ब्रेकिंग न्यूज़

खरे हल्लेखोर

जम्मूमधील संजवानमध्ये जैश ए महंमदच्या दहशतवाद्यांनी चढवलेला आत्मघाती हल्ला हा भारतमातेच्या उरावरील आणखी एक घाव आहे. दरवर्षी अशा प्रकारचे अगणित आत्मघाती हल्ले होत असूनही या सर्वांची पाकिस्तानातील पाळेमुळे उखडून फेकण्याची हिंमत अद्याप भारत सरकार दाखवू शकत नाही ही शरमेची बाब आहे. सर्जिकल स्ट्राईकने या देशाचा जागवलेला देशाचा स्वाभिमान पुन्हा लयाला गेला की काय असे वाटण्याजोगी आज परिस्थिती आहे. काश्मीर खोर्‍यात दगडफेक करणार्‍या हजारो गावगुंडांवरील गुन्हे सपशेल मागे घेऊन त्यांना केवळ राजकीय लाभासाठी मोकाट सोडले जाते आणि हिंसक जमावापासून आत्मरक्षणार्थ गोळीबार करण्यास भाग पडलेल्या लष्करी अधिकार्‍यांवर मात्र खुनाचे गुन्हे नोंंदवले जातात या अत्यंत हीन राजकीय अनुनयतीच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा दहशतवादी हल्ला म्हणूनच अधिक जिव्हारी लागणारा आहे. १० गढवाल रायफल्सच्या ज्या मेजर आदित्यकुमारवर जम्मू काश्मीरच्या पीडीपी – भाजप सरकारच्या आदेशावरून तेथील पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला, त्याच्या माजी लष्करी अधिकारी असलेल्या पित्याला – लेफ्टनंट कर्नल करमवीर सिंग यांना त्याविरुद्ध निरुपाय होऊन शेवटी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागली, काश्मीरमध्ये तळहातावर शिर घेऊन लढणार्‍या लष्करी जवानांच्या मुलांना आपल्या वडिलांवर दगडफेक करणार्‍या सैतानांविरुद्ध मानवी हक्क आयोगाकडे धाव घ्यावी लागली आणि हे सगळे राष्ट्रवादाची सदैव बात करीत आलेल्या भाजपचे केंद्रात स्वबळाचे आणि काश्मीरमध्ये आघाडीचे सरकार असताना घडते हे लाजीरवाणे नाही काय? ज्या निर्धाराने दहशतवाद्यांविरुद्ध काश्मीरमध्ये आजवर मोहीम राबवली गेली, दहशतवाद्यांचा एकामागून एक खात्मा केला गेला, फुटिरतावाद्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या, तो जोश, तो निर्धार गळामिठीच्या भलत्या स्वप्नांमध्ये हरवला तर नाही ना? जम्मूतील लष्करी छावणीवरील हल्ला १० फेब्रुवारीला झाला याला काही विशेष अर्थ आहे. ९ फेब्रुवारी हा संसदेवरील हल्ल्याचा काश्मिरी सूत्रधार अफजल गुरू याला फासावर लटकावले गेले त्याचा स्मृतीदिन आणि ११ फेब्रुवारी हा जेकेएलएफचा संस्थापक मकबूल भट, ज्याला तिहारमध्ये ८४ साली फासावर लटकावण्यात आले त्याचा स्मृतीदिन काश्मीरमधील देशद्रोही पाळतात. त्यामुळे या दोहोंच्या मधला दिवस या हल्ल्यासाठी निवडला गेला. या हल्ल्यामागे जैश ए महंमद असल्याचा संशय आहे. असे अगणित हल्ले लष्कर आणि निमलष्करी दलांवर आजवर होत आले आहेत. सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २०१४ साली १० दहशतवादी हल्ले झाले ज्यात ३८ जवान ठार झाले. २०१५ साली अकरा हल्ले झाले आणि ६७ जवानांचा बळी गेला. २०१६ साली पंधरा हल्ले झाले आणि ६८ जवान शहीद झाले. २०१७ मध्ये तर कधी सीआरपीएफ, कधी बीएसएफ, कधी लष्कर असे दहशतवादी हल्ले सतत होत राहिले. अगदी वर्षाच्या शेवटच्या तारखेलाही पाम्पौरच्या सीआरपीएफ कँपावर हल्ला चढवला गेला होता. जम्मूतील ज्या तळावर शनिवारी हल्ला झाला, तेथेच यापूर्वीही एकदा असाच दहशतवादी हल्ला झाला होता. जम्मूतील हा हल्ला सैन्यतळाच्या मागील बाजूने झाला. या बाजूला सैनिकांच्या कुटुंबांची वसाहत आहे. हल्ल्यात काही कुटुंबियांचा बळीही गेला आहे. दहशतवाद्यांचे हे कृत्य अत्यंत भेकडपणाचे आहे. अशा प्रकारचे हल्ले होतात तेव्हा जवानांचे मनोधैर्य टिकवण्याचे, उंचावण्याचे प्रयत्न होण्याची आवश्यकता असते. दुर्दैवाने जम्मू काश्मीरच्या विधानसभेत जे चित्र दिसले ते बोलके होते. तेथे नॅशनल कॉन्फरन्सच्या एका आमदाराने थेट पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. काश्मीरात सत्तारूढ असलेल्या पीडीपीची एकूण नीती नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे. देश आणि सत्ता यात राजकारण्यांकडून जेव्हा सत्तेला प्राधान्य दिले जाते तेव्हाच अशा प्रकारचे हल्ले दहशतवादी करतात. त्यामुळे हे हल्ले रोखण्यासाठी देशाने कोणाच्या पाठीशी राहायचे हे ठरवावे. स्वरक्षणार्थ दगडफेक्याला जीपला बांधून निवडणूक अधिकार्‍यांचा बचाव करणार्‍या मेजर गोगोईला आरोपी ठरवले जाते, दगडांनी ठेचून मारल्या जात असलेल्या आपल्या जेसीओला वाचवण्यासाठी गोळीबार करणार्‍या मेजर आदित्यकुमारवर खुनाचा गुन्हा नोंदवला जातो आणि जे देशद्रोही पाकिस्तानच्या जिवावर काश्मीरमध्ये उड्या मारत आहेत त्यांच्यावरील गुन्हे माफ करून मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि त्यांचे पीडीपी – भाजप सरकार खोर्‍यात सवंग लोकप्रियता मिळवण्याची दिवास्वप्ने पाहते आहे? ही देशाशी प्रतारणा आहे. गद्दारी आहे. अशा वृत्तीतूनच देशद्रोही शक्तींना बळ मिळते आणि त्याची परिणती अशा हल्ल्यांमध्ये होत असते. खरे हल्लेखोर तर हेच आहेत!