ब्रेकिंग न्यूज़
खाणप्रश्‍नी न्यायालयाद्वारे तोडगा काढणार : गडकरी

खाणप्रश्‍नी न्यायालयाद्वारे तोडगा काढणार : गडकरी

>> तिसर्‍या मांडवी पुलाचा नदीतील अंतिम स्लॅब जोडला

गोव्यातील खाणबंदी प्रश्‍नावर न्यायालयातून योग्य तोडगा काढण्यात येणार आहे. आपण पंतप्रधान कार्यालयाशी खाणबंदी प्रश्‍नी चर्चा केली आहे. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात खाण प्रश्‍नी याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. तत्पूर्वी, गडकरी यांच्या हस्ते मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचा नदीतील शेवटचा भाग जोडण्यात आला.

गोव्यातील नेत्यांकडून खाणबंदी प्रश्‍नाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. खाण बंदीमुळे मोठी आर्थिक व रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. राज्यातील पर्यावरण राखून खाण बंदीच्या प्रश्‍नावर योग्य तोडगा काढला जाणार आहे, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या गैरहजेरीतसुद्धा राज्य सरकारकडून महामार्गाच्या कामाला योग्य सहकार्य मिळत आहे. राज्यातील महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे जनतेला होणार्‍या त्रासाची कल्पना आहे. आपण जनतेला होणार्‍या त्रासाचा अनुभव घेतला आहे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. जमीन संपादनाच्या कामामुळे महामार्गाच्या कामाला विलंब होत आहे. त्यामुळे जमीन संपादनाच्या कामांवर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. राज्यात सुरू असलेली महामार्गाची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

मुंबई – गोवा महामार्गाचे
डिसेंबर – मार्चपूर्वी उद्घाटन
मुंबई ते गोवा या महामार्गाचे बांधकाम जोरात सुरू आहे. नवीन महामार्गाचे डिसेंबर ते मार्चपूर्वी उद्घाटन केले जाणार आहे. महामार्ग विकसित करत असताना रस्त्याच्या बाजूला झाडांची लागवड करून पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

मांडवीवरील तिसर्‍या पुलाचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण
मांडवी नदीवर बांधण्यात येत असलेल्या तिसर्‍या पुलाचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचे औपचारिकरीत्या काल जाहीर करण्यात आले. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते पुलाचा नदीतील शेवटचा भाग काल जोडण्यात आला. मांडवी नदीवरील तिसरा पूल हा देशातील तिसरा सर्वांत मोठा पूल आहे.
हा पूल देशातील एक आयकॉनिक पूल आहे. हा पूल ‘मेक इन इंडिया’ चे उत्कृष्ट मॉडेल आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विनंतीमुळे या पुलासाठी केंद्र सरकारने ५० टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले. झुआरी नदीवरील पूलदेखील जगातील उत्कृष्ट पूल ठरणार असून तो जागतिक आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. या पुलावरून संपूर्ण गोव्याचे दर्शन घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.