ब्रेकिंग न्यूज़

 क्षण एकच पुरे !

–  अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)
कोणत्यातरी एका क्षणी वादळ येतं किंवा पूर येतो किंवा भूकंप होतो आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. कोणत्या तरी एका क्षणी झाडावर कळी फुटते आणि दुसर्‍या एका क्षणात कळीचं फूल होतं. श्रावणातल्या पावसाचं वर्णनच- ‘क्षणात येती सरसर शिरवे.. क्षणात फिरुनी ऊन पडे’ असं आहे. 
‘क्षण’ हा माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की त्या क्षणाला माणसाचं आयुष्यच पूर्ण बदलून जातं. होत्याचं नव्हतं व्हायला अन् नव्हत्याचं होतं व्हायला एक क्षण पुरे असतो. म्हणूनच येणार्‍या प्रत्येक क्षणाची माणूस उत्सुकतेने वाट बघत असतो. एक प्रेमाचा क्षणसुद्धा हजारो दुःख झेलण्याचं सामर्थ्य देतो. ‘‘क्षण एक पुरे प्रेमाचा | वर्षाव पडो मरणाचा’’ ही कवितेतील ओळ किती सार्थ आहे!!
अगदी ताज्या घटनेचंच बघा ना. ८-१० दिवसांपूर्वी ‘चांद्रयान-२’चं उड्डाण झालं. ८ दिवसांपूर्वी हे उड्डाण व्हायचं होतं. काही तांत्रिक बिघाडामुळे ते पुढे ढकललं गेलं. तेव्हापासून भारतातील तमाम जनतेने श्‍वास रोखून धरला होता. परवा जेव्हा दुपारचे २.४३वा. ही वेळ सांगितली गेली तेव्हा त्या वेळेपर्यंत एकेक क्षण एकेक युगासारखा भासला होता. २.४० पासून आपण सगळे श्‍वास रोखून बसलो होतो. उड्डाणाच्या ‘त्या’ क्षणाची वाट पाहात होतो…. आणि ज्या क्षणाला चांद्रयान-२चं उड्डाण झालं, त्या क्षणाला रोखून धरलेले सगळे श्‍वास मोकळे झाले. तो क्षण भारतीयांच्या अभिमानाचा ठरला. त्या क्षणाची वाट पाहात असलेल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी निःश्‍वास सोडला. तो क्षण त्यांच्यासाठी अभिमानाचा, यशाचा आणि त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ठरला. माणसाचा जन्मच मुळी एका क्षणात होतो. क्षणापूर्वी आईच्या पोटात असलेलं बाळ, दुसर्‍या क्षणाला जगात येतं आणि त्याच क्षणी आईचाही पुनर्जन्म होतो. त्या क्षणाला एका स्त्रीचं जीवन कृतार्थ होतं. एकाच क्षणात जगातला सर्वोच्च आनंद तिच्या ठायी गोळा होतो. त्या क्षणाचं वर्णन शब्दात नाही करता येणार.
एखादा मुलगा/मुलगी वर्षभर जिद्दीनं कसून अभ्यास करतात आणि जेव्हा ती बोर्डात, विद्यापीठात पहिली येतात, त्यावेळी तो क्षण त्यांच्या आयुष्यातील अत्युच्च आनंदाचा क्षण असतो. तो क्षण त्यांची प्रेरणा ठरू शकतो. पण काही वेळेला याच्या उलटही होतं. मुलं हुशार असतात. खूप मेहनत घेऊन अभ्यासही करतात. पण गुण अपेक्षेपेक्षा फारच कमी मिळतात किंवा नापास होतात. त्यावेळी तो क्षण त्यांच्यासाठी विफलतेचा ठरतो. त्याक्षणी मुलं इतकी निराश होतात की स्वतःचं बरं-वाईट करतात. आत्महत्या करतात. नको त्या पंथाला लागतात किंवा त्याच्याही उलट होतं. त्या क्षणाला मुलांची जिद्द पेटून उठते. मेहनतीला लागतात आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेतात. तो क्षण त्यांच्या आयुष्याचा बर्‍या किंवा वाईट अर्थाने टर्निंग पॉईंट ठरतो.
