ब्रेकिंग न्यूज़

क्रोएशिया ः उपवनांचा देश

– सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकर

प्रवासाला जाणे म्हणजे त्याच त्याच नेहमीच्या दुनियेतून एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करणे; आणि जर हा प्रवास दूरवरचा आगळ्या-वेगळ्या देशातला असेल तर तो जादूई दुनियेतला प्रवेश ठरतो. या आमच्या टूरमध्ये क्रोएशिया, स्लोव्हेनिया, हंगेरी, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, जर्मनी आणि पोलंड या देशांचा समावेश होता.

 

प्रवासाला जाणे म्हणजे त्याच त्याच नेहमीच्या दुनियेतून एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करणे, आणि जर हा प्रवास दूरवरचा आगळ्या-वेगळ्या देशातला असेल तर तो जादूई दुनियेतला प्रवेश ठरतो. पर्यटनाच्या दृष्टीने परदेशी जायचे तर सगळ्यात प्रसिद्ध आणि पहिल्या पसंतीचा पर्याय म्हणजे ‘युरोप’ हे तर जगजाहीर आहेच. कारण युरोपमध्ये निसर्गसौंदर्याबरोबर किंवा त्याच्याही वरचढ आपल्याला इतिहासातील महत्त्वाची ठिकाणे जागोजागी पाहायला मिळतात. शाळा-कॉलेजमध्ये शिकलेल्या, इतिहास, विज्ञान आणि भूगोलाच्या पुस्तकांतील चित्रांत पाहिलेल्या वास्तू जशाच्या तशा स्वरुपात पाहायला मिळतात. पिसाचा मनोरा, लिओ नार्डो दि विंची, टॉवरब्रीज, मोठी मोठी पाती असलेल्या शंकूच्या आकाराच्या लाकडी पाणचक्या आणि पवनचक्या, आयफेल टॉवर वगैरे… शेक्सपियर, गॅलिलिओ, न्यूटन, नेपोलियन यांची पुन्हा गाठ पडते. शाळेत असताना जे जे वाचले होते त्याची मनातल्या मनात पुन्हा उजळणी होते. लहानपणी हरवलेला मित्र पुन्हा भेटल्याचा आनंद होतो.

शाळेत हे सर्व वाचल्यावर, नंतर मोठे झाल्यानंतर पाहिलेल्या ‘गन्स ऑफ नॅवेरोन’, ‘डर्टी डझन्स’, ‘टोराटोराटोरा’, ‘एस्केप फ्रॉम सोर्बीबॉब’ असे अनेक सिनेमे, त्यांतील धडधडणारे हजारो रणगाडे, तोफा, विमाने, लाखो सैनिक, ज्यूंचा नरसंहार आणि या सर्वाला कारणीभूत झालेला नाझी भस्मासुर ‘हिटलर’ डोळ्यांपुढे उभा राहतो. रशियाचा स्टॅलिन आठवतो आणि त्या युद्धात ससेहोलपट झालेले पोलंड, झेकोस्लाव्हियासारखे देश आठवतात. ‘न्युरेंबर्ग’ सिनेमात पाहिलेले, बॉम्बहल्ल्यात बेचिराख झालेले बर्लिन आठवते.

पश्चिम युरोप म्हणजे इटली, फ्रान्स, इंग्लंड, पश्चिम जर्मनी, स्वित्झर्लंड इत्यादी देशांच्या टूरमध्ये आता महायुद्धासंबंधी काहीही दाखवत नाहीत, इतके सर्व बदललेले आहे. आता त्याचे कोणी नावही काढत नाही. ही टूर आता आपल्या मध्यमवर्गीयात कॉमन झालेली आहे. तिथल्या स्थलदर्शनाबद्दल बरीच प्रवासवर्णनेही प्रसिद्ध झाली आहेत.

