खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूण

>> मंत्री दीपक पाऊसकर : कामत यांचे आरोप बिनबुडाचे

राज्यातील रस्त्यांवरील खड्डे मशीनद्वारे बुजविण्याचे काम हाती घेताना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.
राज्य सरकार डांबराची आयात करणार नाही. तर, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल या सरकारी एजन्सी किंवा कंत्राटदारांकडून विदेशातून डांबराची आयात केली जाणार आहे, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल केले.
गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि डांबर आयातीबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असा दावा मंत्री पाऊसकर यांनी केला.

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हे आपत्कालीन काम असून हे काम करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. या मशीनच्या माध्यमातून दरदिवशी १५ क्युबिक मीटर खड्‌ड्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. रस्त्यावरील खड्‌ड्यांमुळे वाहन चालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम खात्याकडून कंत्राटदारांमार्फत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतलेले आहे. परंतु, पावसामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे तयार होतात. दुरुस्त केलेले खड्डे सुध्दा पुन्हा तयार होतात. आगामी दसरोत्सवापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. खात्याच्या रस्ता विभागाकडून रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीला प्राधान्य दिलेले आहे. महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक सूचना करण्यात आलेल्या आहेत, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या विदेशी धोरणाच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. देशात जास्तीत जास्त डांबर आखाती देशातून आणले जाते. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग सिमेंट कॉंक्रिटचा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार सुध्दा काही रस्ते सिमेंट कॉक्रिटचे करण्याचा निर्णय घेऊ शकते, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

राज्यातील रस्त्याच्या कामासाठी दरवर्षी सुमारे ५० हजार मॅट्रिक टन डांबराची आवश्यकता भासते. गतवर्षी योग्य प्रमाणात डांबर उपलब्ध न झाल्याने ३५ टक्के रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे होऊ शकली नाहीत. सरकारी एजन्सी किंवा कंत्राटदारांमार्फत आवश्यक डांबराची आयात करण्याचा विचार सुरू आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

निविदेविना खड्डे बुजविण्याचे काम

गोवा फॉरवर्डचा आरोप

सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आणलेल्या मशीनसाठी निविदा जारी केलेली नाही. निविदा जारी न करता खड्डे बुजविण्याचे काम हाती घेऊन कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी गोवा फॉरवर्डच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.

राज्यातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी दिलेली आश्‍वासने हवेत विरली आहेत. आता, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी एक मशीन आणण्यात आले आहे. सदर मशीन भाडेपट्टीवर घेताना कायदेशीर कार्यवाही केलेली नाही. नुवे मतदारसंघातून बुधवारपासून मशीनच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे, असेही कामत यांनी सांगितले.

राज्य सरकारने २०११ मध्ये एक परिपत्रक जारी करून ५ लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या कामासाठी ई निविदा जारी करण्याची अट घातलेली आहे. बांधकाम खात्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता मशीन आणले आहे. या मशीनच्या माध्यमातून दर दिवशी केवळ १५ क्युबिक मीटर रस्त्यावरील खड्डे बुजविले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला उशीर होऊ शकतो, असा दावा कामत यांनी केला.