खनिज डंपचा जूनमध्ये ई-लिलाव

राज्यातील सुमारे ५ मॅट्रिक टन खनिजाचा ई – लिलाव जून महिन्यात केला जाणार असून खनिज डंप धोरण जुलै महिन्यात तयार केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण व्यावसायिक आणि खाण खात्याच्या अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

या बैठकीत राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला आहे. राज्यातील खाणींवर पडून असलेल्या जुन्या खनिजाचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची सूचना बैठकीत करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात खनिजाचा ई – लिलाव केला जाणार आहे. खनिजाच्या ई – लिलावासाठी दर निश्‍चित करण्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यातील खनिज डंपच्या विषयावर चर्चा करण्यात आली. खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खनिज डंपबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अनेकजण खनिज डंप विकत घेण्यास इच्छुक आहेत. जुलै महिन्यात खनिज डंप पॉलिसी निश्‍चित केली जाणार आहे. त्यानंतर खनिज डंपचा लिलाव केला जाणार आहे. राज्यात खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलली जात आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

सरकारकडून येत्या पावसाळ्यात खाणींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे. सुरक्षा उपाय योजना करताना गरज भासल्यास खाण व्यावसायिकांची मदत घेतली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.