कोरोनापासून बचाव कसा कराल? भाग – २

  •  डॉ. स्वाती हे. अणवेकर,
    (म्हापसा )

    कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी पोलीस, नर्सेस, डॉक्टर्स, सैनिक, सफाई कर्मचारी इ.ना कायमच आपली सेवा द्यावी लागते आहे. सध्या ह्या आणीबाणीच्या काळात त्यांना मात्र विश्रांती नाहीच उलट अधिक कामाचा ताण त्यांच्यावर आहे. त्यांचा थेट संपर्क कोरोनाबाधित व्यक्तींशी येतच असतो. त्यासाठी…….

सध्या तरी कोविड-१९च्या आजारावर कोणतेच औषध उपलब्ध नसल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविणे व सोशियल वळीींरपलळपस पाळणे ह्या दोन गोष्टी कटाक्षाने करणे आवश्यक आहे. आता ह्या विषाणूपासून होणारा संसर्ग आपण कसा टाळू शकतो ते पाहूया.
१) नियमित मास्कचा वापर करावा.
२) नियमित साबणाने हात धुवावे.
३) गरज नसताना बाहेर फिरणे टाळावे.
४) एका जागी जास्त लोकांनी गर्दी करू नये.
५) सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
६) बाजारातून किंवा बाहेरून घरी आल्यावर बाहेर वापरलेले कपडे वेगळे ठेवावे अथवा धुवायला टाकावे.
७) हातपाय तोंड स्वच्छ धुऊन मगच घरात वावरावे.
८) शक्य असेल त्यांनी दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी.
९) सर्दी खोकला ताप असणार्‍या व्यक्तींनी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
१०) बाहेरून आणलेल्या खाद्य वस्तू नीट धुऊन मगच वापराव्या.
११) बाहेरच्या वस्तू खाणे टाळावे.
१२) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.
१३) शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल धरावा.
१४) ह्या काळात अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळावा.
ह्या सर्व गोष्टींचे आपण जर पालन केले तर आपण आपल्याला व इतरांनादेखील सुरक्षित ठेवू शकतो.

कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी पोलीस, नर्सेस, डॉक्टर्स, सैनिक, सफाई कर्मचारी इ. मंडळींना कायमच आपली सेवा द्यावी लागते आहे. सध्या ह्या आणीबाणीच्या काळात त्यांना मात्र विश्रांती नाहीच उलट अधिक कामाचा ताण त्यांच्यावर आहे. त्यांचा थेट संपर्क कोरोनाबाधित व्यक्तींशी येतच असतो. आणि ह्यातून बरेच जण संक्रमितदेखील झाले आहेत व त्यातील बरेच जण मरण पावले आहेत. अर्थात त्यांना शहीद हाच शब्द योग्य ठरेल. ह्या मंडळींनीदेखील आपली काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. त्यांना स्वतःला सांभाळून देशसेवा करावी लागेल. ह्यासाठी त्यांना किमान दिवसातून दोन वेळा पौष्टिक आहार मिळणे आवश्यक आहे.
तसेच इथे काही उपाय मी सांगणार आहे त्यातील ज्यांना जे शक्य असेल त्यांनी ते अवश्य आपल्या दिनचर्येत उपयोगात आणावे.

