खाण प्रश्‍नावर आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

राज्यातील खाण प्रश्‍नावर आज शुक्रवार १२ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या बैठकीला केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे गेले पंधरा महिने राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. खाण बंदीमुळे राज्याचा महसुलावर परिणाम झालेला आहे. तसेच खाण व्याप्त भागातील लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खाण कंपन्यांकडून कर्मचार्‍यांना कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

राज्य सरकारकडून गेले वर्षभर खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा निघालेला नाही. गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने सुध्दा केंद्र सरकारला निवेदन सादर करून खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विद्यमान केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यासमोर यापूर्वी खाण प्रश्‍न मांडण्यात आलेला आहे. खाण प्रश्‍नी कायदेशीर तोडगा काढण्याचे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. खाण व्यवसायाला चालना देण्यासाठी खनिज डंप, खनिजाचा ई लिलाव करण्यासाठी तयारी चालविली आहे. केंद्रीय पातळीवरील बैठकीमुळे सरकारच्या खाण व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.