खरा उपाय

कोलकात्यातील दोघा कनिष्ठ डॉक्टरांना झालेल्या मारहाणीवरून सुरू झालेले डॉक्टरांचे आंदोलन चिघळत चिघळत देश पातळीवर पोहोचले. आपल्या व्यवसायबंधूंच्या समर्थनार्थ डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटनेने देशव्यापी संपाची हाक दिली आणि त्याचे परिणाम देशभरातील कोट्यवधी रुग्णांना नाहक भोगावे लागत आहेत. काट्याचा नायटा व्हावा तसे हे आंदोलन पसरत गेले, त्याला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तोंडची दादागिरीची भाषा कारणीभूत आहे. कोलकात्याच्या नीलरतन सरकार इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आणि मृतदेह ताब्यात मिळण्यासही विलंब लावण्यात आल्याचा आरोप करीत त्याच्या सतरा वर्षीय मुलाने आणि त्याच्या मित्राने तेथील दोघा डॉक्टरांना मारहाण केली. त्यानंतर निवासी डॉक्टर आणि मृताचे नातेवाईक यांच्यामध्ये हाणामारी झाली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे ११ जूनपासून इस्पितळाचे गेट बंद करून निवासी डॉक्टर संपावर गेले. डॉक्टरांना मारहाण करणार्‍यांस अटक करा आणि सरकारी वैद्यकीय इस्पितळांमध्ये सुरक्षा पुरवा अशा त्यांच्या मागण्या होत्या आणि त्या रास्त होत्या, परंतु ममता बॅनर्जी ज्या प्रकारे या आंदोलनाला सामोर्‍या गेल्या त्यामध्ये आपल्या मतपेढीला सांभाळण्याचे त्यांचे प्रयत्न स्पष्ट दिसत होते. डॉक्टरांच्या आंदोलनाला त्यांनी भाजप आणि माकपचे षड्‌यंत्र ठरवून टाकले आणि आपल्या हटवादी स्वभावानुसार दांडगाईची भाषा चालवली. त्यातून हे आंदोलन चिघळले आणि आटोक्याबाहेर गेले. डॉक्टरांच्या सामूहिक राजीनामासत्रानंतर प. बंगाल सरकार नरमले आणि त्यांनी आंदोलकांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्या, परंतु तोवर वेळ निघून गेली होती! पश्‍चिम बंगालमध्ये डॉक्टरांवरील हल्ल्याची ही काही पहिली घटना नव्हे. यावर्षीच जवळजवळ शंभर अशा घटना घडल्या आहेत. इस्पितळांना सुरक्षा पुरवली जात नाही आणि हल्ले झाले तर राजकीय दबावाखातर पोलिसी कारवाई होत नाही असे तेथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा घटना घडतात तेव्हा त्याला दोन बाजू असू शकतात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये वाढलेल्या अपप्रवृत्ती, सरकारी इस्पितळांतील रुग्णसेवेतील मनमानी, सर्वसामान्यांप्रतीची अनास्था या सार्‍या गोष्टींमुळे वैद्यकीय क्षेत्राबाबत आज पूर्वीइतका आदर राहिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. डॉ. सखाराम गुड्यांसारख्या रुग्णांच्या घरी जाऊन रात्री अपरात्री त्यांची काळजी वाहणार्‍या सेवाभावी डॉक्टरांची परंपरा केव्हाच लोपली. आज अन्य कोणत्याही व्यवसायांसारखाच डॉक्टरी पेशा हाही व्यवसाय बनलेला आहे. त्यातून पूर्वी डॉक्टरला देव मानण्याची जी काही परंपरा होती, त्यांच्याशी जो आदराचा, आस्थेचा धागा जोडलेला असायचा, तो आज तुटत चाललेला आहे. त्यातून या क्षेत्राप्रती अविश्वासाची भावना निर्माण झालेली आहे. हा अविश्वास दृढ करणारे अनुभव रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अधूनमधून येत असतात, परंतु डॉक्टरांच्या प्रत्येक कृतीविषयी अविश्वास दाखवणे योग्य म्हणता येणार नाही. खर्‍याखोट्याची, वस्तुस्थितीची शहानिशा न करता डॉक्टरांना जबाबदार धरणे आणि त्यांच्यावर हात उगारणे हेही प्रकार वाढीस लागले आहेत. वास्तविक ममता बॅनर्जी यांना डॉक्टरांच्या मागण्यांसंबंधी उपाययोजना करण्यासाठी काही पावले टाकणे शक्य होती, परंतु त्या सत्तेच्या गुर्मीत राहिल्या. त्याची परिणती डॉक्टरांच्या सामूहिक राजीनाम्यांत झाली आणि आंदोलन चिघळले. आता यामध्ये डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटनेने सामील होऊन आणि आपल्या संघटितपणाचे शक्तिप्रदर्शन घडवत थेट देशव्यापी संपाची हाक देणे कितपत योग्य होते? त्याचे परिणाम काहीही दोष नसताना देशातील कोट्यवधी रुग्णांना नाहक भोगावे लागले. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न धसास लावण्यासाठी आणि त्यासंबंधी कायदा व्हावा यासाठी वैधानिक मार्गांनी प्रयत्न झाले पाहिजेत. देशात नवे सरकार नुकतेच सत्तेवर आले आहे आणि या विषयावर सहमती निर्माण करण्यासाठी त्यांना वेळ देणे गरजेचे होते. केवळ आपली संघटित ताकद दाखवण्यासाठी संपाचे हत्यार उपसणे योग्य नाही. वैद्यकीय सेवा म्हणजे काही कामगार चळवळ नव्हे, की कधीही उठावे आणि काम बंद पाडावे! तेथे रुग्णांच्या जीवनमरणाचा प्रश्न जोडलेला असतो. एक दिवस काम बंद ठेवल्याने देशभरातील इस्पितळांतील रुग्णांना कोणत्या उपचारांअभावी कोणत्या मरणयातना सोसाव्या लागतील याचा विचार संवेदनशीलपणे व्हायला हवा होता. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुरक्षा पुरवणारा कायदा करायचा झाला, तर मग इतर व्यावसायिक क्षेत्रांनाही असा कायदा का नसावा असा विषयही पुढे येईल. वकिलांना, पत्रकारांना कायदेशीर संरक्षण का नसावे? महाराष्ट्रात पत्रकारांनी तसा कायदा करून घेतला आहे, परंतु त्यातून मूळ समस्या सुटलेली नाही. खरे तर आपल्याकडे सामान्य नागरिकासाठीदेखील पुरेसे कायदे आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही हीच खरी समस्या आहे. मुळात समाजामध्ये आपल्याविषयी अविश्वास का निर्माण होत आहे हे प्रत्येकाने तपासणे हाच खरा उपाय ठरेल!