉंग्रेसला चारच आणि राष्ट्रवादीला चौदा जागा अधिक मिळवूनही बहुमताच्या जवळपासही पोचता आले नाही. तरीही त्यांनी बहुमत मिळविल्याचा आनंद उपभोगला. या आनंदाचा वा दुःखाचा अनुभव केवळ राजकीय कार्यकर्त्यांनीच घेतला असे नाही, तर दिवसभर निवडणूक निकालांवर चर्चा करणारे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांनीही अनुभवला.
तसे पाहिले तर केवळ प्रत्येक निवडणूकच नव्हे तर प्रत्येक मतदारसंघाची निवडणूक वेगळी असते हे सत्य आता प्रस्थापित झाले आहे. ते लक्षात घेता २८८ मतदारसंघ आणि तीन हजार उमेदवार असे ३२८८ प्रकारे या निवडणुकीचे विश्लेषण केले जाऊ शकते आणि राजकीय पक्ष यथावकाश ते करतीलही, पण आपल्याजवळ अत्यंत गतिमान तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे कुणालाही तोपर्यंत थांबणे शक्य नसते. सगळे काही ताजे आणि गरम हवे असते. ती गरज वृत्तवाहिन्यांवरील चर्चा व विश्लेषणे पूर्ण करतात, कारण त्याच्यावरच वाहिन्यांचे पोट चालत असते. त्यामुळे त्यांना किती गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरविलेले बरे.

या निवडणुकीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले विश्लेषण त्यांच्या भूमिकाना साजेसेच होते, पण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेले विश्लेषण त्यांच्या भूमिकेला साजेसे पण तेवढेच तटस्थही होते. त्यांच्या जागी राहुल गांधी असते तर त्यांनी केवळ फडणविसांचाच नव्हे तर मोदी आणि शहा यांचेही राजीनामे मागितले असते. काय म्हटले शरद पवारानी? महायुतीचा २२० पार चा दावा मतदारांनी नाकारला. विरोधकांची जेवढी थट्टा करण्यात आली ती त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून जनतेने फेटाळली. सुशीलकुमार शिंदे यांनी सुचविल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची गरज नाही. त्या पक्षाचे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त त्यांनी एवढेच म्हणायचे शिल्लक ठेवले की, आता महाराष्ट्र कॉंग्रेसचेच राष्ट्रवादीत विलीनीकरण करण्याची वेळ आली आहे. पण न म्हणताही कसे म्हणावे याची कला पवारांनी चांगलीच अवगत केली आहे व तिचेही प्रात्यक्षिक त्यांनी लगेच दाखविले, कारण त्यानी शेवटच्या अभिप्रायातून दिल्लीतून व विविध प्रदेशांतून महाराष्ट्रात आलेल्या नेत्यांनी त्यांच्या केलेल्या गुणवर्णनाबद्दल आभारही मानले. एवढी सटीक प्रतिक्रिया फक्त शरद पवारच देऊ शकतात. महायुतीवर अहंकाराचा आरोप करायलाही ते विसरले नाहीत.

कोणत्याही निवडणुकीचे दोन प्रकारे विश्लेषण होऊ शकते व ते दोन्ही प्रकार आपापल्या दृष्टीने योग्यच असतात. एक सकारात्मक व एक नकारात्मक. त्या दोघांचा लसावि लोक आपापल्या पद्धतीने काढू शकतात व काढत असतात. या निवडणुकीचे सकारात्मक विश्लेषण म्हणजे पाच वर्षांच्या आव्हानात्मक कारभारानंतर पुन्हा बहुमत मिळविणे ही देवेन्द्र फडणवीस आणि महायुती सरकारची फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. मनुष्यस्वभाव असा आहे की, जे त्याच्या हातात असते त्याचे त्याला महत्व जाणवत नाही. नसल्याचे महत्व जास्त वाटते. महायुतीला १४४ पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तर आज मिळत असलेल्या १६३ जागांचे महत्व कळू शकले असते. त्यामुळे बहुमत मिळणे अतिशय महत्वाचे ठरते. त्यातही महाराष्ट्रात वसंतराव नाईकांचा अपवाद वगळता कुणाही मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करून पुन्हा बहुमत मिळविलेले नाही. तो मान देवेन्द्रजींनी व महायुतीने मिळविला याचे एक वेगळेच महत्त्व आहे व ते कुणालाही नजरेआड करता येणार नाही. या निवडणुकीत शरद पवार यांचा करिष्मा दिसला हे मान्यच करावे लागेल, पण त्यांची पन्नास वर्षांची तपस्या आणि फडणविसांची पाच वर्षांची मेहेनत यांची या क्षणी तुलनाच होऊ शकत नाही. त्यासाठी फडणविसांना राजकारणात पन्नास वर्षे टिकावे लागेल. पण आजच्या घडीला पुन्हा बहुमत मिळविण्याची कामगिरी फडणविसांच्या नावावरच राहणार आहे. कुणाला ते समजो की न समजो, इतिहासाला ते समजून घ्यावेच लागेल.

मिळालेल्या जागांच्या आधारे खरे विश्लेषण करायचे झाल्यास किती जागा मिळाल्या हे बाजूला ठेवूया, पण कॉंग्रेस पक्षाला पहिला क्रमांक द्यावा लागेल, कारण महायुतीजवळ सर्व काही होते. राष्ट्रवादीजवळ पवारास्र होते. कॉंग्रेसजवळ काहीच नव्हते. त्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी स्वबळावर मिळविलेल्या जागा त्या पक्षाच्या अंगभूत शक्तीचे प्रतीक आहे असे म्हणावे लागेल. या निवडणुकीनंतर तो पक्ष औषधालाही सापडणार नाही असे वातावरण असताना इतक्या जागा मिळविणे कौतुकास्पदच आहे व त्याचे धनी सामान्य कार्यकर्तेच आहेत हे त्या पक्षाच्या नेतृत्वाने समजून घ्यायला हवे.
या निवडणुकीचे खरे लाभार्थी शरद पवार व त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे हेही नाकारण्याचे कारण नाही. पण त्याचबरोबर त्या पक्षाच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत, कारण या यशातून पश्चिम महाराष्ट्र व शरद पवार वगळले तर भले मोठे शून्य तेवढे उरते.

या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असले तरी अपेक्षित यश मिळाले नाही ही वस्तुस्थिती कुणालाही नाकारता येणार नाही. मतदानोत्तर पाहण्यांमध्ये सी व्होटरने दिलेल्या जागा जर महायुतीला मिळाल्या असत्या तर ते यश मानता आले असतेही, पण ते महायुतीला मिळविता आले नाही. त्याची शंभर कारणे असतील,ती कदाचित रास्तही असतील, पण अपेक्षित यश मिळाले नाही हे वास्तव त्यामुळे बदलत नाही. मिळालेल्या जागांमध्ये पंधरा एक विजयी बंडखोरांचा आकडा मिळवून कदाचित ती उणीवही भरून काढता येईल, पण त्यामुळे थोड्या मानसिक समाधानापलीकडे काहीही मिळणार नाही.

या निकालाचे कोणतेही एकच महत्वाचे कारण सांगायचे झाल्यास या निवडणुकीत जवळपास शंभर टक्के जागांवर सरळ लढती होणे हे सर्वांत महत्वाचे कारण आहे. निवडणुकीत अनेक उमेदवार होते हे खरेच, पण मतदारांनी मात्र दोघांतूनच एकाची निवड केली व त्याचा फायदा कॉंग्रेस राष्ट्रवादीला अधिक मिळाला. वस्तुतः वंचित बहुजन आघाडी,मनसे, बसपा हे मते कापणार्‍या पक्षांचे उमेदवार मैदानात होते पण मतदारांनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले दिसते. महायुतीला अपेक्षित यश न मिळण्याचे तेही एक कारण असू शकते. आयारामाना तिकिटे दिल्याने अपेक्षित यश मिळाले नाही असे कुणी म्हणू शकेलही, पण ते तेवढे बरोबर नाही, कारण आयाराम मुख्यतः त्यांच्या मतदारसंघात प्रभावी होतेच. अनेकदा ते निवडूनही आले होते. पण त्यांचे निवडणुकीच्या तोंडावरचे पक्षांतर मतदारांना आवडलेले दिसत नाही. त्यांच्या जागी अन्य कुणा कथित निष्ठावंताना तिकिट दिले असते तर तो निवडून आला असता असे म्हणण्याला राजकारणात काहीही अर्थ नसतो. इथे तर जो जिता वोही सिकंदर असतो. मुळात कोणत्याही राजकीय पक्षाला हा निष्ठावंत आणि तो निष्ठावंत नाही असे म्हणता येत नाही. तो जोपर्यंत पक्षाची शिस्त मोडत नाही तोपर्यंत सर्वच निष्ठावंत मानले जातात आणि निष्ठावंताची निवडून येण्याची क्षमता असेलच असेही सांगता येत नाही. त्यामुळे त्या वादाला अर्थ राहत नाही.

अंकगणिताच्या आधारेही अपेक्षित यश न मिळण्याची कारणे सांगता येतील. त्यातील एक म्हणजे गेल्या वेळी भाजपाला १२२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्याच्यापेक्षा कमी जागा मिळाल्या. शिवसेनेलाही गेल्या वेळच्या ६३ पेक्षा थोड्या कमी जागा मिळाल्याचे म्हणता येईल. त्याला स्ट्राईक रेटचा मुद्दाही जोडता येईल, पण त्यामुळे यश ते यश आणि अपयश ते अपयश हे प्रस्थापित सत्य मात्र बदलता येणार नाही. या अपयशाचे – किमान भाजपाच्या अपयशाचे एक मोठे कारण सांगता येईल. कदाचित कुणी स्पष्टपणे बोलणार नाही पण तर्कसंगत विचार केला तर या अनपेक्षित अपयशाची जबाबदारी राष्ट्रीय नेतृत्वाकडेच जाते, कारण कोणत्याही निवडणुकीत तिकिटवाटपाला खूप महत्व असते आणि यावेळी तिकिटवाटपावर पूर्णपणे राष्ट्रीय नेतृत्वाचे नियंत्रण होते. विशेषतः विनोद तावडे, एकनाथ खडसे व चंद्रशेखर बावनकुळे यांना ज्या पद्धतीने अपमानित करून तिकिटे नाकारली गेली, त्या प्रकाराचा फारच चुकीचा संदेश समाजात गेला आणि भाजपातही गेला. त्यांना तिकिटे द्यायलाच हवी होती असे मी म्हणणार नाही. तेही म्हणत नाहीत. पण ते पक्षाचे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत. पक्षवाढीतील त्यांचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. तरीही नाकारायचेच होते तर योग्य रीतीने त्यांचा सन्मान कायम ठेवून नाकारता आले असते. कदाचित त्यांनीही ते समजून घेतले असते. अपमानित होऊनही जे पक्षाचा आदेश पाळतात त्यांच्यासाठी ते अशक्य नव्हते, पण तसे घडले नाही व त्याचाही विपरीत परिणाम भाजपाच्या अनपेक्षित अपयशावर झाला असे म्हणता येईल. भाजपामध्ये त्याचाही विचार होऊन कोर्स करेक्शन होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही!