खरे कोण?

केंद्रात पर्यावरणमंत्री असताना गोव्याच्या खाणींचे पर्यावरण परवाने निलंबित करणार्‍या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या जयंती नटराजन यांनी काल त्या पक्षाला रामराम ठोकला. आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना गेल्या ५ नोव्हेंबरला लिहिलेल्या पत्राची प्रतही त्यांनी पत्रकारांना सुपूर्द केली. नटराजन यांच्या राजीनाम्यापेक्षा त्यांनी टाकलेला हा पत्र बॉम्ब आणि कॉंग्रेसचे त्यावरचे प्रत्युत्तर या दोन्ही गोष्टी स्फोटक आहेत. राहुल गांधी यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे थेट आरोप त्यांनी या पत्रात केलेले आहेत. आपल्याला कोणतेही कारण नसताना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावण्यात आला, पक्षकार्यासाठी राजीनामा द्या असे आपल्याला सांगितले गेले होते, पण राहुल यांच्या गोटातून आपल्या बदनामीचे सत्र सुरू झाले. त्यांच्या कार्यालयातील व्यक्ती प्रसिद्धी माध्यमांना फोन करून आपला राजीनामा पक्षकार्यासाठी नसल्याचे सांगत होत्या, राजीनामा मागताना आपल्याला त्याचे कारण सांगण्यात आले नाही व नंतर जेव्हा राहुल व सोनिया यांची भेट मागितली, तेव्हा ती सतत नाकारण्यात आली, वगैरे आरोप तर जयंती यांच्या या पत्रात आहेत, परंतु त्यापलीकडे ज्या काही गोष्टी त्यातून सूचित केल्या गेल्या आहेत, त्या अधिक गंभीर आहेत. विविध पर्यावरणीय प्रश्नांवर निर्णय घेत असताना आपल्यावर आपल्याच मंत्रिमंडळातील सहकार्‍यांचा दबाव असायचा, अदानींसारख्या बड्या उद्योगपतीच्या प्रकल्पाची फाइल गूढरीत्या गायब केली गेली होती, आपण घेतलेले काही निर्णय न रुचल्यानेच आपल्यावर कारवाई झाली असे जयंती यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसने हा जयंती यांचा स्वतःची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे आणि मोदींनी मेरशीच्या सभेमध्ये ज्या ‘जयंती टॅक्स’ चा उल्लेख केला होता, त्या गंभीर आरोपांना अनुसरूनच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली होती असा दावाही केला आहे. या सगळ्या गदारोळात काही प्रश्न उपस्थित होतात. पहिली गोष्ट म्हणजे जर जयंती यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हटवले गेले होते, तर पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा स्वीकारत असताना त्यांच्या कार्याची प्रशंसा करणारे पत्र का लिहिलेे? मागील सरकारमधील खरी सत्ता केंद्रे सोनिया आणि राहुल हीच होती. सिंग हे केवळ रबरी शिक्का होते या संजय बारू, नटवरसिंग वगैरेंनी आपल्या पुस्तकांतून मांडलेल्या प्रतिमेला या सार्‍या प्रकरणातून पुष्टीच मिळते. पर्यावरण मंत्रालय हे सरकारमधील एक संवेदनशील मंत्रालय असते. कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना या खात्याची पर्यावरणीय मंजुरी आवश्यक असते. अशा वेळी जयंती यांनी जे निर्णय घेतले त्यामागे भ्रष्टाचार होत होता आणि त्यामुळेच त्यांना हटवण्यात आले असा जो दावा आज कॉंग्रेस करीत आहे, तो खरा होता, तर त्यांना पक्षकार्यासाठी बाजूला काढण्यात येत असल्याचा बनाव पक्षाने का केला? पक्षाची आणि सरकारची प्रतिमा डागाळू नये म्हणून देशाशी केलेली ती प्रतारणा नव्हती काय? येथे एक प्रसंग नमूद करण्याजोगा आहे. ज्या दिवशी जयंती यांचा राजीनामा घेतला गेला, त्याच दिवशी म्हणजे २० डिसेंबर २०१३ रोजी राहुल गांधी यांनी भारतीय उद्योग महासंघाच्या समारंभात बोलताना पर्यावरणीय परवान्यांना अकारण विलंब लावला जात असे, त्यामुळे अर्थव्यवस्थेपुढे संकट निर्माण होत असल्याचे वक्तव्य केले होते. यापुढे आपले सरकार असा विलंब होऊ देणार नाही असे आश्वासनही उद्योग जगताला त्यांनी दिले होते. हेच राहुल गांधी नियमगिरीमध्ये जाऊन तेथील डोंगरिया कोंढ आदिवासींना मी आपला शिपाई आहे असे सांगत होते. यातले कोणते राहुल खरे? देशाच्या पर्यावरणीय प्रश्नावर कॉंग्रेस पक्षाने वेळोवेळी जी भूमिका घेतली, त्यामागे कोणती गणिते असायची? एकीकडे पर्यावरण रक्षणाची भूमिका घेणारे दुसरीकडे बड्या उद्योगसमूहांची पाठराखण करीत होते का? कॉर्पोरेटस्‌च्या दबावाखाली मनमोहन सरकार निर्णय घेत होते का? मंत्रिमंडळातील कोणते सदस्य पर्यावरणमंत्र्यांवर मंजुरीसाठी दबाव आणत होते? राहुल आणि सोनिया या दोन सरकारबाह्य सत्ताकेंद्रांकडून सरकारच्या कारभारात सातत्याने ढवळाढवळ चालत होती का? मनमोहन सिंग खरोखरच निव्वळ रबरी शिक्का होते का? अनेक प्रश्नांची भेंडोळी आता जयंती नटराजन यांच्या राजीनामानाट्यातून उलगडली आहेत आणि संबंधितांना त्यांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.