पण यावेळी आम्ही गेलो होतो त्या ‘इस्ट आणि सेन्ट्रल युरोप’ या टूरमध्ये बहुतेक ठिकाणी आम्हाला दुसर्‍या महायुद्धाची सावली पडलेली जाणवली. सुरुवातीची दोन ठिकाणे वगळता पुढच्या प्रत्येक ठिकाणी तिथल्या स्थानिक गाईडने त्या इतिहासाची उजळणी केली. तेव्हाच्या बॉम्बहल्ल्याच्या खुणा दाखविल्या.

आमच्या मागील एका टूरमध्ये पंधरा-सोळा टूर केलेल्या एका प्रोफेसराची ओळख झाली होती. त्यांनी या टूरची खूप भलावण केली होती. त्यांचा सल्ला शिरोधार्ह मानून आणि वि. स. वाळिंबे यांचे ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ या पुस्तकाची दोन-तीन पारायणे केलेली असल्याने या टूरला जायचे आम्ही नक्की केले. आणखी एक कारण म्हणजे युरोपचा इतिहास हा आम्हा उभयतांचा आवडीचा विषय. दुसर्‍या महायुद्धाशी संबंधित असा हा भाग. त्यावरचे कित्येक सिनेमे आमच्या संग्रहात आहेत. होलोकास्टवरच्या (ज्यूंचे दमन) सिनेमामुळे ऑस्वीचसारख्या मृत्युछावण्या, छळछावण्या, घेटो, हिटलरचा शेवट झाला ते बंकर अशी ठिकाणे प्रत्यक्ष पाहायची उत्कंठा आम्हाला होती.

या आमच्या टूरमध्ये क्रोएशिया, स्लोव्हेनिया, हंगेरी, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, जर्मनी आणि पोलंड या देशांचा समावेश होता. टूर मुंबईहून सुरू झाली ती पहाटेच्या साडेसहाच्या विमानाने. त्यासाठी रात्री बारा वाजताच विमानतळावर हजर राहावं लागलं. ठरलेल्या जागी हळूहळू सहप्रवासी जमा झाल्याने विमानतळावरच सर्वांच्या ओळखी झाल्या. त्याच कंपनीच्या इतरही काही ठिकाणी जाणार्‍या टूरचे लोकही तेथे होते.

आमच्या टूरमध्ये एकूण चाळीस जण होते. त्यांपैकी बहुतेक आमच्यासारखी सेवानिवृत्त मध्यमवर्गीय जोडपी होती. त्या सगळ्यांची मुले देश-विदेशात नोकरीला होती, त्यामुळे कसलीही जबाबदारी नव्हती. उरलेल्यांत दोघे एकांडे विधुर, दोघी विधवा बहिणी, दोन मैत्रिणी, आई-मुलगी आणि आई, बाप, मुलगी व जावई असे एक मुंबईचे कॅथलिक कुटुंब असे होते.

