कोविड नियमांची राज्यात पायमल्ली

>> सामाजिक अंतराचे बाजार, बसमध्ये तीनतेरा

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना सामाजिक अंतर, मास्क या सारख्या कोविड नियमांची पायमल्ली वाढत चालली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तथापि, रविवारी म्हापसा येथे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात कोविड नियमावलीच्या सामाजिक अंतर या नियमाची पायमल्ली झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला आहे. मुरगाव तालुक्यातील मांगूर हिल भागातून कोरोनाचे रूग्ण दुसर्‍या टप्प्यात आढळून येण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर कोरोनाचे रूग्ण सर्वच तालुक्यांत आढळ लागले आहेत. मुरगावनंतर सत्तरी, बार्देश, तिसवाडी, डिचोली, पेडणे, सांगे, केपे, धारबांदोडा, काणकोण, सासष्टी, फोंडा या तालुक्यात आढळून येत आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या हजारावर गेली आहे. मागील १२ दिवसातं ५३६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल. राज्यात कोविड नियमावलीचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मार्केट, बसगाड्या व इतर ठिकाणी नियमावलीचे पालन होत नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कोविड नियमावलीचे कडक पालन करण्याची सूचना पोलिसांना केली आहे. परंतु, अद्यापपर्यंत मार्केट, बसगाड्यातून नियमावलीचे उल्लंघन सुरूच आहे. पणजी मार्केटमध्ये काही दिवस मार्केटमध्ये खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. आता, थर्मल गनद्वारे तपासणी केली जात नाही. सामाजिक अंतराचेही पालन होत नाही. प्रवासी बसगाड्यांत दोन प्रवाशांमध्ये कोणतेही अंतर राखले जात नाही.
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सरकारी पातळीवरील जलद हालचाली दिसून येत नाही. एखाद्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य खात्याचे पथक त्या ठिकाणी जाऊऩ संपर्कात आलेल्या नागरिकांच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणी करते. स्थानिक नागरिकांक़डून लॉकडाऊन करण्याची मागणी केली जाते. कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने स्थानिक पंचायती, ग्रामस्थ बंदची घोषणा करतात. सरकारपातळीवरून सर्व ठिकाणी अधिकृत लॉकडाऊन केले जात नाही.

दरम्यान, मुरगाव तालुक्यातील झुवारीनगर येथील झोपडपट्टीमध्ये २४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पिलार येथे आयसोलेटेड १ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आलेला आहे.