कोरोना व्हायरस आला अन्…..

सावित्री घाडी
(शिक्षिका-जी.एस.आमोणकर वि.मं. म्हापसा)
या काळात आपण आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देत आहोत त्यामुळे आरोग्याचा दर्जा सुधारत आहे. सर्व प्रकारच्या व्यसनांवर मर्यादा आली आहे, त्यामुळे त्यातून उद्भवणारे आजार कमी झाले आहेत. सार्‍या मानवजातीवर या काळात योग्य निर्बंध आले आहेत. त्यामुळे मानवी जीवन संतुलित झाले आहे. 
‘‘कोरोना व्हायरस आला अन्
मानवजातीला शिकविला धडा ’’
जगात सर्वत्र कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवलेला आहे. कोरोनाच्या महामारीने जगाला नमवलं. अक्षरशः सर्वांना घरात कोंडून घ्यायला भाग पाडलं. आपल्या भारतीय जीवनपद्धतीविषयी सर्वांना पुन्हा एकदा नव्याने विचार करायला लावलं. भारतीय संस्कृती किती गौरवशाली आहे याचा प्रत्यय आताच्या या जीवनपद्धतीत अनुभवायला येतो.
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं. त्यावेळी निसर्गात कमालीचं शांत, शुद्ध, मोकळं वातावरण निर्माण झालं. कारण रस्त्यावरून वाहनांची ये-जा कमी झाली. त्यामुळे ध्वनीप्रदूषण, वायुप्रदूषण कमी झालं. दिवसागणिक कितीतरी अपघात व्हायचे. ते अपघातांचे प्रमाण थांबले. वाहनांचा कानठळ्या बसणारा आवाज एकदम गप्पगार झाला. त्यामुळे कमालीचे शांत वातावरण पाहावयास मिळाले. रस्त्यावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसेनाशा झाल्या. साहजिकच या मोकळ्या रस्त्यावरून गुरेढोरे फिरताना दिसताहेत. नवीन मांडवी पुलावरून (अटल सेतू) आपण गाड्याच जाताना पाहिल्या पण या लॉकडाऊनच्या काळात त्या पुलावरून गुरेढोरे जात होती. कदाचित त्या पुलावरून चालण्याचा आनंद जणु त्या प्राण्यांनाही घ्यायचा होता की काय? आजुबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. वन्यप्राणी जंगलात निवांत फिरू लागले. कारण आता त्यांना माणसांची भीती नव्हती.
पुलावरून आपण जेव्हा जायचो तेव्हा आपल्याला नदीतील, समुद्रातील पाणी गढूळ, अशुद्ध दिसायचे. पण या काळात समुद्र, नदी-नाले, कालवे यांतील पाणी शुद्ध पाहायला मिळाले. कारण कारखान्यातील, शहरातील सांडपाणी समुद्र-नद्यांमध्ये सोडले जायचे. हॉटेल्स बंद असल्यामुळे साहजिकच अशा दूषित गोष्टी पाण्यात सोडल्या गेल्या नाहीत. त्यामुळे नद्यांची पात्रे शुद्ध, स्वच्छ स्वरूपात पाहायला मिळत आहेत. वाहत्या पाण्यात लोक देवाला अर्पण केलेली फुले सोडायचे. गुरेढोरे धुवायचे, वाहने धुवायचे, काही लोक कचरा टाकायचे. पण या लॉकडाऊनमुळे नदी-नाल्यांना जणु मोकळा श्‍वास घ्यायला मिळाला आहे.
लोक प्रत्येक गोष्टीसाठी प्लास्टिकचा वापर अति प्रमाणात करायचे. फुले विकत घेताना प्लास्टिक पिशव्या, फळे- भाज्या विकत घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. मग या पिशव्या इतरत्र टाकून दिल्या जातात. प्लास्टिक कचर्‍याचे वैशिष्ट्य असे की तो सामान्यतः चिरंजीव असतो. प्लॅस्टिक पिशवी हलकी असल्याने ती वार्‍याबरोबर इतरत्र भरकटत राहते. पण या लॉकडाऊनच्या काळात लोक घरातच राहिले. साहजिकच गोळा झालेला कचरा हा कचरा गोळा करणार्‍यांकडे देण्यात येऊ लागला. त्यामुळे प्लास्टिक कचर्‍याचे प्रदूषण कमी झाले.
लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा बंद. त्यामुळे फास्ट फूड, चमचमीत मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, रस्त्यावरील खाणे, हॉटेलमध्ये लोक जे गर्दी करायचे, छोट्या छोट्या टपरीवर चहा-नाश्ता खायचे आता बंद झाले. घरचे आरोग्यदायी खाणे आपल्याला आजारापासून दूर ठेवत आहे. आता घरातच राहून घरच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागलेत. त्यामुळे तेलकट पदार्थ खाऊन, उघड्यावरचे पदार्थ खाऊन तब्येतीवर परिणाम व्हायचा ते आता कुठेतरी थांबले. कारण घरचे खाणे हे बिनासोड्याशिवाय अगदी ताजे, रुचकर, गरमागरम असते. साहजिकच बाहेरचा अनाठायी खर्च वाचला. तब्येतही ठणठणीत राहिली. सगळे जेवायला एकत्र बसू लागले. घरातील स्वच्छता अधिकच जाणवू लागली. साहजिकच गप्पागोष्टी, एकत्र खेळ खेळणे, एकत्र बसून टीव्ही बघणे या सर्व गोष्टी होऊ लागल्या. एकात्मता ही लॉकडाऊनमुळे दिसून आली. साहजिकच स्वयंपाक बनवताना जेवणाची नासाडी होणार नाही ना, याकडे लक्ष केंद्रीत झाले. काटकसरीने सर्व गोष्टी हाताळण्यास सुरुवात झाली. आईवडील कामावर जात असल्याने मुलांबरोबर त्यांचा संवाद होत नसे. पण आता आईवडिल-मुले यांच्या संवादातून एकमेकांना वेळ द्यायला मिळाला.
कोरोना व्हायरस लोकांना हेच सांगायला आला की निसर्गापुढे मानवाचे शहाणपण काही चालत नाही. निसर्गापुढे माणूस हतबल आहे. तसेच कोरोना महामारीमध्ये गरीब-श्रीमंत हा भेद राहिला नाही. कारण इथे पैसा महत्त्वाचा नाही तर माणुसकी महत्त्वाची आहे. जात- पात- वर्ण यांना न जुमानता सर्वजण एकत्र आले. सर्वजण फोनवरून एकमेकांची विचारपूस करू लागले.
तसेच या कोरोना व्हायरसमुळे लोकांना स्वच्छतेची शिकवण मिळाली. बहुतेकजण बाहेरून आल्यावर हातपाय न धूता थेट स्वयंपाकघरापर्यंत पोचत असत. पण आता सगळ्यांना बाहेरून आल्यानंतर हात-पाय धुण्याची सवय लागली. गावात अजूनही पद्धत आहे की बाहेरून आलेल्या पाहुण्यांना हात-पाय धुवायला पाणी दिले जाते. कारण बाहेरच्या किटाणूचा संसर्ग टाळण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. साहजिकच आपण या कोरोना व्हायरसमुळे वारंवार हातपाय स्वच्छ धुवू लागलो.
घरात उद, कापूर जाळणे, धूप फिरवणे हे सकाळ-संध्याकाळ नित्य नेमाने होऊ लागले. यामुळे वातावरण प्रसन्न तर राहतेच, शिवाय किटाणूंचा शिरकाव होत नाही.
याचबरोबर सध्या या कोरोना व्हायरसमुळे आपण स्वतःकडे जास्त लक्ष देत आहोत. आपण पुरेशी विश्रांती घेत आहोत. पुरेशी झोप घेत आहोत. प्रत्येकाने किमान सात तास झोप घेणे आवश्यक असते. आपण मित्रमैत्रिणी, नातेवाईकांशी फोनने संवाद साधतो आहोत. या संवादामुळे तणावाची पातळी आपोआप कमी झाली आहे.
या काळात आपण आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देत आहोत त्यामुळे आरोग्याचा दर्जा सुधारत आहे. सर्व प्रकारच्या व्यसनांवर मर्यादा आली आहे, त्यामुळे त्यातून उद्भवणारे आजार कमी झाले आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये दिसणारे रुग्ण आता कुठे दिसतच नाहीत. सार्‍या मानवजातीवर या काळात योग्य निर्बंध आले आहेत. त्यामुळे मानवी जीवन संतुलित झाले आहे. पर्यावरणातही योग्य असा समतोल साधला जात आहे.
काय हवे, काय नको….
समतोल पर्यावरण – हवे हवे हवे
कोरोनाची लागण – नको नको नको
नमस्कार, प्रणाम – हवा हवा हवा
हातात हात देणं – नको नको नको
शरीराची स्वच्छता – हवी हवी हवी
घरामध्ये अस्वच्छता – नको नको नको
सुरक्षित अंतर – हवे हवे हवे
जमाव, गर्दी – नको नको नको
घरात उद, धूप, कापूर – हवे हवे हवे
किटाणूंचा प्रसार – नको नको नको
घरच्या पदार्थांचा आस्वाद – हवा हवा हवा
तेलकट, फास्ट फूड – नको नको नको
माणुसकीचे दर्शन – हवे हवे हवे
जात, पात वर्ण-भेद – नको नको नको
पर्यावरणाची देखभाल – हवी हवी हवी
ध्वनी-वायू प्रदूषण – नको नको नको