तरुण वयातली मुलं/मुली कोणत्यातरी एका क्षणाला प्रेमात पडतात. लग्नाचा निर्णय घेतात. ते यशस्वी झालं तर ठीक. नाहीतर तो क्षण त्या दोघांनाही फार वाईट वळणावर आणून सोडतो. माणूस व्यसनाधीन होऊ शकतो. एखादा क्षण असा येतो ज्या क्षणाला मुली वासनेच्या बळी ठरतात. त्या क्षणाला त्यांचा पाय घसरतो आणि नंतर त्याचे फार वाईट परिणाम त्यांना आणि त्या चुकीतून जन्माला आलेल्या बाळाला आयुष्यभर भोगावे लागतात. पण नंतर त्याचा काही उपयोग नसतो. कारण तो क्षण कधीच निघून गेलेला असतो.
मुलीचे दुसर्‍या जातीतील मुलाशी प्रेमसंबंध आहेत कळल्यावर ते न पटलेल्या कठोर बापाच्या डोक्यात तिडीक उठते आणि एका क्षणी आपल्या मुलीचा खुनी ठरतो. मग एखाद्या वेळेस त्याला प्रश्‍चात्ताप होतही असेल… पण तो क्षण निघून गेलेला असतो.
माणसाचं आयुष्यच क्षणभंगूर असतं. कुठेतरी प्रवासाला निघालेल्या गाडीवर घाटात दरड कोसळते आणि एका क्षणात गाडीतली माणसं मृत्युमुखी पडतात. घरी चाललेल्या जवानांच्या ताफ्यावर एका क्षणात बॉंबस्फोट होतो आणि क्षणार्धात सगळे जवान मृत्युमुखी पडतात. घरातल्याच आपल्या जवळच्या माणसाचं निधन होतं आणि त्याची बायको-मुलं क्षणार्धात अनाथ होऊन जातात. अरे आत्ता आपलं माणूस आपल्याशी बोलत होतं आणि दुसर्‍या क्षणाला आपल्याला चटका देऊन तो आपल्यातून नाहीसा होतो आणि आपल्याला कळतही नाही? तो ‘क्षण’ अविस्मरणीय ठरतो.
अहो, माणसांच्याच बाबतीत असं होतं असं नाही, तर निसर्गाचा कोपसुद्धा एका क्षणात सर्व उध्वस्त करतो. कोणत्यातरी एका क्षणी वादळ येतं किंवा पूर येतो किंवा भूकंप होतो आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. कोणत्या तरी एका क्षणी झाडावर कळी फुटते आणि दुसर्‍या एका क्षणात कळीचं फूल होतं. श्रावणातल्या पावसाचं वर्णनच- ‘क्षणात येती सरसर शिरवे..क्षणात फिरुनी ऊन पडे’असं आहे.
आत्ता हा लेख पूर्णत्वाला येता येता माझ्यासाठी एक क्षण असाच आनंद घेऊन आला. मिरजेहून मला एक पत्र आलं. वर नाव बघितलं. ओळखीचं वाटलं नाही. पाकीट उघडून बघितलं ते पत्र मिरजेच्या एका निवृत्त प्राध्यापकाचं होतं. त्यांना स्वाक्षर्‍या जमविण्याचा छंद होता. आतापर्यंत त्यांनी २००० स्वाक्षर्‍या घेतलेल्या आहेत. माझं ‘शोध माणसाचा’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आलं. त्यांना ते आवडलं. तसा अभिप्रायही त्यांनी त्या पत्रातून दिला होता आणि चक्क माझी स्वाक्षरी आणि फोटो त्यांना हवा आहे, असं त्यांनी कळवलं आहे. ते पत्र वाचलं आणि त्या क्षणी गगनात न मावण्याइतका आनंद मला झाला. माझ्या सासर-माहेरच्या कोणत्याच घराण्यात हा मान कोणालाच मिळाला नव्हता तो मान आज मला मिळाला. तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा, खूप आनंदाचा आणि कायम स्मरणात राहणारा आहे!!
एकूण काय, एकच क्षण माणसाला दुःखाच्या खाईत लोटतो आणि सुखाच्या शिखरावरही घेऊन जातो. क्षण एकच पुरे!