‘क्रिकेट वर्ल्डकप लीग २’ची घोषणा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल सोमवारी ‘क्रिकेट वर्ल्डकप लीग २’ची घोषणा केली. २०२३च्या विश्‍वचषक स्पर्धेसाठीची ही नवीन चार वर्षे चालणारी पात्रता फेरी असेल. लीग २मध्ये नामिबिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, अमेरिका व संयुक्त अरब अमिराती हे देश एकूण १२६ एकदिवसीय सामने खेळणार आहेत. यात २१ तिरंगी मालिकांचा समावेश करण्यात आला आहे. ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२२ या कालावधीत प्रत्येक संघ ३६ सामने खेळणार आहे. ‘लीग २’मधील पहिली स्पर्धा स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी व ओमान यांच्यात स्कॉटलंडमधील मेनोफिल्ड पार्क येथे १४ ते २१ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. यात प्रत्येक संघ चार सामने खेळेल. प्रत्येक विजयासाठी २ गुण दिले जाणार आहेत.

२१ तिरंगी मालिकांनंतर पहिल्या तीन स्थानावर राहणारे संघ आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप क्वॉलिफायर २०२२ साठी पात्र ठरतील. तर तळाला राहणारे चार संघ क्वॉलिफायर प्ले ऑफ २०२२ मध्ये खेळतील. विश्‍वचषकासाठीची रॅपेशाज फेरी म्हणून याकडे पाहण्यात येत असून या स्पर्धेत चॅलेंज लीग ‘ए’ व ‘बी’चा विजेता संघदेखील असेल. चॅलेंज लीगमध्ये वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये २१व्या ते ३२व्या स्थानावर असलेले संघ खेळणार आहेत. प्ले ऑफमधील दोन संघ क्वॉलिफायर २०२२ साठी पात्र ठरून २०२३ विश्‍वचषकात स्थान मिळविण्याची आशा कायम राखतील.

क्रिकेट वर्ल्डकप लीग २ घोषित झालेले वेळापत्रक ः १४ ते २१ ऑगस्ट ः स्कॉटलंड, ओमान, पापुआ न्यू गिनी, मेनोफिल्ड पार्क, स्कॉटलंड, ७ ते १४ सप्टेंबर ः अमेरिका, पापुआ न्यू गिनी व नामिबिया, चर्च सेंट पार्क, अमेरिका, ८ ते १५ डिसेंबर ः संयक्क्त अरब अमिराती, स्कॉटलंड व अमेरिका, शारजा व दुबई, ६ ते १३ जानेवारी २०२० ः ओमान, नामिबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान क्रिकेट अकादमी, ओमान, ५ ते १२ फेब्रुवारी ः नेपाळ, अमेरिका, ओमान, त्रिभुवन विद्यापीठ, नेपाळ.