सगळे सोपस्कार पूर्ण करून विमानात बसेपर्यंत पहाटेचं फटफटू लागलं होतं. झोपेचं खोबरं झालं होतं, पण ते सगळं अनिवार्यच होतं. चाकं पोटात घेऊन विमानाने आकाशात झेप घेतली तेव्हा नुकतंच धुक्याच्या तलम मच्छरदाणीतून एखादी सुंदर युवती आळोखे-पिळोखे देत जागी व्हावी तशी मुंबई जागी होऊ लागली होती. अंधुक दिसणारे दिवे विजून गेले होते. आता सगळीकडे खाली पाणी आणि आजूबाजूच्या ढगांतून वाट काढत जाणारं विमान अशी परिस्थिती असल्याने डोळ्यांत आतापर्यंत साठवून ठेवलेल्या झोपेने ताबा मिळवला. बहुतेकजण झोपेच्या आधीन गेले, पण एअर होस्टेस तत्पर होत्या. त्यांची कामे सुरू झाली. ब्रेकफास्ट, चहा, कॉफी समोर आली. दुबईपर्यंतचा प्रवास पटकन संपल्यासारखा वाटला. मुंबईचा विमानतळ नावीन्यपूर्ण देखणं आहे तर दुबईचा खूपच मोठ्ठा. इथे असलेली गेट खूप दूरवर पसरलेली असल्याने आम्हाला अरायव्हलच्या टर्मिनलपासून पुढच्या विमानाच्या ‘डिपार्चर’च्या टर्मिनलकडे जाताना सात-आठ किलोमीटर विमानतळावरच्या ‘मेट्रो’ने जावे लागले. प्रत्येक ठिकाणी लिफ्टमधून मजले बदलून पुढच्या फ्लाईटच्या गेटकडे धावावे लागले. तिथून पुन्हा बसमध्ये बसून विमानापर्यंत पोचायला दहा ते बारा मिनिटे लागली यावरून तो विमानतळ किती भव्य परिसरात पसरलाय ते कळते.
दुबईहून पुढचा टप्पा होता झाग्रेब. दुबईच्या व आपल्या टायमिंगमध्ये दीड तासाचा फरक, तर झाग्रेबच्या व आपल्या टायमिंगमध्ये साडेतीन तासांचा फरक आहे. त्यामुळे तिथल्या लोकल टायमिंगप्रमाणे अडीच वाजता तेथे पोचलो. सगळ्यांनी आपल्या वेळा बदलून घेतल्या. इथला विमानतळ खूप मोठा नसला तरी स्वच्छ, सुबक, सुंदर होता. आमचा सर्वांचा एक महिन्याचा युरोपचा शेगेंन व्हिसा होता, तो पोलंडच्या कॉन्सुलेटचा होता. आम्ही क्रोयेशियातून प्रवेश करून वार्सामधून परतणार होतो. तिथल्या ‘वेलकम टू क्रोएशिया’च्या बोर्डने स्वागत केलं. क्रोएशियाच्या नावातल्या इंग्रजी ‘ओ’च्या जागी लाल कलरचे हृदय म्हणजे हार्ट शेप काढले होते, जे आम्हाला पुढे ठिकठिकाणी सुवेनिअर्समध्ये दिसले. या विमानतळाचं नाव होतं ‘फ्रॅन्का लुका फ्रान्सोत्द्म्म.’ इमिग्रेशनसाठी वेगवेगळ्या देशांच्या पासपोर्टधारकांसाठी वेगवेगळ्या खिडक्या होत्या. आम्हाला काही वेळ ताटकळावे लागले. कसून विचारपूस केली आणि मगच इमिग्रेशनचा शिक्का मिळाला. कारण आम्ही युरोपमध्ये प्रवेश एका देशातून करत होतो आणि परतीचा प्रवास मात्र दुसर्‍याच देशातून करणार होतो. चिनी लोकांची रांग वेगळी होती, आणि ते भराभर पुढे सरकत होते. बाहेर आमचा ‘कोच’ आणि तिचा ‘कॅप्टन’ पीटर आमची वाट पाहत होता. (युरोप-अमेरिकेत लक्झरी बसला ‘कोच’ म्हणतात आणि तिच्या ड्रायव्हरला ‘कॅप्टन’ म्हणतात. तेथे बस तसेच ड्रायव्हर म्हणून उल्लेख करणे कमीपणाचे मानतात). युरोपच्या या टूरला सगळ्यात जास्त चालावं लागतं याची कल्पना टूर गाईडने आधीच दिलेली होती. प्रत्येक शहरात सिटी टूर म्हणजे ‘शहर दर्शन’ ज्यात पॅलेस व म्युझियम्स पाहणे; असलाच तर टेकडीवरचा कॅसल पाहणे, शहराच्या मध्यभागी असणारा, सभारंभासाठी लोकांनी एकत्र यायचा सिटी स्व्केअर पाहणे असे सर्व पायीच फिरावे लागते. भला मोठा ‘कोच’ कुठे पार्किंग असेल तर तिथेच उभा करावा लागतो.