१) दिवसातून ३ वेळा गरम पाण्यात हळद, सैंधव व त्रिफळा चूर्ण मिसळून त्याने गुळण्या कराव्यात.
२) सकाळी ब्रश केल्यानंतर किमान ५ मिनिटे २ मोठे चमचे तीळ तेल तोंडात धरून गंडूष करावे.
३) नियमित गरम पेय किंवा पाणी प्यावे.
४) सुंठ, गवती चहा पाती, बडीशेप, तुळस पाने, धने, २-३ काळ्या मनुका ह्यांचा वापर करून काढा बनवून दिवसातून २ वेळा १ कप प्यावा.
ह्या उपायांनी तोंडातील शेष्मलकला व लाळ निर्जंतुक व्हायला मदत होईल व त्या भागाची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
५) नियमित सकाळी अंघोळ केल्यावर नाकामध्ये २ थेंब पंचेंद्रिये वर्धन तेल अथवा साजूक तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये घालावे.
असे केल्याने नाक, घसा, व श्वासनलिका ह्यातील श्लेष्मल कलेवर तेलाचे अथवा तुपाचे आवरण चढल्याने विषाणूचा प्रभाव त्या भागी लवकर होणार नाही व तिथल्या भागाची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने संक्रमणाचा धोका काही अंशी नक्की कमी होईल.
६) १ मोठा चमचा च्यवनप्राश सकाळी उपाशी पोटी खावा.
७) गरम दुधात हळद व थोडे साजूक तूप मिसळून प्यावे ते देखील फायदेशीर ठरते.
८) गुळवेल, ब्राम्ही, शतावरी, अश्वगंधा, ज्येष्ठमध, हळद, सुंठ, ह्यांचा वापर आवश्यकतेनुसार करावा.
९) ह्या कोरोनाच्या योद्ध्यांना जेव्हा आराम करायला वेळ मिळतो तेव्हा तळपायाला साजूक तूप लावून काशाच्या वाटीने तळवे घासावे म्हणजे शरीरातील उष्णता कमी होते व झोपदेखील छान लागते.
हे सांगितलेले उपाय त्यांच्यासोबत अन्य लोकांनी केले तरीदेखील फायदेशीर आहेत.

आता शारीरिक बाजू तर ह्या विषाणूच्या प्रभावा खाली आहेच पण हा प्रभाव माणसाच्या शरीरापुरता राहिला नसून तो भारत व जगभरातील लोकांच्या मनावरदेखील होऊ लागला आहे. सर्व मानव जात भीतीच्या विळख्यात अडकली आहे. इथे कुणाला विषाणू बाधा होण्याची भीती, कुणाला घरापासून लांब असल्याने कुटुंबीयांची काळजी, काही लोकांना दोन वेळच्या अन्नाची चिंता, कुणाला कामधंदा नसल्याची चिंता, काहींना धंदा बंद पडण्याची काळजी, कुणाला नोकरी जाण्याची चिंता तर काहींना ह्यापुढे आनंदात कसे जगायचे हा प्रश्‍न. ज्यांचे जिवलग ह्या आजाराचे बळी झालेत त्यांना त्यांच्या जाण्याचे दुख त्यामुळे तसे पाहता जगभरात कोरोनामुळे भयावह परिस्थिती ओढवली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यापेक्षा प्रत्येकजण फक्त चिंता, भीती ह्या भावनांना चिकटून सगळी जबाबदारी सरकारवर सोपवून मोकळा झाला आहे. त्यातही हाताच्या बोटावर मोजण्याएवढे लोक ह्या प्रसंगामध्ये दुसर्‍यांचा विचार करून त्यांच्या सुखासाठी धडपडताना दिसतात.

सांगण्याचा मुद्दा हा की अशा संकटकाळी शरीराबरोबरच मनदेखील खंबीर ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार केल्याने आपल्या जीवनात नकारात्मक घटना वाढतात आणि ह्याचे मुख्य कारण आहे आपले मन व त्यातील विचार. म्हणूनच सकारात्मक विचार करण्याची आत्ता गरज आहे. कारण आपण सगळ्यांनी जर सकारात्मक विचार केला तर त्याचा परिणाम हा आजच्या विपरीत परिस्थितीवर सकारात्मक होणार ह्यात शंका नाही. त्यामुळे ह्या कठीण प्रसंगी आपण प्रत्येकाने मन सकारात्मक ठेवण्यासाठी ध्यान करणे अत्यंत उपयोगी आहे. तसेच शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगासन, प्राणायाम, ह्यांचा फार उत्तम उपयोग होतो.
वरील सर्व उपाय अमलात व आचरणात आणून आपण सगळे कोरोना नावाच्या भयंकर राक्षसाला नक्कीच पराभूत करू शकणार ह्यात शंका नाही.
(कृपया वरील उपचार हे फक्त वाचकांच्या माहितीसाठी असून त्याचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा).