कोळसा हाताळणी बंद खोलीत करण्याचा प्रस्ताव ः पंचायतमंत्री

मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीमुळे वास्को शहर व आसपासच्या गावात होत असलेल्या कोळसा प्रदूषणाची आम्हांलाही चिंता आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ही कोळसा हाताळणी मुरगाव बंदरात एका घुमटीवजा बंद खोलीत करणे शक्य असून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येणार असल्याचे पंचायतमंत्री व दाबोळी मतदारसंघाचे आमदार मॉविन गुदिन्हो यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

काल मुरगावचे माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये फेरप्रवेश केला. त्यावेळी पत्रकारांनी कोळसा प्रदूषणासंबंधी गुदिन्हो यांना प्रश्‍न केला असता त्यांनी वरील स्पष्टीकरण केले. मुरगाव बंदरावरून होणारा व्यापार बंद करता येणार नाही. तसे करायचे झाल्यास हे बंदरच बंद करावे लागले असे सांगून तेथे होणार्‍या कोळसा हाताळणीमुळे जर वायू प्रदूषण होत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यात येईल. मुरगाव बंदरात घुमटीवजा बंद खोलीत कोळसा हाताळणी करण्याबाबत विचार चालू आहे. तसे केले की कोळशामुळे होणारे वायू प्रदूषण होणार नसल्याचा दावा गुदिन्हो यांनी केला.

सासष्टीतील ख्रिस्ती बांधवांचा
मोदींना पाठिंबा : मुख्यमंत्री
विकासाच्या मुद्यावरून गोव्यातील अल्पसंख्याक व खास करून सासष्टी तालुक्यातील ख्रिस्ती बांधव हे यावेळी मोदी यांच्यासाठी मते देतील, असा विश्‍वास काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. मुरगाव तालुक्यातील शेखर खडपकर यांना काल भाजप मुख्यालयात भाजपमध्ये फेरप्रवेश दिल्यानंतर सावंत पत्रकारांशी बोलत होते. केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर देशात जो विकास झालेला आहे तो सर्वांनी पाहिलेला आहे. त्यामुळे गोव्यातील ख्रिस्ती बांधवही भाजपला मते देतील, असे सावंत यावेळी म्हणाले.