कोरोनाबाधितांची संख्या पाचशे पार

>> नवीन २८ रुग्णांमुळे राज्यात ५०७ पॉझिटिव्ह

>> ११ जण कोरोनामुक्त

राज्यात नवीन २८ कोरोना पॉझिटिव्ह काल आढळून आल्या असून राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ५०७ वर पोहोचली आहे. मांगूर हिलशी संबंधित आणखी नवीन १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, राय आणि कुडतरी येथे प्रत्येकी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह ११ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ५९२ झाली असून त्यातील ८५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०७ झाली आहे.

राय, कुडतरीत कोरोना रुग्ण
राय आणि कुडतरी भागात प्रत्येकी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. राज्यातील विविध भागांत कोरोना विषाणूचा फैलाव सुरूच आहे. मडगावनंतर आता राय, कुडतरी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.

चिंबलमध्ये आणखी २ रुग्ण
चिंबल येथे कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्ण आढळून आले असून चिंबलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे. या भागातील नागरिकांची कोविड चाचणी सुरू आहे.

केपेत २ कोरोना पॉझिटिव्ह
केपे येथे कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ झाली आहे. सडा वास्को येथे आणखी ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सडा भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. राज्यात आलेला १ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, बायणा, मोर्ले, नवेवाडे वास्को येथे नवीन रुग्ण आढळून आले नाहीत.

कोरोनाचे ११ रुग्ण बरे
मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये उपचार घेणारे ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील आत्तापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ८५ झाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित १० रुग्णांना दाखल करण्यात आले असून १६ कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या १६२ प्रवासी आणि आंतरराज्य प्रवास केलेल्या २० प्रवाशांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहेत. तर, २१६ प्रवाशांची सरकारी विलगीकरण सुविधेमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे.

स्वॅब चाचणीसाठी कमी नमुने
आरोग्य खात्याने कोविड चाचणीसाठी काल सोमवारी कमी नमुने प्रयोगशाळेत पाठवले. जेथे गेले काही दिवस रोज सरासरी २००० चाचण्या होत होत्या. तसेच काल केवळ ८६८ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी कोविड प्रयोगशाळेत पाठविले. त्यामुळे रुग्ण संख्या खाली आली. कोविड प्रयोगशाळेतून ८६३ नमुन्यांचे अहवाल जाहीर करण्यात आले. प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले ८३५ नमुने निगेटिव्ह आहेत. तर, २८ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.