ब्रेकिंग न्यूज़

खाणींच्या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी ः कॉंग्रेस

खाणींचा विषय योग्य प्रकारे हाताळता न आल्याने खाण बंदीची परिस्थिती पुन्हा ओढवली असून खाणीचा विषय गुंतागुंतीचा बनत चालला आहे. या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. तसेच खाण क्षेत्रातील भागधारकांची खास बैठक घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करावा, अशी मागणी गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले की, राज्यातील खाण लीजांचा लिलाव करू नये. लिलाव केल्यास बाहेरील बडे व्यावसायिक लीजाची खरेदी करून खाण व्यवसाय परराज्यातील व्यावसायिक ताब्यात घेऊ शकतात, अशी भिती नाईक यांनी व्यक्त केली. आघाडी सरकारने राजकीय पक्ष आणि खाण भागधारकांची बैठक घेऊन खाणीबाबतच्या पुढील वाटचालीसंबंधी आराखडा तयार करण्याची गरज आहे. राज्यातील खाण हा प्रमुख व्यवसाय असून कामगार, खाण व्याप्त भागातील व्यावसायिक, नागरिक, ट्रक मालक, बार्ज मालक यांचे भवितव्य या व्यवसायावर अवलंबून आहे. खाण प्रश्‍नावर तोडगा न काढल्यास गंभीर आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडून कॉंग्रेस पक्षावर बेकायदा खाण प्रकरणावरून टिका केली जात होती. आता पर्रीकर यांच्या चुकीच्या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत चालला आहे. खाण लीज देताना आणि लीजाचे नूतनीकरण करताना गोंधळ करण्यात आला आहे. या प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून आला आहे, असा आरोप नाईक यांनी केला.

मध्यावधी निवडणुकीस कॉंग्रेस तयार
कॉंग्रेस पक्ष विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीसाठी तयार आहे. विधानसभा बरखास्त करण्यासाठी मंत्रिमंडळाने ठराव संमत करणे आवश्यक आहे. विद्यमान भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्षाचे मंत्री विधानसभा बरखास्त करण्याच्या निर्णयाला समर्थन देतील का? असा प्रश्‍न नाईक यांनी उपस्थित केला.
लोकसभा आणि विधानसभेच्या एकाच वेळी निवडणूक घेण्यास घटना मान्यता देत नाही. एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. भारत सरकारने घटनेमध्ये दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार केला आहे का ? असा प्रश्‍न नाईक यांनी उपस्थित केला.

पर्वरी येथे विधानसभा संकुलात जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने खासगी ठराव सादर केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या अन्य व्यक्तीच्या पुतळे उभारण्याच्या ठरावांना पाठिंबा देण्याबाबत कॉंग्रेसने कोणताही निर्णय घेतलेला नाही. जनमत कौलामध्ये पुरुषोत्तम काकोडकर व इतरांचेही योगदान आहे. त्यांच्या कार्याबाबत कुणीही बोलत नाहीत, अशी खंत नाईक यांनी व्यक्त केली.