क्रांतिदिनाचे संस्मरण

– अनिल पै

डॉ. लोहियांनी भाषणाला सुरुवात केली. कॅप्टन मिरांदानी पिस्तुल रोखले व भाषण बंद करण्याचा हुकूम दिला. लोकांना वाटले आता पिस्तुलातून गोळी सुटेल. डॉ. महाशय हा प्रसंग कसा निभावून नेणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले. डॉ. लोहियांनी असे अनेक प्रसंग पाहिले होते. भीती हा शब्द त्यांच्या कोशात नव्हता. माशी उडवावी त्या सहजतेने आपले भाषण चालू असताना कॅप्टन मिरांदाचा उगारलेला पिस्तुलचा हात डाव्या हाताने त्यांनी बाजूला सारला. हे पाहून लोकांचे नैतिक बळ उंचावले.

‘‘गोमंतकीयांनो, तुमच्या मुक्तीसाठी दिल्लीची वा युनोची वाट पाहू नका. तुमची मुक्ती तुमच्या हातात आहे. पाच लाख गोमंतकीय पोर्तुगिजांना पराभूत करू शकतात. अटक करून घ्या, मारपीट सहन करा, गोळ्या अंगावर झेला, तरीही मोर्चा-मिरवणुका काढत निदर्शने करा. कर भरू नका. युरोपियनांना आशियात पाऊल ठेवण्यासाठी गोवा हे पहिले प्रवेशद्वार झाले होते. युरोपियनांचे आशियातील वर्चस्व आम्ही गोव्यात नष्ट करून टाकूया.’’
हे ऐतिहासिक भाषण होते थोर स्वातंत्र्यवीर डॉ. राम मनोहर लोहिया यांचे. दि. १८ जून १९४६ रोजी डॉ. लोहिया यांनी मडगाव येथे आताच्या लोहिया मैदानावर पोर्तुगिजांच्या पाशवी कायद्याविरोधात स्फूर्तिदायक भाषण करून गोमंतकीय जनतेच्या मनात स्वातंत्र्याबद्दलची ज्योत प्रज्वलित केली. पोर्तुगिजांनी व्यापारधंद्यानिमित्त १५१० मध्ये गोव्यात पाऊल ठेवले व पाशवी अत्याचार सुरू केले. गोव्यातील हिंदू मंदिराची, मालाची मोडतोड केली. हिंदूंना बाटवून ख्रिश्‍चन करण्याचे सत्र सुरू केले व स्वातंत्र्याचे हक्क हिरावून घेतले. पोर्तुगिजांनी नागरी स्वातंत्र्याचे हक्क रद्द करून येथील लोकांना गुलाम बनविले. भाषण-लेखनाचे स्वातंत्र्य गोमंतकीयांना नव्हते. ज्यावेळी लोहियांना हे समजले तेव्हा ते संतापले व त्याविरुद्ध आवाज उठविण्यास सज्ज झाले.
दि. १८ जूनचा दिवस मंगळवार होता. पाऊस जोरात पडत होता. अशा भर पावसात मडगाव पोलीस चौकीपासून नगरपालिकेपर्यंत सर्व मैदान व आजूबाजूचा परिसर हजारो माणसांनी भरून गेला होता. डॉ. लोहिया नागरी स्वातंत्र्यासाठी पोर्तुगिजांच्या विरोधात भाषण देणार असल्याने पुुरुष, महिला, विद्यार्थी उत्सुकतेने उपस्थित राहिले होते.
१० जूनला डॉ. लोहिया गोव्यात विश्रांतीसाठी आले होते. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्याचे ते एक सेनापती होते. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसहित हजारो लोकांना अटक करून तुरुंगात डांबले होते. त्यानंतर कॉंग्रेस समाजवादी पक्षाच्या पुढार्‍यांनी ही स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेण्याचे ठरविले. महात्मा गांधी चळवळीचे प्रणेते होते. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, अरुणा असफअली व अच्युतराव पटवर्धन यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी जंगजंग पछाडले. शेवटी १९ मे १९४४ मध्ये मुंबई येथे लोहियांना पकडण्यात आले. हातांत बेड्या ठोकून त्यांना तुरुंगात नेण्यात आले. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. चळवळीची गुप्त माहिती मिळविण्यासाठी त्यांचा अनन्वित छळ केला गेला. शेवटी ११ एप्रिल १९४६ ला त्यांना सोडण्यात आले.
गोमंतकातील असोळणे येथील डॉ. ज्युलियांव मिनेझिस हे डॉ. लोहियांचे जवळचे मित्र. दोघेही जर्मनीतील बर्लिन विश्‍वविद्यालयाचे विद्यार्थी होते. मिनेझिस वैद्यकशास्त्राचे तर लोहिया अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. पण दोघे जानी दोस्त. गोव्यासहित भारत गुलामगिरीत आहे या अपमानाची टोचणी दोघांनाही होती. तुरुंगातून सुटल्यानंतर १० जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया विश्रांतीसाठी असोळणे येथे मिनेझिस यांच्या घरी आले होते व १९ तारखेला परत जाण्याचा त्यांचा बेत होता. ते गोव्यात आल्याचे समजताच गोव्यातील राजकीय कार्यकर्ते असोळण्याला जाऊन त्यांना भेटू लागले व येथील स्थिती कथन करू लागले. राजवटीची गोवा ही शेवटची वसाहत होती. येथे गोमंतकीयांना मुद्रण-स्वातंत्र्य नव्हते. लोकांच्या हृदयात देशभक्ती होती. त्याग करण्याची जिद्द होती. वातावरण तापले होते, पण योग्य नेत्याअभावी जनतेची शक्ती कार्यरत होत नव्हती.
ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक वै. वसंत वैकुंठ कारे यांना लोहिया आल्याचे समजले. गोमंतक तरुण संघाचे ते उत्साही कार्यकर्ते होते. १९२५ साली पुरुषोत्तम काकोडकरांनी गोवा सेवा संघ स्थापन केला होता. या संघाचेही वसंत कारे चिटणीस होते. लोहियांना त्यांनी गोव्याची स्थिती सांगितली. ते ऐकून लोहिया त्यांना म्हणाले, ‘‘विश्रांती घेण्यासाठी मी येथे आलो, पण परकी लोक आमच्यावर राज्य करीत असताना मी विश्रांती कशी घेऊ? पोर्तुगिजांनी बंदिस्त केलेल्या नागरी हक्कांना मुक्त करून गोव्याची सुटका केली पाहिजे. जाहीर भाषणाला बंदी घालणारा पोर्तुगीज सरकारचा हुकूम मी मोडेन, मी भाषण करीन.’’
त्यानंतर त्यांनी पुरुषोत्तम काकोडकरांना बोलावणे पाठवले. काकोडकरांनी दुसर्‍या दिवशी त्यांची भेट घेतली. त्यावेळी दीर्घचर्चेअंती १८ जून रोजी सत्याग्रह करून भाषणबंदीचा, कायदेभंग करण्याचा त्यांनी ऐतिहासिक निर्धार केला. पुरुषोत्तम काकोडकर व वसंत कारे यांनीही लोहियांबरोबर अटक करून घेण्याचे अभिवचन दिले. ते दोघे असोळणा येथून परतले व गोव्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन दि. १८ जूनला उपस्थित राहण्याविषयी गुप्त चर्चा करू लागले. या बैठकांना पुरुष, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत.
दि. १८ जून रोजी सभाबंदी हुकूम मोडण्याच्या डॉ. लोहियांच्या निर्धाराने लोकांत स्फूर्ती निर्माण झाली. पोर्तुगिजांना हे वृत्त समजताच त्यांनी सर्वत्र पोलीस गस्ती सुरू केल्या. शेवटी तो दिवस उजाडला. यात भाग घेतलेल्या काही हयात स्वातंत्र्यसैनिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सकाळपासून वातावरणात बेहोशी संचारली होती. गोव्याच्या विविध भागांतून मडगावला लोक जमा होत होते. डॉ. राम मनोहर लोहिया हा लोहपुरुष आज संध्याकाळी ४.३० वाजता मडगाव शहराच्या मध्यभागी चर्चजवळच्या पटांगणात सालाझारच्या फॅसिस्ट राजवटीचे सभाबंदी, भाषणबंदीचे निर्बंध मोडणार ही माहिती मिळाली होती. डॉ. लोहियांना अटकाव करण्यासाठी कडेकोट तयारी पोलिसांनी केली होती. सर्व रस्त्यांच्या नाक्यांवर सशस्त्र पोलीस खडे होते. बंदूकधारी पोलीस शहरात फिरत होते. शहराच्या मध्यभागी जेथे नगरपालिकेची कचेरी आहे, न्यायालय आहे, तेथे लोहियांना येऊ द्यायचे नाही असा त्यांनी विडा उचलला होता. टॅक्सी गाड्यांची तपासणी सुरू केली होती. याआधीच अटक करून सालाझारशाहीला लावलेला सुरुंग स्फोट होण्यापूर्वीच निकामी होऊ नये म्हणून डॉ. जुलियांव मिनेझिस डॉ. लोहियांसह सभेच्या नियोजित वेळेपूर्वी बराच वेळ आधी स्टेशनरोडवरील रिपब्लिक हॉटेलमध्ये उतरले होते. त्यांना तेथे कोणी ओळखणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. ऍड. जुझे इनासियू दे लॉयेला यांनी त्यांची भेट घेऊन सविनय कायदेभंग करण्याचा बेत सहा महिने पुढे ढकलावा अशी सूचना त्यांना केली, पण त्या दिवशी जो कार्यक्रम आखला आहे तो एका मिनिटानेही पुढे ढकलण्यात येणार नाही असे डॉ. लोहियांनी त्यांना सांगितले.
त्या दिवशी दुपारी पोलिसांना न जुमानता सर्व बाजूंनी हजारोंच्या संख्येने लोक सभास्थानी जमा होत होते. भर दुपारी जोरात पाऊस पडत होता. रिपब्लिक हॉटेलमधून लोहियांना सभास्थानी आणण्याचे काम श्री. लक्ष्मीदास बोरकर या तरुणाकडे सोपवले होते. गोवा मुक्त झाल्यावर दैनिक ‘नवप्रभा’चे ते संपादक होते. बोरकरांनी एक टॅक्सी थांबवली. पण टॅक्सी चालकाने माहिती दिली की, शहरात फिरणार्‍या प्रत्येक टॅक्सीने प्रवाशाला इच्छित स्थळी नेण्यापूर्वी पोलीस चौकीवर प्रथम नेले पाहिजे असे सरकारी फर्मान सर्व टॅक्सीवाल्यांना काढण्यात आले आहे. डॉ. लोहिया टॅक्सीतून येतील आणि त्यांना पोलीस चौकीवर हजर करण्यात येईल असा पोलिसी कावा होता. या काव्याची माहिती बोरकरांना मिळाली. बोरकरांनी एक घोड्याची गाडी मिळविली. त्यात डॉ. लोहिया, डॉ. मिनेझिस व बोरकर बसले. पाऊस पडत असल्याने गाडी बंद करून घेतली. गाडी मैदानाच्या दिशेने निघाली. चर्चाचा आवार व पेट्रोल पंप यांच्या मध्ये गाडी उभी केली. आता तेथे पेट्रोल पंप नसून त्या मैदानाजवळ कोमुनिदादीची भली मोठी इमारत उभी आहे. गाडीतून उतरण्यावेळी ठीक साडेचार वाजले होते. तिघेही जण खाली उतरले. काही पावले चालत गेल्यावर जनसमुदायाकडून ‘डॉ. राम मनोहर लोहिया की जय’, ‘महात्मा गांधी की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. शांत लोकसागरात विद्युल्लतेच्या गतीने चैतन्य संचारले. कॅप्टन मिरांद पोर्तुगीज भाषेतून विचारीत होते. श्री. लक्ष्मीदास बोरकरांनी दुभाष्याचे काम केले. डॉ. लोहिया म्हणाले, ‘‘आपण भाषण द्यायला आलो आहे.’’ त्यावर कॅप्टन मिरांद म्हणाले, ‘‘गोव्यात असे भाषण करता येत नाही. पूर्वपरवानगी घ्यावी लागते.’’ त्यावर तात्काळ लोहिया म्हणाले, ‘‘हा फॅसिस्ट कायदाच आज मोडायचा आहे म्हणून भाषण करणार आहे.’’
