ब्रेकिंग न्यूज़

खाण घोटाळा : यदुवंशी यांची दिगंबर कामत विरोधात जबानी

भारतीय नागरी सेवेतील अधिकारी (आयएएस) तथा राज्याचे माजी खाण सचिव राजीव यदुवंशी यांनी कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विरोधात काल जबानी दिल्याने कामत यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, एसआयटीने माजी प्रधान खाण सचिव राजीव यदुवंशी यांना खाण घोटाळा प्रकरणी सरकारी साक्षीदार बनविले आहे.

यदुवंशी यांची सीआरपीसीच्या १६४ कलमाखाली येथील न्यायदंडाधिकार्‍यांसमोर काल जबानी नोंदवून घेण्यात आली. खाण घोटाळा प्रकरणी यदुवंशी यांची साक्ष महत्त्वाची मानली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. राज्यातील खाण घोटाळा प्रकरणी माजी प्रधान खाण सचिव यदुवंशी यांची गेले कित्येक दिवस खाण लीज नूतनीकरण प्रकरणांच्या भूमिकेबाबत चौकशी केली जात आहे. एसआयटीने ४० लिज नूतनीकरण प्रकरणात यदुवंशी यांची चौकशी केली.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री कामत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर आज खास न्यायालयात सुनावणी होणार आहे. एसआयटीने खाण घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी आज खाण मालक प्रफुल्ल हेदे यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला आहे.