कोविड-१९ उपचारांसंदर्भातील असमर्थनीय दाव्यांबाबत आयुष मंत्रालयाची पावले

पंतप्रधानानी केलेल्या आवाहनाचा पाठपुरावा करीत, कोविड-१९ च्या उपचारांबद्दल ठोस पुरावे न देता केले जाणारे असमर्थनीय दावे रोखण्यासाठी आयुष मंत्रालयाने पावले उचलली असून मंत्रालयाद्वारे पंतप्रधानांच्या सूचनेनुसार आयुष प्रणालीमार्फत साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आयुष सेवक आणि आयुष संस्थांकडून वैज्ञानिक आणि पुरावा आधारित उपायांची नोंद घेतली जात असून त्यासाठीचे प्रस्ताव मागितले आहेत. याद्वारे आलेल्या प्रस्तावांची व्यवहार्यता वैज्ञानिकांच्या समुहाद्वारे शहानिशा करून घेतली जाणार आहे.

आयुषच्या सेवकांपर्यंत पोचण्यासाठी मंत्रालय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि समाज माध्यमांसारख्या व्यासपीठांचा वापर करीत आहेत. खोट्या आणि असमर्थनीय गोष्टी रोखण्यासाठी तसेच प्रोत्साहन न देण्यासाठी आयुष सेवकांना सोबत घेतले जात आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आयुषच्या विविध शाखांच्या जवळपास शंभरहून अधिक नेत्यांनी भाग घेतला. रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ३० रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आयुष उद्योगाच्या नेत्यांना मार्गदर्शन केले.

आयुष मंत्रालयामार्फत वैज्ञानिक आणि पुराव्यांवर आधारित उपायांसाठी त्यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन चॅनेल स्थापित करण्यात येणार आहे. ज्याद्वारे वैज्ञानिक स्पष्टीकरण आणि उपचार पद्धतीवरील प्रस्तावांवर आधारित सूचना प्राप्त केल्या जाऊ शकतील. त्याद्वारे कोविड-१९ साथीच्या रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. मंत्रालयाने त्यानुसार आयुष सेवक आणि आयुष संस्थांकडून संबंधित माहिती पुरविण्याचे आवाहन केले आहे.सदर माहिती मंत्रालयाच्या संकेत स्थळावर पुढील लिंकवर सादर करता येईल – http://ayusg.gov.in/covid-19.