खराब हवामानाचा मच्छिमारी व्यवसायाला मोठा फटका

>> अजूनही ९० टक्के ट्रॉलर जेटीवरच नांगरलेले

राज्यातील वादळी वारा आणि जोरदार पावसाचा मच्छीमारी व्यवसायाला फटका बसला आहे. खराब हवामानामुळे मच्छीमारी व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, अशी माहिती ट्रॉलर व्यावसायिक हर्षद धोंड यांनी काल दिली.
राज्यातील मच्छीमारी बंदी ३१ जुलै २०१९ रोजी मागे घेण्यात आलेली असली तरी, अद्यापपर्यंत सुमारे ९० टक्के मच्छीमारी ट्रॉलर जेटीवर नांगरून ठेवलेल्या स्थितीत आहेत. मालिम, वास्को, कुटबण आदी जेटी आणि इतर ठिकाणी मच्छीमारी ट्रॉलर नांगरून ठेवण्यात आलेले आहेत. मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या ट्रॉलरना योग्य प्रमाणात मासळी मिळत नाही. आपण दोन ट्रॉलर समुद्रात पाठविले होते. परंतु, योग्य प्रमाणात मासळी मिळाली नाही, अशी खंत मच्छीमारी व्यावसायिक धोंड यांनी व्यक्त केली.

हवामान विभागाने मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आल्याने ट्रॉलर व्यावसायिक सावध बनले आहेत. हवामान विभागाने ९ सप्टेंबरपर्यंत मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा दिलेला आहे.