खेळाला बनवाअविभाज्य भाग

>> सिंधूने केले देसवासियांना आवाहन

भारताची स्टार शटलर आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ‘व्हर्च्युअल हेल्थकेअर अँड हायजीन एक्स्पो २०२० ’ चर्चासत्रात बोलताना देशवासियांना कोविड-१९वर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) च्या शिफारशींचे पालन करतानाच खेळाला जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसलेला आहे. या विषाणूचा संसर्ग जगभरातील सुमारे ९० लाखांच्या वर लोकांना झालेला आहे. त्यात सुमारे ४,५०,००० लोकांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे. काही माजी खेळाडूंनाही आपल्या प्राणाला मुकावे लागलेले आहे. भारतातही महामारीच्या रुणांची संख्या ४.२५ लाखांच्या वर पोहोचलेली असून याचा संसर्ंग झालेल्यातील सुमारे १४ हजार लोकांचे निधन झालेले आहे.

योग्य व्यायाम आणि खेळामुळे रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास निश्‍चित महत्त्वपूर्ण ठरते. त्यासाठी प्रत्येकाने दररोज व्यायाम करून वा खेळांमधून रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. लस उपलब्ध झाली नसतानाही कोरोना महामारीच्या विरुद्ध लढण्यासाठी खेळ आपल्याला निश्‍चितच मदत करू शकतो, असे सिंधूने यावेळी बोलताना सांगितले.

खेळ वा व्यायामाद्वारे हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि नैराश्यासारख्या गोष्टींवर नियंत्रण राहू शकते. दर दिवसाला कमीत कमी ४५ मिनिटे वेळ काढून व्यायाम केल्यास ते सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असे सिंधू म्हणाली.
देशातील काही भागात काही खेळाडूंनी पुन्हा प्रशिक्षणास सुरुवात केलेली आहे. परंतु हैदराबादस्थित शटलर तेलंगणा सरकारकडून राज्यात लॉकडाऊन उचलण्याची प्रतीक्षेत आहे.