कोहलीच योग्य कर्णधार ः मांजरेकर

 

भारतीय क्रिकेट संघाला वेगवेगळ्या प्रकारांसाठी वेगळ्या कर्णधारांची आवश्यकता नसल्याचे भारताचा माजी खेळाडू व समालोचक संजय मांजरेकर याने काल शुक्रवारी ‘आस्क संजय’ या आपल्या यूट्यूबवरील कार्यक्रमात सांगितले. जगातील आघाडीच्या क्रिकेट संघांचा विचार केल्यास वेगळ्या प्रकारासाठी वेगळा कर्णधार असा ट्रेंड दिसून येतो. परंतु, भारतीय संघाचे तिन्ही प्रकारात कोहलीच नेतृत्व करत आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे कसोटीत टिम पेन तर वनडे व टी-ट्वेंटीत ऍरोन फिंच नेतृत्व करतो तर इंग्लंडचा संघ कसोटीत ज्यो रुट तर वनडे व टी-ट्वेंटीमध्ये ऑईन मॉर्गन याच्या नेतृत्वाखाली खेळतो.

टीम इंडियाच्या वनडे व टी-ट्वेंटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई शानदार कामगिरी करत असल्यामुळे सातत्याने टी-ट्वेंटी प्रकारात रोहितकडे कर्णधारपद देण्याची मागणी जोर धरत असते. पण, हा बदल सध्यातरी आवश्यक नाही, असे मांजरेकर यांना वाटते. विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याच तोडीचा खेळ करतो आहे. दोन कर्णधार असलेल्या देशांचे तसे नाही. पेन वनडे व टी-ट्वेंटी तर रुट टी-ट्वेंटीमध्ये प्रभाव पाडू शकलेला नाही, असे मांजरेकर यांना वाटते. भविष्यात दोन कर्णधारांची संकल्पना मूर्त स्वरूप घेऊ शकते, परंतु, सध्या तरी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराट कोहलीच संघाचे नेतृत्व कुशलपणे करू शकतो, असे मांजेरकर म्हणाले.