असे सांगून डॉ. लोहियांनी भाषणाला सुरुवात केली. कॅप्टन मिरांदानी पिस्तुल रोखले व भाषण बंद करण्याचा हुकूम दिला. लोकांना वाटले आता पिस्तुलातून गोळी सुटेल. डॉ. महाशय हा प्रसंग कसा निभावून नेणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले. सर्वांना चिंता वाटली. डॉ. लोहियांनी असे अनेक प्रसंग पाहिले होते. भीती हा शब्द त्यांच्या कोशात नव्हता. एका हाताने माशी उडवावी त्या सहजतेने आपले भाषण चालू असताना कॅप्टन मिरांदाचा उगारलेला पिस्तुलचा हात डाव्या हाताने त्यांनी बाजूला सारला. डॉक्टरांचा निर्भयपणा आणि बेडर कृती अधिक प्रभावी होती. ते पाहून लोकांचे नैतिक बळ उंचावले. त्यानंतर लोहियांना अटक झाली. डॉ. मिनेझिस यांनाही पकडण्यात आले. त्यांना जीपमधून पोलीस स्टेशनवर नेण्यात आले. जाताना त्यांनी भाषणाचे हस्तलिखित स्वातंत्र्यसैनिक विश्‍वनाथ लवंदे यांच्या हाती दिले व वाचण्यास सांगितले. त्यांना नेल्यानंतर विश्‍वनाथ लवंदे यांनी वाचण्यास सुरुवात केली. थोड्या वेळात कॅप्टन मिरांद व पोलीस अधिकार्‍यांनी धावत येऊन त्यांच्या हातातील पेपर हिसकावून घेतला व त्यांना अटक करून मारीत-पिटीत पोलीस व्हॅनमधून पोलीस स्टेशनवर नेले. लोकांच्या जनसमुदायाने घोषणा देत पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. त्याअगोदर कित्येकांनी तेथे भाषण करून सभा चालू ठेवली. लक्ष्मीदास बोरकर, डॉ. विनायक मयेकर, व्यंकटेश वेरेकर, त्रिविक्रम वि. वैद्य, निळकंठ कारापूरकर, वत्सला कीर्तनी, इव्हाग्रियू जॉर्ज यांनाही पकडण्यात आले. सुमारे दीडशे जणांना अटक झाली.
मडगावचा बाजार त्वरित बंद झाला. त्या दिवशी महिलांनी धैर्य दाखवले. साठ महिलांचा मोर्चा पोलीस स्टेशनवर गेला व ‘वत्सला कीर्तनींना सोडा नाहीतर आम्हालाही पकडा’ असा त्यांनी हट्ट धरला. स्टेशनबाहेर जमाव वाढू लागला. क्षणार्धात सुमारे तीन हजार लोक जमले. पोलिसांनी वत्सला कीर्तनी यांना सोडून दिले. तरीही जमाव हटेना हे पाहून पोलीस घाबरले. पोलीस अधिकार्‍यांनी डॉ. लोहियांना विनंती केली की जनसमुदायास शांत करावे. लोक पोलीस स्टेशनवर हल्ला करतील अशी भीती त्या अधिकार्‍यांना वाटत होती. डॉ. लोहियांनी प्रथम हिंदी व नंतर इंग्रजीतून लोकांना शांतपणे घरी जाण्यास सांगितले. डॉ. लोहिया व डॉ. मिनेझिस यांना दुसर्‍या दिवशी मुक्त केले.
त्यानंतर गोवा स्वातंत्र्यलढा १९ डिसेंबर १९६१ पर्यंत चालूच राहिला. दि. १९ जून रोजी गोव्यात सभा-मिरवणुका निघाल्या, विद्यार्थ्यांनी प्रभातफेर्‍या काढल्या, सायकलफेर्‍या काढल्या. सरकारच्या निषेधार्थ मडगाव, पणजी, म्हापसा, डिचोली, मुरगाव, फोंडा, कुडचडे येथे हरताळ फासला. मोर्चे-मिरवणुका निघाल्या. सभा-कार्यक्रम सुरू झाले व लढा तीव्र बनला. पणजी येथे प्रचंड मोर्चा काढण्यात आला.
गोवा मुक्तीच्या अंतिम पर्वाची सुरुवात डॉ. लोहियांनी केली व तो लढा निरंतर गोवा मुक्तीपर्यंत चालू राहिला. डॉ. लोहियांनी गोमंतकीय जनतेच्या हृदयातील स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली. या लढ्यात विद्यार्थी, महिला, साहित्यिकांनी भाग घेतला. या दिवशी नवी क्रांती सुरू झाली म्हणून १८ जून हा दिवस क्रांतिदिन म्हणून साजरा केला जातो. गोव्याच्या मुक्तिदिनाइतकेच या दिवसाला महत्त्व आहे.
डॉ. लोहियांनी भाषणात म्हटले होते, ‘‘एका परकी सत्तेची सत्ता व आमिष यांच्या जोरावर आत्मशून्य संस्कृती तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आणि मी ऐकले होते तुम्हाला नागरी स्वातंत्र्य वंचित करण्यात आले. परंतु कोणत्या तर्‍हेच्या राजवटीत तुम्ही जगत आहात हे जेव्हा मी प्रत्यक्ष पाहिले तेव्हा मला अमाप आश्‍चर्य वाटले. खेड्यात क्रीडा, अभ्यास किंवा खेड्याची उन्नती यासाठी संघटना उभारण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. राजकीय सोडाच, सामाजिक, सांस्कृतिक संमेलने भरविण्यास पूर्वपरवानगी घ्यावी लागते. एकदा ब्रिटिशांची सत्ता भारतातून उखडली गेली की पोर्तुगीज सत्ता एक दिवसही टिकणार नाही. गोमंतक हा हिंदुस्थानचा भाग आहे. हिंदुस्थानचे संघराज्य स्थापन होईल. आमचे लोक त्याची निर्मिती करतील. गोमंतकीय जनतेने मुक्त विचार, मुक्त चर्चा, मुक्त लिखाण करून संघटित सामर्थ्य वाढविण्यासाठी कार्यरत व्हावे. जयहिंद!’’
डॉ. लोहियांनी गोव्यात जनजागृती केली. त्यातून स्वातंत्र्य लवकर मिळाले. या मुक्तिलढ्यात हजारो माताभगिनी आणि पुरुषांनी घरादाराचा त्याग केला. कित्येकजण हुतात्मे झाले. या स्वातंत्र्यलढ्यात सर्व भारतातून देशभक्त सामील झाले होते, याची जाणीव आजच्या पिढीला होणे महत्त्वाचे आहे. गोवा मुक्तीनंतर १८ जून हा दिवस ‘क्रांतिदिन’ म्हणून साजरा केला जातो. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा अध्याय आहे.
गोवा मुक्तीनंतर स्वातंत्र्यसेनानी हा दिवस ‘१८ जून क्रांतिदिन समिती’तर्फे लोहिया मैदानावर साजरा करीत आले आहेत. १९९० च्या दरम्यान गोव्यात पीडीएफचे सरकार आले व त्या सरकारने सरकारी पातळीवर ‘क्रांतिदिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. या लोहिया मैदानावर हुतात्मा स्मारक असून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या काळात डॉ. लोहियांचा पुतळा उभारण्यात आला व मैदानाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. ‘लोहिया मैदान’ ही गोव्यातील ऐतिहासिक जागा आहे.

सालाझारला उद्देशून केलेली त्यावेळची कविता
दोतोर बॉस, दोतोर बॉस
समजिकायेन वाग
तकली तुका नाजाल्यार
उठून चलूंक लाग
– बा. भ. बोरकर