खाणप्रश्‍नी तोडग्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
????????????????????????????????????

खाणप्रश्‍नी तोडग्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

>> येत्या २० दिवसांत खनिजाचा ई-लिलाव, डंपवर सहा महिन्यांत निर्णय

राज्यातील बंड पडलेल्या खाणप्रश्‍नी लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी काल गोवा विधानसभेत सांगितले. शून्य तासाला आमदार प्रविण झांट्ये यानी राज्यातील बंद पडलेल्या खाणींचा प्रश्‍न उपस्थित करून सरकारने खाणी सुरू करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत असा प्रश्‍न विचारला होता.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खाण उद्योग सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नरत असून त्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. जे खनिज यापूर्वीच काढण्यात आलेले आहे त्या खनिजाचा येत्या १५ ते २० दिवसांत ई-लिलाव करण्यात येणार असल्याचे त्यानी यावेळी स्पष्ट केले. त्याशिवाय जे खनिज डंप आहे त्याबाबतही येत्या ६ महिन्यात योग्य ती पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यानी नमूद केले.

कॉंग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आदींनी यावेळी खाणमंत्री प्रमोद सावंत यांना खाणीसंबंधीचे विविध प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. खाणीचा विषय हा गंभीर असल्याने या प्रश्‍नावर विधानसभेत चर्चेसाठी अर्धा तास द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी केली.
त्यावर उत्तर देताना प्रमोद सावंत म्हणाले की हे पावसाळी अधिवेशन हे लांब पल्ल्याचे आहे आणि आम्ही या विषयावर चर्चेसाठी अर्धा तास नक्कीच देऊ.

तीन दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक
राज्यातील खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या एका गटाची यापूर्वीच स्थापना करण्यात आलेली असून तीन दिवसांपूर्वीच ह्या मंत्र्यांच्या गटाबरोबर बैठक झाली. गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी, कोळसा मंत्री पियुष गोयल आदी मंत्र्यांसह आपण स्वतः गोव्याचे मुख्य सचिव व ऍडव्होकेट जनरल आदी या बैठकीला हजर होते, असे सावंत यानी सांगितले. खाण उद्योग सुरू करण्यासाठी काय करता येईल याविषयीच्या वेगवेगळ्या पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.

खनिज उत्खननास विलंब लागणा
खाणी सुरू होऊन प्रत्यक्ष उत्खनन होण्यास थोडासा विलंब लागेल. मात्र, त्या दरम्यानच्या काळात यापूर्वीच काढण्यात आलेल्या खनिजाचा ई-लिलाव करण्यात येईल. तसेच डम्पचे काय करायचे त्याचाही निर्णय आम्ही घेणार असल्याचे सावंत यानी यावेळी स्पष्ट केले. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी खाणीचा मुद्दा उपस्थित करताना आमदार प्रतापसिंह राणे यानी खाण उद्योग हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे आणखी जास्त काळ हा उद्योग बंद राहणे हे गोव्याच्या हिताचे नाही. राज्यातील सुमारे ४० हजार लोक खाणीवर काम करीत असतात. त्यांच्या अस्तित्वाचा हा प्रश्‍न असल्याचे नमूद केले. यावेळी राणे तसेच आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी या प्रश्‍नावर विधानसभेत अर्धा तास चर्चेसाठी द्यावा, अशी मागणी केली असता सभापती राजेश पाटणेकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी मागणी मान्य केली.