ब्रेकिंग न्यूज़

खाण पट्‌ट्यातील आमदारांबरोबर मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक

>> खाण बंदीवर करणार चर्चा ः पाऊसकर

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उद्या गुरुवार दि. २१ जून रोजी दुपारी १२ वाजता पर्वरी येथे राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी खाण व्याप्त भागातील आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याचे ऍडव्होकेट जनरल, खाण खात्याचे संचालक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राज्यातील खाण प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी प्राधान्यक्रम दिला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेऊन खाण बंदीच्या प्रश्‍नी तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यामुळे खाण बंदीच्या प्रश्‍नावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असेही आमदार पाऊसकर यांनी सांगितले.

राज्याच्या खाण धोरणाबरोबरच खाणींचा लिलाव, अध्यादेश, खाण महामंडळ या प्रमुख मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. सरकारने अध्यादेश जारी करून राज्यातील खाणींना मुदतवाढ देण्याची मागणी खाणव्याप्त भागातील नागरिकांकडून केली जात आहे, असेही आमदार पाऊसकर यांनी सांगितले.

दरम्यान, मायनिंग पिपल फ्रंटने खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी येथील आझाद मैदानावर सुरू केलेले बेमुदत धरणे नवव्या दिवशी सुरूच होते. या धरणे आंदोलनाची सरकारकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. फ्रंटने खाण बंदीच्या प्रश्‍नी सरकारवर दबाव आणण्यासाठी सावर्डे, धारबांदोडा आणि साखळी येथेही धरणे सुरू केले आहे.