ब्रेकिंग न्यूज़
खाणप्रश्‍न न्यायालयाच्या माध्यमातून सोडविणार

खाणप्रश्‍न न्यायालयाच्या माध्यमातून सोडविणार

>> भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची ग्वाही

>> शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

गोव्यातील खाण प्रश्‍नावर न्यायालयाच्या माध्यमातून लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना काल दिली. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही जागा मिळवून देण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, गोवा प्रभारी अविनाश खन्ना, नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, संघटनमंत्री विजय पुराणिक, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, बी. एल. संतोष, आमदार एलिना साल्ढाणा, राजेश पाटणेकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत, प्रवीण झांट्ये, उपसभापती मायकल लोबो, आमदार ग्लेन टिकलो, मिलिंद नाईक, राजेंद्र आर्लेकर, दयानंद मांद्रेकर, कुंदा चोडणकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, सुलक्षणा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. गोव्यातील राजकीय पातळीवरील अस्थिरतेचे ग्रहण दूर करण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी दोन्ही जागा जिंकण्यासाठी बूथ कार्यकर्ते सहकार्य करतील तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी भाजपला ३४ जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला.

भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीला तोंड देऊन बहुमताने पुन्हा भाजपचे सरकार स्थापन केले जाईल, असा दावा शहा यांनी केला. भाजप बूथ कार्यकर्त्याला महत्त्वाचे स्थान देतो. भाजपने बूथ कार्यकर्त्यांच्या विश्‍वासावर आजपर्यंत राजकीय क्षेत्रात प्रगती साधलेली आहे. यापुढेही प्रगतिपथावर कायम राहण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे शहा यांनी सांगितले.

गोवा आदर्श बनविण्यासाठी सहकार्य
पंतप्रधान मोदी यांनी मागील चार वर्षांच्या कार्यकाळात विकासाला प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी गोव्याच्या निधीत कॉंग्रेस पक्षाच्या तुलनेत तीन पट वाढ केली आहे. मांडवी, झुवारी नवीन पूल, चौपदरी रस्ते व इतर विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. गोवा एक देशातील आदर्श राज्य बनविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे. मोदी सरकारची विकासकामे आणि विविध योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोचविण्याची गरज आहे. भाजपच्या संघटनात्मक कार्यात वाढ करण्याची गरज आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराज बनू नये. कार्यकर्त्यांच्या तक्रारी असल्यास त्यांचे निवारण केले जाईल, असेही शहा यांनी सांगितले.

अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेणारे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी आपण चर्चा केली आहे. पर्रीकर परतल्यानंतर पूर्ण ताकदीनिशी कामकाजाला सुरुवात करण्यात येईल. पर्रीकर यांचे उपचारानंतर गोव्यात जंगी स्वागत केले जाणार जाणार आहे. या स्वागत सोहळ्याला आपण उपस्थित राहणार आहोत, असेही शहा यांनी सांगितले.
सरकारी पातळीवरील कारभार सुरळीत सुरू आहे. कॉंग्रेस पक्षाने कितीही टीका केली तरी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असे खासदार सावईकर यांनी सांगितले. सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना तळागाळातील लोकांपर्यंत नेण्यास बूथ कार्यकर्त्यांनी साहाय्य करावे, असे आवाहन मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर पुन्हा भाजपचे उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केला. यावेळी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, उपसभापती मायकल लोबो, पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, गोवा प्रभारी अविनाश खन्ना, कुंदा चोडणकर यांची भाषणे झाली.

महत्त्वाच्या प्रश्‍नांवर शहांचे मौन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हादई, कॉँग्रेस पक्षाच्या पर्यायी नेता निवडीच्या मागणीवर कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यांनी कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी म्हादई प्रश्‍नावर भाष्य केले होते. या प्रश्‍नावर बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते खुलासा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत पर्यायी नेता निवडण्याच्या मागणीवर भाष्य करण्याचे शहा यांनी टाळले.

घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा टळली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची घटक पक्षांच्या नेत्यांशी बैठक बदललेल्या वेळापत्रकामुळे रद्दबातल करण्यात आली आहे. अध्यक्ष शहा घटक पक्षांच्या नेत्याशी चर्चा करतील, असे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु, शहा यांच्या गोवा दौर्‍याच्या वेळापत्रकात बदल झाला. शहा यांचे संध्याकाळी ३.३० वाजता गोव्यात आगमन झाले. त्यामुळे शहा यांनी केवळ बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला, असे सूत्रांनी सांगितले.

काही आठवड्यांत गोव्यात परतणार!

>> आजारी पर्रीकरांचा व्हिडिओ संदेश

अमेरिकेमध्ये वैद्यकीय उपचार घेणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून भाजप बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मागील दोन महिने उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रकृतीत आणखीन सुधारणा झाल्यानंतर काही आठवड्यांत गोव्यात परतणार आहे, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी संदेशात म्हटले आहे. लोकसभेची निवडणूक मे २०१९ मध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत दोन्ही जागांवर विजय मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासून प्रचाराला सुरुवात करण्याची गरज आहे. बूथ कार्यकर्ते प्रचारासाठी योग्य सहकार्य करतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री पर्रीकर यांनी व्यक्त केला.